Type to search

maharashtra जळगाव

जीवनदायी गिरणेची झाली गटारगंगा

Share

जळगाव  – 

जिल्ह्याला सिंचनासह शाश्वत पाणीपुरवठ्याचे साधन असलेली पूर्वीची गिरणा आज नदी नसून गटारगंगा बनली  आहे. जिल्ह्यातून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यालगच्या खेडेगावांसह जळगाव शहरालगतच असलेल्या नदीपात्रातून रात्रंदिवस अमाप वाळू उपशामुळे ठिकठिकाणी वाळवंटासारखे झाले आहे तर काही ठिकाणी भयानक असे मोठमोठे खड्डेदेखील झालेले आहेत.

यात अनेकांचे जीवही गेलेेले आहेत. गिरणा पात्रात अनेक ठिकाणी गावांतील सांडपाणी सोडले जाते तर बांभोरी पुलानजीकच शहरांतील सांडपाण्यासह कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी प्रकिये विनाच   नदीपात्रात सोडले जात आहे. बहुतांश ठिकाणी नदीपात्रात ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी  कार्यान्वित आहेत.

या सोडण्यात आलेले रसायन मिश्रीत पाणी वाळूतून या पाणीपुरवठा करणार्‍या विहिरित झिरपत असल्याने जिल्हावासीयांना नजरेआडचा दूषित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्याच नव्हेतर आजूबाजूच्या परिसराच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

 

ग्रामपंचायतींना होतोय दूषित पाणीपुरवठा 

महापालिकेमार्फत जलःनिस्सारण मंडळातर्फे शहरातील काही नागरी वसाहतीसह कारखान्यांचे पाणी पुनःप्रक्रियान करताच शहराजवळ असलेल्या गिरणा नदी पुलालगतच मोठया नाल्याव्दारे सोडले आहे. बांभोरीसह अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या योजनांच्या विहीरी आहेत. या सांडपाण्यामुळे नदीपात्रातील  विहिरींमध्ये पाणी झिरपल्याने दूषित पाणीपुरवठा स्थानिक ग्रामपंचायतींमार्फत या आजूबाजूच्या गावातील नागरिकांना केला जात आहे.

विनाप्रकिया सोडले जाते पाणी

विविध नगरातील, घरातील सांडपाणी, शहराच्या हद्दीत असलेले अनेक कारखाने रासायनिक प्रक्रिया उद्योग यांच्या वापरातून निरुपयोगी असलेले सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जाते. कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीपात्रात सोडले जाण्याचा नियम असला तरी मनपाच्या उदासीन धोरणामुळे शहर परिसरात सर्वच ठिकाणी नदीपात्रात कारखान्यातील सांडपाणी विनाप्रकिया सोडले जात आहे.

जलनिःसारण मंडळाची चुप्पी

जिल्हा प्रशासनात असलेले अधिकारी, जिल्हाधिकारी महानगरपालिकेेशी जलनिःस्सारण मंडळाशी संबंधित असलेला प्रश्न म्हणून लक्ष देत नाहीत तर स्थानिक महानगरपालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारीवर्ग मात्र ‘तेरी  भी चूप मेरी भी चूप’ या नितीने गप्प आहेत. जळगाव जिल्ह्याच्या लगतच असलेल्या अकोला महानगरपालिकाच नव्हेतर औरंगाबाद, जालना किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कारखान्यांचे रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रकिया करूनच ते पाणी नदी किंवा  नाल्याच्या पात्रात सोडले जाते. परंतु जळगाव शहर महानगरपालिका अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना रसायन मिश्रीत पाणी पिण्यास मिळत असल्याने  साथीचे आजार, त्वचाविकार वा अन्य गंभीर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!