महासभेतून भाजप नगरसेवकांचे ‘वॉकआऊट’

0
जळगाव । दि.20 । प्रतिनिधी-मनपाची भोईटे शाळेची इमारत उत्कर्ष मतीमंद विद्यालयासाठी देण्याबाबत महासभेत चर्चा करावी, असा मुद्दा भाजपचे नगरसेवक रविंद्र पाटील यांनी मांडला.
मात्र महापौर नितीन लढ्ढा यांनी आता हा विषय महासभेच्या पटलावर नाही. असे म्हणून चर्चा करण्यास नकार दिला.
त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी ‘मनमानी करणार्‍या सत्ताधारी खाविआच्या धिक्कार असो’ अशा घोषणाबाजी देत सभात्याग केला. दरम्यान, गोंधळातच सभेला सुरुवात झाली.

मनपाची महासभा महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला सुरुवात होताच, भाजपचे नगरसेवक रविंद्र पाटील यांनी भोईटे शाळेची इमारत उत्कर्ष मतीमंद विद्यालयासाठी देण्याबाबत चर्चा करावी, अशी सूचना मांडली.

यावर महापौर नितीन लढ्ढा यांनी संबंधित विषय विषयीपत्रिकेवर नाही. धोरणात्मक निर्णय जेव्हा होईल, त्यावेळी चर्चा करु असे सांगून चर्चा करण्यास नकार दिला.

त्यामुळे भाजपचे सर्व आक्रमक झाले होते. सत्ताधार्‍यांची मनमानी सुरु आहे. असा आरोप रविंद्र पाटील यांनी केला. सभागृहात बाजू ऐकूण घेवू शकत नाही तर सभागृहात बसून काय फायदा? असा सवाल उपस्थित करत, भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला.

पर्यायी जागा देण्यास तयार – महापौर लढ्ढा
भोईटे शाळेची इमारत एक आहे. आणि मागणी दोघांची आहे. आधी जैन उद्योग सूमहाने मागणी केली होती. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता यावे, यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणार आहेत. उत्कर्ष मतीमंद विद्यालयाची सामाजिक दृष्ट्या मागणी वाजवीच आहे. परंतु त्याच शाळेसाठी आग्रह धरणे चूकीचे आहे. पर्यायी जागा म्हणून मनपा शिक्षण मंडळाची इमारत देण्यास तयार आहोत. परंतु भाजप नगरसेवक ऐकून घ्यायला तयारच नाही. अशी भूमिका महापौर नितीन लढ्ढा यांनी पत्रकारांशी बोलतांना मांडली.

15 वर्षापासून जागेसाठी मागणी – रविंद्र पाटील
उत्कृर्ष मतीमंद विद्यालयासाठी गेल्या 15 वर्षापासून मागणी करण्यात येत आहे. सुरुवातीला मनपा शाळा क्र.3, 30, 45 ची इमारत मागितली. परंतु सत्ताधार्‍यांनी तिथेही डावलून दुसर्‍या संस्थेला जागा दिली. आता भोईटे शाळेची इमारत देण्याची मागणी केली. मात्र काही ठिकाणी डावलण्यात येत असल्याचा आरोप रविंद्र पाटील यांनी केला. सत्ताधारी गोलमाल उत्तर देण्यात पटाईत आहेत. सत्ताधारी ही इमारत का देत नाही? यात काही आर्थिक विषय आहे का? असा सवाल भाजपचे नगरसेवक रविंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

भाजप नगरसेवकांमध्ये गटबाजी
महासभा सुरु असतांना महापौरांनी रविंद्र पाटील, पृथ्वीराज सोनवणे, सुनिल माळी, अ‍ॅड.संजय राणे, विजय गेही, वामनराव खडके, डॉ.अश्विन सोनवणे, अनिल देशमुख, नवनाथ दारकुंडे, ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, अ‍ॅड.शुचिता हाडा, दिपमाला काळे यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु चर्चा न झाल्यामुळे सभात्याग करण्याचा निर्णय जेव्हा घेतला. तेव्हा काही नगरसेवक-नगरसेविकांनी महिन्यातून एकदाच महासभा होते. त्यामुळे सभागृहात बसा अशी सूचना केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांमध्ये मतभेद असल्याने गटबाजीचे चित्र दिसून आले.

सत्ताधारी नगरसेवकांची मध्यस्थी
भाजपचे नगरसेवक आक्रमक होवून सभागृहात गोंधळ झाल्यानंतर सत्ताधारी खाविआचे नगरसेवक कैलास सोनवणे, सुनिल महाजन, शामकांत सोनवणे, अमर जैन आणि स्वत: महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे यांनी मध्यस्थी करत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेले भाजपचे नगरसेवक सभात्याग करण्याच्या भूमिकेवर ठाम होते.

पालकांसह शिक्षकांना धक्काबुक्की


उत्कृर्ष मतीमंद विद्यालयासाठी इमारत मिळावी, यासाठी मतीमंद विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक महापालिकेत आले होते. महासभा सुरु असतांना सभागृहात प्रवेश करण्याचा शिक्षक व पालकांनी प्रयत्न केला. त्यावेळी मनपाच्या कर्मचार्‍यांनी धक्काबुक्की करुन मारहाण केल्याचा आरोप पालकांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

खाविआच्या विरोधात घोषणाबाजी
महापौरांनी चर्चा करण्यास नकार दिल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. मनमानी करणार्‍या खाविआचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी देवून भाजप नगरसेवकांनी सभात्याग केला.

 

 

LEAVE A REPLY

*