लवकरच आमदार एकनाथ खडसे होणार नामदार?

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळात फेरबदलाचे संकेत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राज्य दौर्‍यानंतर मंत्रीमंडळातील संभाव्य साफसफाईबाबत खान्देशात कमालीची उत्सुकता लागली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नुकताच मुंबई दौरा होवून गेला. दोन दिवसाच्या या दौर्‍यात अमित शहा यांनी भाजपातील मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या आढाव्यात निष्क्रीय मंत्र्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान पक्षाध्यक्ष शहा यांनी भाजपाच्या कोअर कमेटीची बैठक देखील घेतली होती. जळगाव जिल्ह्यातून या कोअर कमेटीत राज्याचे माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

गेल्या वर्षभरापुर्वी विविध आरोपांवरुन खडसेंना मंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर आ.खडसे यांनी पक्षांतर्गत होत असलेली गळचेपी अनेकदा बोलून देखील दाखवली होती.

तसेच जिल्हा बँक आणि जिल्ह्यातील विकास कामांवरुन त्यांनी सरकार विरुध्द देखील विधाने केली होती. अशातच विरोधकांकडून काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेतील यात्रेकरुंची खडसेंच्या निवासस्थानी झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती.

त्याचे पडसाद देखील विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उमटले होते. मात्र अमित शहा यांच्या दौर्‍यात खुद्द शहा यांनी आ.खडसे यांना हात धरुन भोजनस्थळी नेल्याचे समजते.

तसेच कर्जमाफीच्या निर्णयावर देखील त्यांनी अनुकूल प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.

दोन दिवसापुर्वीच जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री अणि पंतप्रधानांची टिंगल करणार्‍या शिवसेनेचा त्यांनी नाव न घेता खरपूस समाचार घेतला होता.

शिवसेना आणि आ.खडसे यांच्यातील संबंध अवघ्या राज्याला परिचित आहेत. एव्हाना युती तोडण्याची घोषणा भाजपाने आ.खडसे यांच्याकडूनच करुन घेतली होती.

राज्यात पुढील दोन वर्ष हे भाजपासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या दौर्‍यानंतर मंत्रीमंडळात साफसफाई होण्याची जोरदार चर्चा आहे.

या संभाव्य साफसफाईत खान्देशातील वजनदार नेते म्हणून आ.एकनाथराव खडसे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

त्यामुळे मंत्रीमंडळातील या संभाव्य साफसफाईबाबत खान्देशात मोठी उत्सुकता लागली आहे.

 

LEAVE A REPLY

*