तातडीच्या 10 हजाराबाबत लेखी आदेशच नाही

0
जळगाव । दि. 17 । प्रतिनिधी-शेतकर्‍यांना मदत म्हणून तातडीचे 10 हजार रूपयांची रक्कम देण्याबाबत अद्याप जिल्हास्तरावर कुठलेही लेखी आदेश नसल्याची माहिती समोर आली आहे.
लेखी आदेश नसल्याने मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर गेल्या मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदत म्हणून तातडीचे 10 हजार रूपये देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

चार दिवस उलटल्यानंतरही या निर्णयाची अद्याप जिल्हास्तरावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात अग्रणी बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 10 हजार रूपये वाटपाबाबत केवळ घोषणा झालेली आहे.

ते कशा पध्दतीने द्यावे याविषयीची कुठलीही माहिती अद्याप बँकांना प्राप्त झालेली नसल्याने रक्कम देण्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे शासनाने 10 हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे लेखी आदेश नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकर्‍यांची एकप्रकारे क्रुर थट्टाच केली जात असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेकडेही आदेश नाही
शेतकर्‍यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडेही 10 हजार रूपये वाटपासंदर्भात कुठलेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली. शासनाचे आदेश नसल्याने बँकांचेही हात बांधले असल्याचेही ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*