Type to search

जळगाव फिचर्स

जळगाव : गेंदालाल मिल परिसरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला गटारीत

Share
jalgaon Gandalal mill area new boy deaths

जळगाव | प्रतिनिधी

गटारीतून सोन वेचणार्‍या किरण प्रदीप मोरे (वय २५, रा. या गेंदालाल मिल) या तरुणाचा गुरुवारी सकाळी जोशीपेठेतील गटारीत मृतदेह आढळला. तो बुधवारी घराबाहेर निघाला होता. जोशीपेठ परिसरातील रहिवाशाला गुरुवारी सकाळी गटारीत एका व्यक्तीचा पाय दिसल्याने ही घटना उघडकीस आली.
गेंदालाल मिल परिसरात किरण हा वडील प्रदीप पिराजी मोरे, भाऊ राजू, आई निर्मलाबाई मोरे याच्यासोबत राहत होता. त्याचे वडील व भाऊ दोघंही हातमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. किरणही गटारीत सोन वेचून ते सराफ व्यावसायिकांना विकत होता.  त्यातून मिळणार्‍या  पैशांतून वडिलांसह भावाला उदरनिर्वाहाकरिता हातभार लावायचा. बुधवारी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर निघाला. दुपारी २ वाजता गटारीतून सोने शोधण्यासाठी सराफ व्यावसायिकाकडून टोपलीसह साहित्य घेतले. यानंतर सोने शोधण्यासाठी जोशीपेठेतील गटारीकडे तो निघाला होता, अशी माहिती कुटुंबियांनी सांगितली.

जोशीपेठ परिसरात गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कचरा फेकण्यासाठी आलेल्या रहिवाशाला गटारीत एका व्यक्तीचा पाय दिसला. याबाबत संशय आल्याने त्या रहिवाशाने इतर नागरिकांना माहिती दिली. यासंदर्भात  बेपत्ता किरण मोरे याच्या कुटुंबीयांना कळाले. त्यांच्यासह परिसरातील मित्रांनी घटनास्थळ गाठले. यानंतर गटारीत पडलेला तरुण हा किरण मोरे असल्याची ओळखी पटली.

मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
याबाबत माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे  हेड कॉन्स्टेबल रघुनाथ महाजन, पोलीस नाईक प्रशांत देशमुख आदी घटनास्थळी पोहचले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. रुग्णालयात किरणच्या आई, वडिलांसह भावाने आक्रोश केला.   दरम्यान, किरणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्याचा मृतदेह गटारीत कसा? याबाबत पोलीस कसून तपास करीत आहेत. हा घातपाताचा तर प्रकार नाही? याबाबतही संंशय नातेवाईकांना आहे. याप्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!