Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगावात सकाळी तुरळक गर्दी… दुपारी शुकशुकाट… सायंकाळी रांगा

Share
जळगाव । जळगाव लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. शहरातील स्व. भिकमचंद जैन मनपा शाळा क्रं1,जळगाव मनपा उर्दू शाळा क्रं 15, एस.एम.आय.टी, कॉलेज, प.न.लुंकड शाळा, आदर्श मतदान केंद्र प्रोग्रेसिव्ह इंग्लीश मीडियम स्कूल, नूतन मराठा महाविद्याल यासह शहरातील विविध मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजेच्या सुमारास तुरळक गर्दी होती. तर काही बुथच्या केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. दुपारी 12.30 ते 3 वाजेच्या दरम्यान शहरातील बहुतांश केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मतदारांच्या काही प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या. संवेदनशील केंद्रावर बंधुकधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील स्व.भिकमचंद जैन मनपा शाळा क्रं1,मध्ये 45 ते 52 असे बुथ केंद्र होते. या 8 बुथ केंद्रांवर सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान फक्त दोन बुथवर मतदारांच्या रांगा होत्या. तर काही बुथ केंद्रावर सकाळपासूनच शुकशुकाट दिसून आला. दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत या केंद्रांवर शांतता असल्याने मतदान कर्मचारी व अधिकारी मतदारांची प्रतीक्षा करताना दिसत होते. शहरातील मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मशीन यंत्राची जोडणी करण्यातच अर्धा तासाचा वेळ लागल्यानंतर 8 वाजता खरी मतदानाला सुरुवात झाली. खुबचंद सागरमल विद्यालय शिवाजीनगर या केंद्रावर मतदानाचे 10 बुथ लावण्यात आले होते. सकाळी 8.30 ते 9.45 वाजेच्या दरम्यान या केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. 10 वाजेनंतर बुथ क्रमांक 12 व 36 वगळता या केंद्रावर गर्दी नव्हती. मात्र बहुतांश मतदान केंद्रांवर सायंकाळी रांगा लागलेल्या होत्या.

सखी मतदान केंद्रावर तहसीलदारांची सेल्फी
या केंद्रांवर तहसीलदार वैशाली हिंगे, अप्पर तहसीलदार अभिजीत जाधव यांनी भेट दिवून पाहणी केली. तसेच तहसीलदार हिंगे यांनी गेटजवळ मतदानाचे लावलेले कटआऊट सोबत मतदानाची सेल्फी काढली. तसेच या केेंद्रावर येणारे शिक्षक-शिक्षिका व युवतींनाही आपल्या सेल्फिचा मोह आवरला गेला नाही. या केंद्रावर हिरकणी कक्ष, थंड पाण्याची व्यवस्थेची सुविधा उपलब्ध केलेली होती.

रांगोळीतून दिला मतदानाचा संदेश
गणेश कॉलनी परिसरातील प.न.लुंकड कन्या शाळेत 188 ते 193 असे बुथ केंद्र होते. या क्रेंदाच्या गेटजवळ सुंदर व सुबक अशी रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीत‘लोकशाहीचा ठेवू या मान, शंभर टक्के करू या मतदान’ असा संदेश दिला होता. तसेच बोटावर शाई, बळकट लोकशाही, असे फलकांवर संदेश लिहिलेले दिसून आले. गेट परिसरात बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आलेले असल्याचे चित्र होते.

20 वर्षीय युवतीने प्रथमच केले मतदान
20 वर्षीय युवती सायली उदय जोशी रा. गणेश कॉलनी, या युवतीने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 वाजता मतदान करणार होती. प्रथमच मतदान करणार असल्याने मनात भीती होती. मात्र, मतदान केल्यानंतर आपण एक सुजाण नागरिक झाल्याचा अभिमान वाटतोय, असे सायलीने सांगितले.

बीएलओच्या स्टॉलवर नाव शोधण्यासाठी गर्दी
शहरातील खुबचंद सागरमल विद्यालय परिसरात बीएलओंनी पेंडाल टाकलेला होता. या पेंडालवर नाव शोधण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. तसेच मनपा शाळा क्र. 1 च्या बाहेर पोलीस चौकीजवळ बीएलओंनी पेंडाल टाकला होता. तसेच इंद्रप्रस्थनगर, मनपा ऊर्दू शाळा परिसर, एसएमआयटी कॉलेज, गणेश कॉलनी, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा आदी परिसरात मतदान केंद्राच्या परिसरात बीएलओंनी लावलेल्या पेंडालवर नावे शोधण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पहावयास मिळाली.

आदर्श मतदान केंद्रांवर फुग्यांचे डेकोरेशन लक्षवेधी
गणेश कॉलनी परिसरातील प्रोगे्रसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल या याठिकाणी 184 ते 187 असे चार केंद्र होते. आदर्श मतदान केंद्र म्हणून नाव देवून या केंद्राच्या गेटच्या कमाणीवर फुग्यांची सजावट करुन हे मतदान केंद्र आकर्षक आणि सुंदर करण्यात आले होते. गेटपासून ते मतदान केंद्रापर्यंत जमिनीवर मॅट टाकण्यात आली होती. आजुबाजूचा परिसरही फुग्यांनी सजविण्यात आलेला होता. या केंद्रावर रेणुका राजाराम येवले (वय 98 रा. श्रीकृष्ण कॉलनी ) या वयोवृध्द आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला.

जिवंत मतदाराला दाखविले मयत
जुने जळगावातील आंबेडकर नगरातील रहिवासी बाविस्कर नामक व्यक्तीचे शाळा क्रं. 22 मध्ये मतदान असल्याने ते केंद्रस्थळी गेले. त्यांनी यादीत नाव शोधल्यानंतर यादीमध्ये चक्क मयत असल्याचा उल्लेख आढळून आला. त्यांनी मतदान केंद्र अधिकार्‍यांकडे तोंडी तक्रार केली. मात्र,प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त करुन मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.

मनपा उर्दू शाळा क्रं 15 वर बंदुकधारी पोलीस तैनात
शहरातील गेंदालाल मिल परिसरात मनपा उर्दू शाळा क्रं 15 असून हा भाग संवेदनशील असल्याने या केंद्रांवर बंधुकवारी पोलीस तैनात करण्यात आले होते. मनपा उर्दू शाळा क्रं 15 वर 23 ते 31 असे 9 बुथ केंद्र होते. सकाळी 8 वाजेच्या सुमारास या केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या तर 10 वाजता तुरळक प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर 30 नंबर केंद्र वगळता या भागातील केंद्रांवर अल्पप्रमाणात मतदार दिसत होते. दुपारी या के्रंद्रावरही शुकशुकाट दिसून आला.

नवमतदारांमध्ये उत्साह
मनपा शाळा क्रं. 3 व काशीबाई कोल्हे शाळेत बरेचसे मतदार हे प्रथमच मतदान करीत होते. त्यांची नावे प्रथमच मतदार यादीत आल्याने त्यांच्या चेहर्‍यावर एक समाधान व चैतन्य दिसत होते. अनेक मतदार हे रांगेत उभे असतांनाही नवयुवक जल्लोष करीत होते. प्रथमच मतदान करीत आहोत याचे समाधान त्यांना होते. यात तरुणांसह तरुणींचाही समावेश होता.
मनपा शाळा क्रं .3 जुन्या जळगावमध्ये येत असून येथे मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. तसेच का.उ.कोल्हे शाळेतही मतदारांची गर्दी 1 वाजेपर्यंत बर्‍यापैकी दिसून आली. प्रथमच मतदान करणार्‍या तरुणांपासून ते वृध्दांपयर्र्त मतदारांचा समावेश यावेळी दिसून आला.

पावत्या नसल्याने मतदार वंचित
अयोध्यानगरात रायसोनी शाळा व सिध्दी विनायक शाळेत मतदान केंद्र होते. रायसोनी शाळेत 217 पासून 227 पयर्ंत अशी 10 केंद्रे होती. सकाळी 11 वाजेपर्यंत मतदार तुरळक प्रमाणात मतदान केंद्रावर होते. नंतर मात्र गर्दी कमी होत गेली. मतदारांना घरापर्यंत मतदारांच्या नावे पावत्या मिळाल्या नसल्याने मतदारांचा गोंधळ उडत होता. पावत्या नसल्याने मतदानास उशीर होत होता. यामुळे बहुतेक मतदार नाराजी व्यक्त करीत असल्याचे अविनाश पाटील, हर्षदा पाटील आदी मतदारांनी सांगितले.

मतदार यादीत नाव सापडत नसल्याने उडाला गोंधळ
जळगाव शहरात सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून आला आहे. शहरातील बराच प्रभागात मतदान पावत्या मतदारांपयर्ंत पोहचल्या नव्हत्या. तसेच मतदार यादीत देखील नाव सापडत नसल्याने मतदारांचा चांगलीचा गोंधळ उडाला होता. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी बीएलओ व कार्यकर्त्यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली होती. प्रशासनाच्या देखील मतदान पावत्या मतदारांपर्यंत पोहचल्या नव्हत्या. नावे शोधण्यासाठी युवाशक्ती फाऊंडेशनच्यावतीने काव्यरत्नावली चौक व पांडे डेअरी चौकात मतदार मदत कक्ष सुरु करण्यात आले होते.

मतदार याद्यांमध्ये घोळ
बर्‍याच प्रभागातील मतदारांची नावे यादीत नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. काही मतदारांची नावे दुसर्‍या प्रभागातील यादीत असल्याने चांगलाच घोळ झाला होता. नावे शोधण्यासाठी कार्यकर्त्याची चांगलीच तारांबळ उडाली होती.

वयाच्या नव्वदीतही आजीबाईंचे मतदान
चौबे शाळा केंद्रावर एका वृध्द महिलेने मतदान केले. महिलेचे वय अंदाजे 90 वर्षे होते. पारसराम जैन यांच्या घरातील या ज्येष्ठ महिला असून एका फोर व्हिलर गाडीने त्या महिलांना नातेवाईकांनी मतदान केंदावर आणले होते. तसेच दायमा शाळेत मतदान केंद्र क्र. 122, 123 ते 128 पर्यंत मतदान केंद्र होते. गुरुनानक नगर, शनिपेठचा काही भाग, बळीराम पेठ तसेच रेल्वे पटरीपर्यंतच्या भागातील मतदारांनी या केंद्रावर हक्क बजावला.

चौबे शाळेत चांगला प्रतिसाद
चौबे शाळेत कें द्र क्र.116 पासून ते 126 असे मतदान केंद्र होते. या केंद्रात भवानी पेठ, कांचन नगर, शनिपेठ, सराफ बाजार या भागातील नागरिकांचे मतदान आहे. इस्लामपुरा येथील शाळा क्र.10 मध्ये 5 केंद्रे होती. येथे मतदारांची संख्या कमी होती. कमी याद्या व नगण्य मतदार असल्याने येथे शांततेत मतदान झाले. या मतदान केंद्रांत शक्यतो वाढीव नावे असलेले मतदारांचा भरणा अधिक होता. त्यामुळे नावे शोधणार्‍यांची गर्दी दिसून आली.

नावे सापडेनात, मतदार संभ्रमात
चौबे शाळा, चौबे शाळेजवळील दायमा शाळेत बहुतेक मतदारांची नावे सापडत नव्हती. हाच प्रकार नूतन मराठा शाळेतही दिसून आला. बरेच मतदार नावे सापडत नसल्याने इकडून तिकडे नुसते नावे शोधत फिरतांना दिसत येत होते.

तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
शहरातील गोलाणी मार्केट व गेंदालाल मिल परिसरात राहणार्‍या तृतीयपंथीयांनी शिवाजीनगरातील मतदान केंद्रावर दुपारी जावून मतदानाचा हक्क बजाविला. गोलाणी मार्केट परिसरातील राणी जान, संजना जान, कल्याणी जान, अर्चना जान, रेखा जान, रुपा जान यांच्यासह तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजाविला.

महिला पोलिसाने घेतली आजी-आजोबांची काळजी
शहरातील एम.जे.कॉलेज परिसरातील भोईटे शाळेत मतदान केंद्रावर वयोवृद्ध आजी-आजोबा मतदानासाठी आले असता त्यांची काळजी एका महिला पोलिसाने घेतली. मतदानाच्या रांगा असल्याने या आजी-आजोबांना एका बेंचवर बसवून काळजी घेतल्याचा प्रत्येय या केंद्रावर दिसून आला.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!