Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगावात दहावीच्या परीक्षा केंद्रांवर शिक्षकांचीच होतेय कॉपीला मदत!

Share
जळगाव । दहावी इंग्रजीच्या पेपरला मंगळवारी बाहेरून कॉपीचे प्रमाण मराठीच्या तुलनेत कमी होते. मात्र, शहरातील अनेक प्रतिष्ठित आणि नामांकित संस्थांच्या केंद्रावर सुपरवायझर व शाळांमधील शिक्षकच कॉपीला मदत करीत असल्याचे विदारक चित्र दिसले. एका केंद्रावर तर सुपरवायझर बाहेर आणि भलतीच व्यक्ती आत येऊन तब्बल अर्धा तास स्वत: ‘निवडक’ विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत होते.

त्या केंद्राबाहेरील परंतु परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या शाळांमधील सुपरवायझर असलेल्या शिक्षकही अशा प्रकारात सामील झाले होते. भरारी पथकांनीही याकडे कानाडोळा केल्याचेच चित्र होते. मात्र, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी संस्था, परीक्षा केंद्रे, सुपरवायझर व शिक्षकांच्या नावासह बोर्डाच्या विभागीय कार्यालयाला प्राप्त झाल्याचे समजते. बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी संस्थाचालक व केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन वर्गांतर्गत होणार्‍या या छुप्या कॉपीबाबत केंद्र प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अशा तक्रारींची खातरजमा करून केंद्रप्रमुखांसह सुपरवायझर यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित केंद्रेही कायमस्वरुपी बंद करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत विचार सुरु असल्याचे समजते. दरम्यान, इंग्रजीचा पेपर सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवरील कॉपीसारख्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याकरिता ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’मार्फत पाठविल्या जाणार्‍या ‘भरारी पथकां’च्या आडून भलतेच शिक्षक शाळांमध्ये हजेरी लावत असल्याची धक्कादायक बाबही काही केंद्रांवर समोर आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा पेपरफुटी, कॉपी, डमी विद्यार्थी यांसारख्या गैरप्रकारांनी गाजत असतानाच बोगस शिक्षकांच्या या ‘भरार्‍यां’मागे नेमके काय गौडबंगाल आहे, असावे असा प्रश्न आता विभागीय शिक्षण मंडळाला पडला आहे. वर्गावरील सुपरवायझर बाहेर असतांना ‘भलतीच’ व्यक्ती अर्धा तास वर्गात उपस्थित असणे, हाही अत्यंत गंभीर प्रकार मानला जात आहे. कॉपीचे प्रमाण बाहेरून कमी दिसत असले तरी जळगाव शहरातही ‘व्हॉट्सअप’वरून पेपरफुटी वैगेरे प्रकार लक्षणीय आहे. यात केंद्रातील मंडळी, सुपरवायझरच सामील असल्याचे चित्र आहे. दहावीच्या परीक्षेत यावर्षी मंगळवारी प्रथमच खूबचंद सागरमल शाळेतील 2 विद्यार्थी डिबार झाले. त्यासह जिल्ह्यात एकूण 23 विद्यार्थी डिबार झाले. मराठीच्या पेपरला 69च्या तुलनेत इंग्रजीला डिबार विद्यार्थ्यांच्या संख्येत तीन पटीने घट झाली.

शहरासह जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. बोर्डाने कॉपी रोखण्यासाठी केलेले उपाय तोकडे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्रप्रमुख व सुपरवायझरवर कारवाईसह कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत त्यामुळे व्यक्त होत आहे. परीक्षा केंद्राबाहेर कॉपी करणार्‍यांची गर्दी, प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी आणि उत्तरे सांगण्यासाठी व्हाट्स प आणि मोबाईलचा सर्रास वापर, परीक्षेच्या वेळेआधीच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकारही दुर्दैवाने वाढत चालले आहेत. केंद्रप्रमुख व सुपरवायझरच कॉपीच्या गैरप्रकारात सामील होत असल्याने व भरारी पथकाचे त्याकडे पुरेसे लक्ष नसल्याने कॉपीमुक्त अभियानाचा देखावा पोकळच ठरत आहे.

कॉपीला मदत करणार्‍यावर कडक कारवाई
जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. दहावी परीक्षामध्ये कॉपी करणारा विद्यार्थी व त्यास मदत करणार्‍या केंद्रप्रमुख, सुपरवायझर, अधिकारी व कर्मचार्‍यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संस्थाचालकांनी त्यांचे परीक्षा केंद्र कायम टिकविण्यासाठी केंद्रावर 100 टक्के कॉपीमुक्त परीक्षा होतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कॉपी करणार्‍या विद्यार्थ्यांला रेडिबार करुन पुढील वर्षासाठी परीक्षेस बसण्यास अपात्र ठरिवण्यात येणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महसूल विभागाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या आताही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच विद्यार्थ्यांना कोणीही कॉपी पुरविण्यास मदत करु नये, अशा सूचना संस्थाचालक व केंद्रप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्रातील अंतर्गत गैरप्रकार, संस्थाचालक-सुपरवायझर किंवा शिक्षक कॉपीला मदत करत असल्यास खालील नंबरवर तक्रार करा
के.बी.पाटील,
नाशिक विभागीय मंडळ
7410040024
http://krispat1970gmail.com

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!