Type to search

Breaking News जळगाव

सरकार कोणाचेही बसवा, मात्र तिढा सोडवा

Share

जळगाव – 

शासनाने अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना  हेक्टरी आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. परंतु, शेतकर्‍यांचा खर्च, पिकांचे झालेले नुकसान व आता रब्बीसाठी लागणारा खर्च लक्षात घेता शासकीय मदत अतिशय तोकडी आहे. त्यामुळे   नुकसान लक्षात घेऊन तरी कोणाचेही सरकार बनवा मात्र, तिढा सोडवा, अशाच भावना शेतकरी गावोगावी बोलून दाखवीत असल्याचे माजी कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगीतले.

या वेळी खडसे यांनी मात्र, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे टाळत पक्षाकडून आदेश असल्यामूळे मी काहीही बोलू शकत नाही, असे सांगितले.

दिल्ली येथे पीक विमा कंपनीच्या अधिकार्‍यांपुढे शेतकर्‍यांचे गर्‍हाणे मांडून आल्यानंतर खडसे बुधवारी जळगावातील त्यांच्या ’मुक्ताई’बंगल्यावर देशदूतशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, शेतकर्‍यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, जिल्ह्यातील बहुतेक शेतकर्‍यांनी कर्ज घेतले असून त्यांचा खरीप पिकासाठी पीकविमा काढण्यात आलेला आहे.

त्यासाठी दोन हेक्टरची अट असून ज्यांची शेती त्यापेक्षा थोडी जास्त आहे, अशा शेतकर्‍यांना शासकीय नियमामुळे पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. अशा सर्व शेतकर्‍यांना सरसकट विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे व जिल्हा बँकेचे एम.डी. जितेंद्र देशमुख यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर सौम्या व चेअरमन यांच्याकडे दिल्लीतील बैठकीत केलेली आहे, असेही माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. याबाबत प्रशासनानेही गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा

ते पुढे म्हणाले की, ओरिएन्टल इन्शुरन्सच्या कंपनीच्या अधिकार्‍यांनी याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे एकही पीक व्यवस्थित हाती आलेले नाही. त्यात घेतलेल्या कर्जाची वसुली, वीज बिल भरण्याची सक्ती होत आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा.

जेणेकरुन संबंधिताना शासकीय सवलतीचा लाभ घेता येईल. शेतर्‍यांचे कर्ज, वीज बिल वसुली मोहीम स्थगित होईल. आता रब्बी हंगाम आणि पुढील वर्षी पुन्हा खरीप हंगामात पेरणीचा खर्च या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर त्यांना देण्यात आलेली हेक्टरी आठ हजार रुपये ही रक्कम तोकडी आहे.

त्यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपये भरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. अनेक शेतकर्‍यांना विमा रक्कम मिळण्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्याही दूर करण्यात याव्या व सरसकट सर्व शेतकर्‍यांना मदत मिळावी.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!