‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण गरोदर माता-बालकांसाठी ‘जीवनदायी’

0
जळगाव । दि.28 ।-देश पोलिओमुक्त, कुपोषणमुक्त करण्यासाठी, माता-बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पल्सपोलिओच्या धर्तीवर वंचित बालकांना लसीकरण करण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मिशन इंद्रधनुष्य’ योजना जीवनात सप्तरंग घेवून येत असून आदिवासी दुर्गम भागातील बालकांना जीवनदायी ठरत आहे.
‘जो न पहुचें हम तक्र, हम पहुचें उन तक’ या उक्तीनुसार शहरासह जिल्ह्यात तीन वर्षापासून मोहिम राबविण्यात येत आहे. यावर्षी एप्रिल ते जुलै अखेर चार महिन्यातील चार आठवड्यात 9456 बालकांना तर 596 गदरोर मातांना लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणापासून वंचित राहिल्यास अपंगत्व येण्याची शक्यता असते. तसेच अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे लसीकरणापासून वंचित गरोदर माता आणि बालकांसाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण योजना डिसेंबर 2014 पासून सुरु करण्यात आली आहे.

आधी प्रत्येक आजाराच्या प्रतिबंधासाठी वेगवेगळी लस दिली जात होती. परंतु आता ‘मिशन इंद्रधनुष्य’अंतर्गत पाच लस मिळून एकच ‘पेन्टाव्हॅलेंट’ (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, कावीळ, मेंदुज्वर) लस तयार करण्यात आली आहे.

तसेच क्षयरोग प्रतिबंध, गोवर प्रतिबंध, पोलिओ डोस आणि इंजेक्शन व जीवनसत्व ‘अ’ या मिशनमध्ये अंतर्भाव आहे. शून्य ते 2 वर्ष वयोगटातील बालकांसह ग्रामीण भागातील वंचित 5 वर्षाखालील बालकांनाही लस दिली जाते.

वंचित बालकांसाठी लसीकरण
‘मिशन इंद्रधनुष्य’ अंतर्गत चार महिन्याच्या चार आठवड्यात मनातर्फे 556 तर जि.प.आरोग्य विभागातर्फे 8900 असे एकूण 9456 बालकांना तर 596 गरोदर मातांना लसीकरण करण्यात आले. यात 1588 बालकांना गोवर लस, 569 क्षयरोग प्रतिबंध लस, पेन्टाव्हॅलेंट 2103 बालकांना लस, डीपीटी 1163, पोलिओचे 2292 बालकांना डोस आणि 162 बालकांना इंजेक्शनद्वारे लसीकरण तसेच 596 गरोदर मातांना धनुर्वाताची लस देण्यात आली आहे. तसेच 5 ते 6 वर्ष वयोगटातील 200 बालकांनाही डीपीटीची लस देण्यात आली आहे.

सप्तरंग – 7 तारीख 7 दिवस 7 लस

‘मिशन इंद्रधनुष्य’ अंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना लस दिली जाते. ही मोहिम पल्स पोलिओच्या धर्तीवर असून महिन्याच्या 7 तारखेला 7 दिवस आणि वेगवेगळ्या 7 लस देण्यासाठी मोहिम राबविण्यात येते. गरोदर मातांना एक महिन्याच्या अंतरात दोन वेळा लस दिली जाते. दीड महिना, अडीच महिना आणि साडेतीन महिन्याच्या बाळाला तीन वेळा ‘पेन्टाव्हॅलेंट’ (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, कावीळ, मेंदुज्वर) लस दिली जाते. जन्मानंतर बाळाला क्षयरोग प्रतिबंध (बीसीजी) लस, बाळ 9 महिन्याचा झाल्यानंतर गोवर लस आणि जीवनसत्व ‘अ’ औषध दिली जाते. 16 महिन्यानंतर त्रीगुणी लस (डिपीटी-डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात) दिली जाते. तसेच पोलिओचे डोस आणि इंजेक्शन देखील दिले जाते. ही मोहिम जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. बालमृत्यूचे प्रमाण समाधानकारक नसले तरी माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यास आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

LEAVE A REPLY

*