कर्जफेडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे व्यंकय्या नायडू यांना पत्र

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-हुडकोच्या कर्जफेडीसाठी मनपा प्रशासनाने 77 कोटी 45 लाखाचा प्रस्ताव तयार करुन हुडकोकडे सादर केला आहे.
दरम्यान, कर्जफेडीबाबतचा हा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.

तत्कालीन जळगाव नपाने घरकुल वाघुरसह विविध योजनांसाठी हुडकोकडून 141 कोटी 34 लाखाचे कर्ज घेतले आहे. कर्जापोटी मनपा प्रशासनाने व्याजासह आतापर्यंत 297 कोटी तर 2004 च्या रिशेड्युलिंगनुसार 239 कोटीची रक्कम हुडकोला अदा केली आहे.

मनपाचे आर्थिक स्थिती बिकट असल्याने सन 2011 ते 13 मध्ये एकही हप्ता अदा केला नव्हता. तसेच कर्जापोटी काही निर्धारीत रकमा भरल्या नाहीत.

त्यामुळे 2004 च्या रिशेड्युलिंगनुसार तपशिलवार प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय समितीने घेतला. त्यानुसार मनपा प्रशासनाने 77 कोटी 45 लाखाचा प्रस्ताव तयार केला आहे.

दरम्यान, आयुक्त जीवन सोनवणे यांनी हा प्रस्ताव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव डी.के.जैन यांच्याकडून तपासून हुडकोकडे सादर केला.

मनपा प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर दि.29 रोजी हुडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर मनपाचा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देवून विनंती करणार असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*