जळगावात आज ‘एपिक’ मोबाईल फोटो प्रदर्शनाचा समारोप

0
जळगाव। जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त मोबाईलने काढलेल्या फोटोंचे ‘एपिक’ या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचा समारोप उद्या (ता. 14) होत आहे. या प्रदर्शनाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रसिकांनी निवडलेल्या पाच मोबाईल छायाचित्रकारांना समारोपाच्या वेळी गौरविण्यात येणार आहे. समारोपाचा कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात संध्याकाळी साडेसहाला जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे आणि जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सामान्यांतल्या प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून असामान्य कार्ये करून घेणे हा जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचा अलौकिक गुण. तिच परंपरा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन पुढे चालवत आहेत. 10 फेब्रुवारीला त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा झाला, त्यांच्यानिमित्त 56 फोटो असलेले हे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानातील वसंत वानखेडे कला दालनात भरविण्यात आले होते.

रसिकांनी केली उत्कृष्ट फोटोंची निवड
‘एपिक’ या मोबाईल फोटो प्रदर्शनात सामान्यांमध्ये दडलेल्या असमान्यत्वाचा अविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रदर्शन स्थळी रसिकांना पाच उत्कृष्ट फोटो निवडण्यासाठी चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या, त्या भरतांना देखील जळगावकर रसिकांनी उत्सूकता दाखवली. रसिकांनी ड्रॉप बॉक्समध्ये टाकलेल्या चिठ्ठ्यातून पाच उत्कृष्ट मोबाईल फोटोंची निवड केली जाणार आहे. त्यांचा गौरव समारोपाच्या समारंभात केला जाणार आहे.

मोबाईलच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंचे हे पहिलेच प्रदर्शन असावे अशी प्रतिक्रिया प्रदर्शन पाहणार्‍या रसिकांनी नोंदवली आहे. प्रदर्शनात लावलेले फोटो दैनंदिन जीवनातील असूनही त्यातून एका अदभूत जगाची ओळख झाल्याची भावना देखील नोंदवण्यात आली आहे. फोटोंची निवड करतानाही रसिकांचा कस लागल्याचे सांगण्यात आले आहे. प्रदर्शनाला शहरातील शासकीय अधिकारी, कलावंत, तरुण-तरुणींनी भेट देऊन कौतुक केले आहे. प्रदर्शनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे आवाहन जैन इरिगेशनच्या कला विभागातील विजय जैन, योगेश संधानसिवे, तुषार बुंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*