कर्जमाफीसाठी सरकारी यंत्रणा लागली कामाला

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी टिकेची झोड उठल्यानंतर जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा आज कामाला लागली. दरम्यान उद्या दि. 27 रोजी जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागप्रमुखांची सकाळी 11 वा. बैठक बोलावली असुन कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्य शासनाने कर्जमाफी जाहीर करून महिना उलटला तरी अद्याप शेतकर्‍यांच्या पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात तीव्र असंतोष पसरला आहे. अशातच शासनाने कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांकडुन अर्ज भरून घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

जिल्ह्यात दि. 24 पासुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी 1744 केंद्रही निश्चीत करण्यात आले. यात सीएससी, महा-ई सेवा, वि.का. संस्था याठिकाणी शेतकर्‍यांसाठी कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले जाणार आहे. दरम्यान प्रशासकीय यंत्रणेने दोन लाख अर्ज छापुन ते वितरीत केले जात असल्याचा दावा केला होता.

प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात निश्चीत करण्यात आलेल्या केंद्रांवर अर्जच उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांची थट्टाच होत असल्याचा प्रकार निदर्शनास आला. शासकीय दिरंगाईबाबत टिकेची झोड उठल्यानंतर आज सरकारी यंत्रणा कर्जमाफीच्या कामाला लागली.

सहकार विभागाने आज महा-ई सेवा केंद्रचालकांची बैठक घेऊन त्यांना सुचनाही केल्या. तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सहकार खात्याच्या इमारतीत जाऊन यासंबंधीची माहिती घेतली. उद्या दि. 27 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी पुन्हा आढावा घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*