पिवळसर पाण्याचा साडेपाच लाख जळगावकरांना धोका

0
जळगाव । दि.1 ।-जळगाव शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघुर धरणातील पाण्यावर उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन करुन शहरात पाणीपुरवठा केला जातो.
मात्र पिवळसर रंगाचा आणि दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने साडेपाच लाख जळगावकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिवळसर रंगाचा पाणीपुरवठाबाबत वारंवार तक्रारी करुन देखील प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने जळगावकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वाघुर धरणावरुन जळगाव शहराला पाणीपुरवठा केला जातो. तत्कालीन जळगाव नगरपालिकेने राबविलेली पाणीपुरवठा योजना मनपाने 2008 मध्ये कार्यान्वीत केली आहे.

वाघुर धरणावरुन पाणी उचल केल्यानंतर उमाळा येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जलशुद्धीकरण करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो.

परंतु स्वच्छ आणि नितळ असलेले पाणी अचानकपणे पिवळसर आणि दुषित व दुर्गंधीयुक्त येवू लागल्याने जळगावकरांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

पाण्यात फेरस आयर्न, अल्गी ब्लूमचे प्रमाण वाढल्यामुळे पाण्याला पिवळा रंग येत असून पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे.

परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा पिवळा रंग जाण्यासाठी प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे जळगावकरांना पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.

जलवाहिनी गळतीचे ग्रहण
वाघुरधरणापासून ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 2150 मिमी व्यासाची लोखंडी जलवाहिनीची जोडणी करण्यात आली आहे.

परंतु उमाळा जलशुद्धीकरण केंद्रपासून ते जळगाव शहरात 1786 कि.मी.पर्यंत 1200 मीमी 800 व 600 मीमी व्यासाचा जलवाहिनी जोडण्यात आली आहे.

लोखंडी गॅल्व्हॅनायझची जलवाहिनी ऐवजी सिमेंटची वापरण्यात आल्याने वारंवार जलवाहिनीची गळतीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे दुषित पाणीपुरवठा होवून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

अमृतअंतर्गत पा.पु.योजना रखडली
अमृत योजनेंतर्गत 249 कोटीची पाणीपुरवठा योजना केंद्र शासनाने मंजूर केली आहे. यातील पहिल्या टप्यात 191 कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली आहे. मात्र ही न्याय प्रविष्ठ बाब झाल्याने ही योजना रखडली आहे. अमृतअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केल्यास जळगावकरांना ‘अमृत’ ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

*