एरंडोलला दंगल : तरुणाचा मृत्यू

0
एरंडोल । शहरात गुरुवारी (दि.6) रात्री 8.30 वाजता तिन दिवसापुर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून तरुणांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दगड, विटा, तलवार, लाठ्या-काठ्या व तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आला.

या हाणामारीत 19 वर्षीय गंभीर जखमी तरूणाचा आज उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. अन्य एका गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत. या घटनमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर उभे केले असता पाचही संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला.

दरम्यान, मारहाणीत मरण पावलेल्या युवकाचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून आरोपींवर कडक कारवाई करत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भुमिका घेतली. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रा.मनोज पाटील यांनी व मृत युवकाच्या नातेवाईकांनी यावेळी दिला. उपविभागीय अधिकारी रफिक शेख यांनी सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रात्री हजारो नागरिकांच्या उपस्थितीत युवकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसावद रस्त्यावरील दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या पटांगणावर जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरु असतांना पंकज नेरकर याने एका मुलीची छेड काढल्यामुळे त्याठिकाणी किरकोळ वाद झाला होता.चार दिवसापुर्वी हा वाद झालेला असल्यामुळे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका 19 वर्षीय तरूणाला आपला जीव गमवावा लागल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अचानक एका गटाने दुसर्‍या गटातील युवकांवर तीक्ष्ण शस्त्रे व लाठ्या-काठ्यांसह हल्ला केल्यामुळे दोन्ही गटात जोरदार हाणामारी सुरु झाली.

या हाणामारीत खंडू उर्फ उमेश अशोक पाटील (वय-19) व आबाजी रघुनाथ पाटील (वय-43) यांच्या पोट, पाठ व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दोन्ही गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतांना खंडू पाटील याचा मृत्यू झाला तर आबाजी पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिली आहे.

पंकज राजमल नेरकर याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि.4) झालेल्या भांडणात मित्रांना मारहाण का केली? असे विचारल्याचा राग आल्यामुळे मनोज नथ्थू पाटील, आशीर्वाद लकडू पाटील, आबाजी रघुनाथ पाटील, बाळा पहेलवान, बबलु पहेलवान, दुर्गेश मराठे, बाबाजी पाटील, मयुर चौधरी, शुभम पाटील व उमेश पाटील (सर्व रा.एरंडोल) यांनी तीक्ष्ण हत्यार, लाठ्या काठ्या व दगडांनी डोक्यावर व हातावर मारहाण करून जखमी केले. यावरून 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या गटातर्फे प्रा.मनोज नथ्थू पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि.5) दादासाहेब पाटील महाविद्यालयात जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धा सुरु असतांना पंकज नेरकर याने एका मुलीची छेड काढली. छेड काढल्याबाबत त्यास विचारणा केल्यामुळे त्याचा राग मनात ठेऊन पंकज नेरकर, दशरथ बुधा महाजन, पवन महाजन, भरत महाजन, राहुल उर्फ केटली महाजन (सर्व रा.एरंडोल) यांनी तलवार, रॉड व दगडांनी हल्ला करून मारहाण करून जखमी केले. याबाबत पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला.

या मारहाणीत मरण पावलेल्या खंडू उर्फ उमेश पाटील याच्या आईचा तो केवळ एक वर्षाचा असतांना मृत्यू झाला होता. तो आपल्या मामाकडे एरंडोल येथे राहत होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेले दशरथ महाजन हे माजी नगराध्यक्ष असून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत. तर पंकज नेरकर यांनी दिलेल्या तक्रारीतील संशयित प्रा.मनोज पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक असून दुसरे संशयित बबलू चौधरी हे देखील नगरसेवक आहेत. स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे आजची घटना घडली असून शहरातील गुंड प्रवृत्तीच्या युवकांवर स्थानिक पोलिसांचा कोणताही वचक उरला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शांतता प्रिय शहर म्हणून ओळख असणार्‍या एरंडोलची केवळ पोलिसांच्या बघ्याच्या भुमिकेमुळे बदनामी झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*