खान्देशातील प्रकल्प रद्द केल्यामुळे आ.खडसे भडकले

0
मुंबई । दि.31 वृत्तसंस्था-खान्देशातील महत्त्वाचे मंजूर प्रकल्प कोणतंही कारण न देता रद्द केल्यामुळे आ.एकनाथराव खडसे आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून खडसेंनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
खान्देशातील कृषी अवजार संशोधन केंद्र, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, पशू वैद्यकीय महाविद्यालय हे मंजूर प्रकल्प नामंजूर का केले? प्रकल्पासाठी जमीन संपादन पूर्ण झाले असतानाही प्रकल्प रद्द का केले असा जाब खडसेंनी विचारला.

प्रकल्प रद्द होणं हा खडसेंना विरोध आहे का जळगाव का खान्देशला विरोध आहे, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे. पडद्यामागून राजकारण कोण करतंय याचा मी शोध घेत आहे पण सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी खडसेंनी केली.

उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय का? सगळीकडचे प्रकल्प होत असताना खान्देशचे प्रकल्प रद्द का? हा अन्याय जाणीवपूर्वक केला जातोय का? असे सवाल आ. खडसेंनी आपल्याच सरकारला विचारले आहेत.

खडसेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. खडसेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे पटलावर ठेवण्याची मंत्र्यांची भूमिका होती पण आपल्याला आत्ताच उत्तरे हवी आहेत, असं खडसे म्हणाले. शेवटी खान्देशातील प्रकल्प रद्द केले जाणार नाहीत असं आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिलं.

 

LEAVE A REPLY

*