विकास कामांसाठी 237 कोटींच्या निविदा

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-जळगाव ग्रामीण मतदार संघातील गावांच्या विकासासाठी राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे 237 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे.
मंजूर झालेल्या या निधीतून कामे करण्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यामुळे असोदा-भादलीसह 25 गावांमध्ये हरीतक्रांती होवून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
जळगाव ग्रामीण मतदार संघात वाघुर प्रकल्पांतर्गत आसोदा शाखा व वितरण प्रणालीच्या दाबयुक्त बंदिस्त पाईपलाईन वितरण प्रणालीसाठी 71 कोटी, भादली शाखेच्या कामासाठी 126 कोटी व मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणासाठी 40 कोटी अशा एकूण 237 कोटी ची कामे हाती घेण्यात आली असून या कामांची निविदा प्रक्रीया सुरु झाली आहे.

गेल्या 5 वर्षापासून आसोदा व भादली शाखेच्या कालव्याच्या वितरण प्रणालीचे काम भुसंपादनास शेतकर्‍यांच्या तिव्र विरोधामुळे बंद होती.

ही कामे मार्गी लागण्यासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची 5 महिन्यापूर्वी बैठक घेऊन मार्गदर्शन मागविले होते.

त्यात कालव्याव्दारे कामे न करता दाबयुक्त बंदिस्तपाईप लाईनव्दारे वितरण प्रणालीचे काम करण्याचे ठरले होते. या बाबत पाटबंधारे विभागाच्या बैठकीत हा ठराव मंजुर करण्यात आला होता.

आसोदा व भादली शाखा कालवा व वितरीकेचे काम बंदिस्तपाईप लाईनव्दारे होणार असल्याने कामाच्या खर्चात सुमारे 200 कोटींची बचत होणार आहे.

सुपिक व कसदार जमिनीची कायम स्वरुपी बचत होणार असून भुसंपादनाचा लागणारा कालावधी टळला आहे. तर पाण्याची बचत होऊन पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही तसेच सिंचन व्यवस्थापन कमीत कमी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने सुरळीतपणे पार पाडणे शक्य होणार आहे.

या गावांना होणार लाभ
भादली शाखेतील नशिराबाद, कडगांव, भादली, शेळगांव, कानसवाडे, भोलाणे, देऊळवाडे, सुजदे, खापरखेडा, धामणगांव, नांद्रा, तुंरखेडा, आवार व डिकसाई अशा 16 गावांना तर आसोदा शाखेतील ममुराबाद, आव्हाणे, फुफनगरी, आसोदा, वडनगरी, खेडी, कानळदा अशा 9 गावांना फायदा होणार आहे. तालुक्यातील आसोदा व भादली परिसरातील सुमारे 25 गावातील 9500 शेतकर्‍यांची 9969 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असल्याने परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. या बंदिस्तपाईप लाईन प्रणालीमुळे ड्रिप व स्प्रिंकलर पध्दतीने शेतकर्‍यांना पाणी देणे सुलभ होणार आहे. 237 कोटींच्या कामांना अखेर गती येणार असल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*