Type to search

जळगाव

सदस्यत्व रद्द करण्यावरुन ग.स. च्या सभेत दांगडो

Share

जळगाव | जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या हॉलमध्ये दुपारी १२.३० वाजता झाली. प्रगती गटाचे रावसाहेब मांगो पाटील व योगेश जगन्नाथ सनेर यांचे सभासदत्व रद्द करण्यासह एक ते १२ विषय मंजूर करण्यात आला. विषय क्रं. १२ मंजूर केल्याने अध्यक्ष,उपाध्यक्षांसह सत्ताधारी गटाविरोधात घोषणाबाजी सुरु होती. सभासदांचा वाढता गोंधळ लक्षात घेताच सत्ताधारी गटाने या गोंधळात राष्ट्रगीत म्हणत सभा संपविली. दरम्यान, प्रगती गटाचे रावसाहेब मांगो पाटील व योगेश जगन्नाथ सनेर यांच्या गटाने बाजूलाच कॉर्नर सभा घेऊन सत्ताधार्‍यांच्या या निर्णयाचा धिक्कार करीत विविध घोषणा दिल्या.

ग.स.सोसायटीची ११०वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला उपाध्यक्ष शामकांत भदाणे, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, गटनेते तुकाराम बोरोले, विश्‍वास सूर्यवंशी, अनिल गायकवाड पाटील, सुभाष जाधव, सुनील निंबा पाटील, नथ्थू पाटील, सुनील पाटील, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्‍वर सोनवणे, दिलीप चांगरे, उदय पाटील, अजबसिंग पाटील आदी उपस्थित होेते.

अध्यक्षांना धक्काबुकी करण्याचा प्रयत्न
सभा आटोपल्यानंतर संचालकांसह अध्यक्ष मनोज पाटील पोलीस संरक्षणात जात असताना पोलिसाचे कडे तोडीत विरोधी गटाच्या सभासदांनी अध्यक्ष मनोज पाटील यांना धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला. या रेटारेटीमध्ये अध्यक्षांनी कशीबसी आपली सुटका केली.

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार
ग. स.च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मांडलेला विषय क्रं. १२ हा प्रस्ताव लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचा प्रकार असून सहकार क्षेत्राच्या इतिहासातील हा कलंक असून अवघ्या दोन सभासदांना सत्तेच्या बळावर अपात्र ठरवणे हा निर्णय सोसायटीला अधोगतीकडे नेणारी नांदी आहे,असेच होत राहिल्यास सुज्ञ सभासद ग. स. सोसायटीत राहणार नाहीत. सदर प्रस्तावाबाबत सभेत आवाजी मतदानाने नामंजुरीचा आवाज होता. परंतु सत्तेच्या बळावर चुकीचा ठराव मंजूर झाल्यास सोसायटीची जास्त बदनामी होईल हे वास्तव आहे. तसेच मयत सभासद आणि डीसीपीएसधारक सभासदांच्या हिताचे निर्णय होणे अपेक्षित आहेत आणि सर्व योजना या सोसायटीला होणार्‍या नफ्यातून राबवाव्यात व सभासदांच्या घामाच्या पैशाचा जास्तीत जास्त मोबदला सभासदांना देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी केली आहे.

तिमाही व्याजाचे स्वागत…पण
ग.स.सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून वर्षणीवर पुर्वीप्रमाणे तिमाहीव्याज आकारणी मिळावी याबाबत सभासदांची मागणी होती. ती या सभेत मंजूर केल्याबाबत व अहवाल छपाईत ११ लाखांची बचत केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एच.एच.चव्हाण यांनी स्वागत केले. मात्र विषय क्रमांक १२ वरुन सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत ठरावाला तीव्र विरोध असतांनाही व्यासपीठावरुन मोठ्या आवाजात एकतर्फी मंजूर केल्याचे दर्शविले यामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरली

आहे. सत्तधारी गटाने पुनर्विचार करावा. असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

विषय क्र.१२ नामंजूरचे टोपीधारी
ग.स.सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रंमाक १२ अजेंड्यावर आल्यानंतर सत्ताधारी गटाने अवाजवी मतदानाने मंजूर केला. त्यावेळी सभागृहात विरोधी गटाच्या सभासदांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालकांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या सभागृहात विषय कं. १२ विषय नामंजूर करा,अशा सभासदांनी टोप्या घातलेल्या होत्या. या टोपीधारी सभासदांनी डोक्यावरील टोपीवर रावसाहेब पाटील विजयी असो, हा विषय नामंजूर करा, असे लिहिलेले होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!