मा.खा.जैन यांच्या मालमत्तांवर प्रतिकात्मक टाच

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-राष्ट्रवादीचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्या तीन संस्थांनी घेतलेले कोट्यावधी रुपयांचे कर्ज परतफेड करण्यास अयशस्वी ठरल्याने त्यांच्या मालमत्तांवर दि.12 जून रोजी स्टेट बँकेतर्फे प्रतिकात्मक ताबा घेण्यात आला आहे.
यासंदर्भात तारण मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्ज भरण्याबाबत मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकार्‍यांनी नोटीस देखील बजावली आहे.
या नोटीसीमुळे व्यापार क्षेत्रासह जिल्हाभरात मोठी खळबळ माजली आहे.

शहरातील प्रतिष्ठीत सुवर्णव्यवसायिक तथा राष्ट्रवादीचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांची फर्म असलेली मे.आर.एल. गोल्ड प्रा.लि. यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 72 कोटी 34 लाख 123 रुपये 34 पैसे असे कर्ज घेतले होते.

तसेच मे.मनराज ज्वेलर्स प्रा.लि. या नावाने 78 कोटी 91 लाख 36 हजार 658 रुपये 67 पैसे आणि मे.राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा.लि. या नावाने 213 कोटी 42 लाख 35 हजार 918 रुपये 76 पैसे असे कर्ज घेतले आहे.

असे एकूण 364 कोटी 67 लाख 72 हजार 699 रुपयांचे कर्ज परतफेड करण्यात या तिनही संस्था अयशस्वी ठरल्या आहेत.

त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे हे संपूर्ण कर्ज 60 दिवसाच्या आत परतफेड करण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2016 रोजी डिमांड नोटीसही देण्यात आली होती.

या नोटीसीनंतरही कर्जभरणा न झाल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाने सिक्युरिटी इंटरेस्ट एम्फोर्समेंट रुल्स 2002 च्या रुल 8 सोबत कायद्याच्या कलम 13 च्या उपकलम (4) अंतर्गत प्रदान अधिकारानुसार दि.12 जून रोजी सराफ बाजार परिसरातील मालमत्तेवर प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

तसेच तारण असलेली मालमत्ता सोडवून घेण्यासंदर्भात स्टेट बँकेने आज जाहीर नोटीस देखील या तिनही संस्थांना बजावली आहे.

 

LEAVE A REPLY

*