Type to search

maharashtra जळगाव

ग.स.तील फूट नव्या समीकरणांची नांदी!

Share
जळगाव । आशिया खंडात तिसर्‍या क्रमाकांची सर्वात मोठी असलेल्या ग.स.सोसायटीचे 38 हजार सभासद असून संस्थेचे अधिकृत 150 कोटीचे भाग भांडवल आहे. शतकीय पार केलेल्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. सहकार क्षेत्रातही राजकीय वातावरण तापलेले असताना सहकार गटाला सुरुंग लावून खिंडार पाडण्याचे काम तुकाराम विलासमय ंहोऊन 11 संचालकांची वेगळी मोट बांधून ‘उदय’ची मनसुबे धुळीस मिळविण्यात ‘धनुष्य बाणा’च्या सहकार्याने ‘मनो’जय पूर्ण केला. आपल्या संस्थेच्या कार्यालयातील कागदपत्रे बाहेर जातात कसे? असे कारण पुढे करून सहकार गटातच उभी फूट पडून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न झाला.

मात्र,गेल्या अनेक महिन्यांपासून सहकार गटात अंतर्गत धुसफूसचे वातावरण सुरु होते. परंतु नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने वादाला तोंड फुटले. सहकार क्षेत्रातही राजकीय डावपेचाची किनार ही भविष्यात वेगळव्या गटाची पुनर्बांधणी करून समीकरणे बदलाची नांदी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सन 2015 मध्ये लोकमान्य गट, प्रगती गटाला धुळचारीत सहकार गटाचे 21 संचालक निवडून आले होते. सहकार गटातून पहिल्या अध्यक्षपदाची संधी सुनिल सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानंतर तुकाराम बोरोले यांना दोन वर्ष तर विलास नेरकर यांना 1 वर्षापेक्षा जास्त काळ अध्यक्षपद दिले. मार्च महिन्यात विलास नेरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीचे वेध ग.स.सोसायटीच्या संचालकांना लागले होते. उदय पाटील हे ज्येष्ठ संचालक असून त्यांचे नाव सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी पुढे केले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संचालकांचा विरोध होता. अध्यक्षपदासाठी उदय पाटील यांच्या नावासाठी आग्रह असल्याने सहकार गटात उभी फूट पडून दोन गट तयार झाले. बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी नाट्यमय घडामोडी घडत नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज पाटील व उपाध्यक्ष शामकांत भदाणे यांच्या बाजुने संचालकांनी कौल देवून त्यांना सत्तेवर विराजमान केले. सहकार गटातील 11 संचालकांनी वेगळी मोट बांधल्याने ग.स.सोसायटीमधील भविष्यातील समीकरणे बदलण्याची नांदी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

रिंगमास्टरने पडद्याआडून सोडला बाण
सुनिल सूर्यवंशी यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सहकार गटाने एन.एस.पाटील यांची संचालक म्हणून निवड केली होती. ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाचा निवडणुकीत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हस्तक्षेप करीत स्वीयसहाय्यक एन.एस.पाटील यांना मनोज पाटील यांना मतदान करण्यात भाग पाडल्याचे राजकीय गोटातून चर्चिले जात आहे. आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वीयसहाय्यकाने मनोज पाटील यांना ‘मताचे दान’ दिले. दरम्यान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा दावा फेटाळला असला तरी भविष्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण मतदार संघात नवनिर्वाचित ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांच्या शैक्षणिक संस्था कार्यरत असल्याने मतदानासाठी जमेची बाजू ठरणार असल्याने त्यांना झुकते माप दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सहकारात फुटाफुटाचा इतिहास
जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी सोसायटी (ग.स.सोसायटी)ला फुटाफुटीचे ग्रहण लागल्याचा इतिहास लाभलेला आहे. सर्व 21 संचालक सहकार गटाचे असल्यानंतरही अध्यक्षपदाचे दावेदार उदय पाटील यांचे नाव सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांनी निश्चित केले होते. हा आदेश जुगारुन सहकार गटात उभी फूट पडली. शेवटच्या वर्षात सहकार गटाचे 11 संचालकांनी वेगळी चुल मांडून मनोज पाटील यांच्या पाठीशी शक्ती उभी केली. लोकमान्य गट, प्रगती गट यांचे एकही संचालक निवडून आलेले नसले तरी या निवडणुकीमुळे नाराज गटाची वेगळी मोट बांधून भविष्यात नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. एक वर्षानंतर ग.स.सोसायटीच्या निवडणुका होणार असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरु असल्याची नांदी दृष्टी पथास दिसून येत आहे. भविष्यात लोकमान्य, प्रगती गट सक्रीय होवून आगामी निवडणुकीत आपला प्रभाव पाडण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!