ठराव क्र.40 वरील स्थगिती रद्द करण्यासाठी स्थायी सभापतींचे पत्र

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळे लिलाव पद्धतीने देण्याबाबत आणि भाडे वसुलीसाठी पाचपट दंड आकारणी करण्याबाबतचा 40 क्रमांकाचा ठराव करण्यात आला आहे.
परंतु या ठरावाला शासनाने स्थगिती देवून निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे स्थगिती रद्द करावी किंवा त्वरीत निर्णय द्यावा, यासाठी मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

महासभेने केलेल्या 40 क्रमांकाच्या ठरावाला काही गाळेधारकांनी हरकत घेवून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी ठरावाला स्थगिती देवून नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आदेश दिले.

दरम्यान, या ठरावावर सुनावणी झाली. मात्र नगरविकास राज्यमंत्र्यांनी निर्णय राखून ठेवला आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत औरंगाबाद खंडपीठाने गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश दिले आहे.

त्यामुळे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ठराव क्रमांक 40 ची स्थगिती रद्द करावी. किंवा त्वरीत निर्णय द्यावा. अशा आशयाचे पत्र सभापती वर्षा खडके यांनी नगरविकास राज्यमंत्री, नगरविकास प्रधानसचिव आणि नगरविकास विभागाचे उपसचिव डॉ.सुधाकर शिंदे यांना दिले आहे.

 

LEAVE A REPLY

*