Type to search

Breaking News जळगाव

समीक्षण – उत्कृष्ट कलाविष्काराची अनुभूती-जिहाद

Share

 

संभाजी राजे नाट्यगृहात साकार होत असलेली 59व्या  हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धा जसजशी पुढे सरकतेय तसतशी तिची उत्कंठा वाढू लागतेय आणि रोज एक से बढकर एक असे कलाविष्कार या स्पर्धेत सादर होत आहेत. आज स्पर्धेत मध्य प्रदेश मराठी अकादमी आयोजित, अमोल रेडीज लिखित, पंकज वागळे दिग्दर्शित जिहाद ही कलाकृती सादर झाली.

जिहाद या शब्दाविषयीच आपल्यात अनेक गैरसमज आहेत. याचे कारण समाजातील भरकटलेल्या गटाने केलेल्या चुका आणि आंतरराष्ट्रीय राजकीय षड्यंत्र. बिगर मुस्लिम मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करणे इतकाच मर्यादित अर्थ आपण  जिहाद संदर्भित मानत आलोय आणि मग या धर्मांतराची पाळंमुळं दहशतवादापर्यंत पोहोचतात.

खरं तर जिहाद हा शब्द अरबी आहे. इस्लाम धर्मानुसार जिहाद म्हणजे संघर्ष, संग्राम. एक उत्कृष्ट मुस्लिम बनण्यासाठी केलेला संघर्ष  म्हणजे जिहाद. श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय जेव्हा संकटात येते तेव्हा करण्यात आलेला संग्राम म्हणजे जिहाद. आणि या संग्रामासाठी करीत असलेलो  प्रयत्नांची पराकाष्ठा. आंतरिक आणि बाह्य बदल घडवण्यासाठी वापरत असलेले प्रसार माध्यमे, लेखणी हेसुद्धा जिहादचे रूप आहे, असे अनेक चांगले अर्थ जिहादचे निघतात…

आजच्या नाटकाची कथा म्हणजे एक प्रकारचे धर्मयुद्ध  होते.स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटूनसुद्धा आपल्यात असलेली हिंदू मुस्लिम समाजातील दुफळी भरून निघाली नाही. दोघांना आपला धर्म जोपासायचा आहे, आपली अस्मिता जिवंत ठेवायची आहे. मात्र, या द्वेषात आपला भारत देश धोक्यात येत आहे. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. हिच धर्म समभावनेची संकल्पना पुढे आणून नाटकाची सुरुवात होते. मुंब्रा या मुंबईतील उपनगरातील सलीम नामक  मुस्लिम गृहस्थाची ही कथा आहे. त्याचा मुलगा समीर याची मधुरा नामक मुलीशी कॉलेजला मैत्री  असते. ही मैत्रीण समीरला  कॉलेजच्या जीएसच्या निवडणुकीसाठी प्रवृत्त करीत असते आणि यासाठी ती सलीमचा होकारही मिळवते. मधुरा ही सलीमच्या घनिष्ठ मित्र राजूची मुलगी असते. ज्या दोघांनी शहरातील  लोकांनां न्याय मिळवून देण्यासाठी काही अपराध केले असतात. मात्र, मधुराची आईने हे सारं तिच्यापासून लपवले असते  आणि ती आपल्या पित्याला गुंड मानत आलेली असते. मात्र, सलीम तिला त्या दोघांचा जीवन प्रवास सर्व सांगतो आणि तिचे मत परिवर्तन होते. त्यादरम्यान समीर निवडणूक हरतो आणि त्याचे खापर  स्वतःच्या अकार्यक्षमतेवर न फोडता वडिलांवर फोडतो. कारण वडिलांनी मदत केली असती  कारण  सलीमचा कधी काळी सोबत असलेल्या मनसुख  शर्माचाच मुलगा रणजित त्याच्याविरुद्ध उभा  असतो. मात्र,  समीर हा सतत  हसनसारख्या हिंदूविरोधी  मित्रासोबत असल्याने त्याचा हिंदूंबद्दलचा तिरस्कार वाढतच असतो…आणि आपल्या पराभवाचे  मूळ कारण आपण मुस्लिम असल्याच तो मानतो आणि याविरुद्ध बंड पुकारण्यासाठी जिहादचा मार्ग चुकीच्या पद्धतीनं स्वीकारतो. तो  अतिरेकी संघटनेला  जाऊन मिळतो आणि इस्लाम खतरे में हैं या  शिकवणुकीला बळी पडतो. मधुरा समीरच्या प्रेमात असल्याने तिला त्याच्याशी लग्न करायचे असते. मात्र, सलीम तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो आणि तिची आईसुद्धा त्याच्याशी संबंध तोडण्याची  भाषा करते. पण ती ऐकत नाही. समीर मात्र हळूहळू  एक एक गुन्हा करीत राहतो. अशातच एटीएस अधिकार्‍याचा खूनही त्याच्या हातून घडतो आणि  पुढे सर्वात मोठे दहशतवादी कृत्य त्याच्या हातात येते. व्ही.टी. दादरसारख्या शहरात  बॉम्बस्फोट घडवून आणून निरपराध लोक मारण्याचा..आणि  याची खबर सलीमला लागते. तेव्हा तो देशापुढे धर्म, नाते, रक्त, सर्व थिटे असे मानून  देशाच्याविरुद्ध वागायला कोणालाच अधिकार नाही, म्हणून एक कठोर निर्णय घेतो. आपण आपल्य मुलाला एक वेळ गुंड बनलेला पाहू शकलो असतो मात्र एक अतिरेकि बनलेला पाहू शकत नाही. ते देशाच्या विरुद्ध आहे म्हणून तो आपल्या मुलाच्या नकळत लपवलेल्या रिमोटने समीर वरच स्फोट घडवून आणून त्याला संपवतो..अशी देशभक्ती घडवणारी आजची दमदार अशी संहिता होती.. कथेची पृष्ठभूमी पाहता वापरण्यात आलेले हिंदी शब्द, उच्चार अतिशय सुंदर वापरले गेलेत…यासाठी लेखक अमोल रेडीज यांचे विशेष कौतुक आहे…दिग्दर्शक, अभिनेता पंकज वागळे यांनी दोन्ही बाजू अतिशय समर्थपणे पेलल्या..त्यांचा रंगमंचावरील  वावर, संवादफेक लाजवाबच….निकुंज जयस्वाल यांचे नेपथ्य चपखल…अनुरूप…निवेदिता वागळे यांचे ध्वनि संयोजन इतक क्लास की थेटर फिलचा अनुभव आला…प्रमोद रिसबुड यांची प्रकाश योजनाही अतिशय प्रभावी..समीर-अमोल लोखंडे, मधुरा -जानव्ही वाईकर, रेहमान -प्रमोद रिसरूड, नीता-पल्लवी  रिसबुड, हसन-प्रमोद चौधरी या पात्रांनी आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला..अंगभूत अभिनय करवून घेण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले. एकूण तंत्रशुद्ध कलाविष्कार आज पाहायला मिळाला आणि खर्‍या अर्थाने स्पर्धा सुरु झाली असे वाटू लागले. आज मध्यंतरात नाटकाचे दिग्दर्शक यांचा सत्कार करण्याचा मान प्रदीप रस्से यांना मिळाला.

समाजातील अराजकता थांबवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आंतरिक विचारशक्तीने समाजात परिवर्तन घडवण्यास प्रयत्न करणे आणि आधी स्वतःच्या आतील दुर्गुणांविरुद्ध, आपल्यातील वाईट सवयी जसे माया, क्रोध, द्वेष इ.  पसरविण्याविरुद्ध आपण संघर्ष केला पाहिजे, तेव्हाच जिहादचा खरा उद्देश, अर्थ सफल होईल. हा सामाजिक आणि तितकाच परिवर्तनशील विचार या नाटकाने समाजाला दिला. जिहाद नाटकास आणि समस्त टीमला भावी निकालासाठी शुभेच्छा.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!