Type to search

maharashtra जळगाव

समीक्षण : विरहशून्य नाटक- शकुंतला एक विरह

Share

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात साकार होत असलेली 59व्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेत आज संध्या 7 वाजता डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव आयोजित, सौ. रुपाली गुंगे लिखित, अश्विनी भालकर दिग्दर्शित शकुंतला हे नाटक सादर झाले.

जसजशी ही राज्य नाट्य स्पर्धा उत्तरार्धात येतेय, तसतसे नाटकांचे नवनवीन विषय येताय..राजकारण, समाजकारण, देशभक्ती, रंगभूमी असे विविध विषयांवर होत असलेले नाट्यप्रयोग हीच या स्पर्धेची गरज आणि प्रबोधन आहे.

नाटक हे असं प्रभावी माध्यम आहे, ज्यामार्फत थेट  प्रेक्षकांच्या, जनतेच्या मनापर्यंत भिडता येते. आजचा विषय या सर्वांपेक्षा वेगळा असला तरी पौराणिक कथेचा मराठीत केलेले नाट्य रूपांतरण हेसुद्धा कौतुकास्पद आहे.

प्रेम ही अशी व्यापक गोष्ट आहे की, यावर कितीही लिहिले अथवा सादर केले, तरी ते कमी आहे. या प्रेमामुळे येणारा दुरावा, मनाला लागलेली ओढ, त्यातून होणारा त्रास आणि भविष्यात सुखद अनुभव मिळावा, यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे विरह..आणि हा विरह आहे शकुंतलेचा. तस तर शकुंतला दुष्यंत प्रेमकथा सर्वश्रुत आहे. दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडून गांधर्व पद्धतीने  विवाह केलेला असतो. आणि आपली आठवण म्हणून राजा शकुंतलेस अंगठी देतो.

मात्र, पुढे प्रेममग्न शकुंतलेस दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे राजा सर्व झालेला विवाह विसरतो आणि जी अंगठी आठवण म्हणून दिली असते, तीही शकुंतलेकडून हरवल्याने दुष्यंत शकुंतलेचा स्वीकार करीत नाही. पुढे ही अंगठी कोळ्यास सापडते आणि ती राजापुढे सादर केली  असता राजाची स्मृती परत येते.

इंद्रदेवाच्या आदेशानुसार दैत्यांचे वध करण्यासाठी राजा मातली सह स्वर्गात जातात आणि कार्यपूर्तीनंतर वायुमार्गाने जात असताना मारीच आश्रमात येतात. तेथे एका बालकास पाहून त्यांना त्या बालकाचा लोभ होतो.

मारीच त्यांना तो बालक शकुंतला आणि दुष्यंत यांचाच मुलगा असल्याचे आठवण करून देतात आणि तो बालक भरत या नावाने लौकिक मिळवेल, असा आशीर्वाद देतात. अशी सुखांत शेवट असलेली शकुंतला-एक विरह या नाटकाची कथा.

मात्र, या नाटकाच्या संहितेत असलेला विरह सादरीकरणात कुठेच दिसला नाही, हे विशेष नमूद करावयास वाटते. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर  जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या नाट्यशास्र विभागाकडून असल्यामुळे नवीन विद्यार्थिनींच्या उत्सहाला गुण द्यावे लागतील.

त्यांचे वय पाहता त्यांच्या  सादरीकरणाला दाद द्यावी लागेल. मात्र, तरीही स्पर्धेत असल्यामुळे सराव हा असावाच, हे अधिरेखित करते.

आणि नाट्यशास्र विभागाचे नाटक असूनही 2 तासही प्रयोग सादर न होणे, हे अपेक्षित नव्हते. प्रमुख दुष्यंतचे पात्र रेखाटणारे कुणाल दंडगव्हाळ यांची हळूहळू पाठांतरावरील संपूर्ण पकड गेली आणि त्यांचा अंडर टोनमधील संवादफेक खूपच खटकली.

अनुसया (काजल तायडे), प्रियंवदा (शालिनी कोळी), शकुंतला (अश्विनी भालकर) गौतमी (भाग्यश्री पाटील) यांनी आपल्यापरीने न्याय दिला.

कश्यप (प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे) मारीच (प्रतीक जोशी), दुर्वासा (योगेश्वर  चौधरी) यांचाही अभिनय पाठांतरीय बेसवर ओके. मात्र, किशोर निकुंब यांनी सादर केलेले कन्चुकी अतिशय अभिनयशून्य. त्यांच्या पेक्षा सर्वात भारी दाद शकुंतलेच्या मुलाचे पात्र करणार्‍या 4 वर्षाच्या लहानग्याने (अभिनव धुमाळ) उत्तम संवादफेक करून टाळ्या घेतल्या.  बाकी इतर पात्रांकडून अभिनय करून घेण्यात दिग्दर्शिका अपयशी ठरल्यात.

नाटकाला किरण अडकमोल टच नाहीये, हे प्रकर्षाने जाणवले.पौराणिक कथेची संहिता निवडताना स्पर्धेत नाटक सादर करताना इशा कदम यांच्या नेपथ्यात हवे तसे काहीही संदर्भ दिसले नाही.

लाकडी प्रॉपर्टी घेऊन पुराणकथा गुंफणे खटकलीच. भाग्यश्री पाटील यांची रंगभूषा ओके, पण तरीही गौतमीच्या रंगभूषेवर अधिक काम करणे गरजेचे होते. अक्षय गोबरे, कविता चौधरी यांचे संगीत बर्‍यात बरे असेच.

कारण काही ठिकाणी ओम-जय-जगदीशची आरती धून आणि कृष्ण मालिकेची बासरी धून हास्यास्पद वाटली. विद्या पाटे यांची वेशभूषा आणि कमलेश बारी यांची प्रकाश योजना ही मात्र जमेची बाजू.

पौराणिक कथेला शुद्ध प्राकृत मराठी साच्यात बसवण्याच्या  कठीण कामात लेखिका रुपाली गुंगे यांना यश आले. मात्र, अंगठीऐवजी अंगुठी हा हिंदी शब्द खटकत राहिला.

वारंवार होत असलेल्या ब्लॅक आऊटमुळे सातत्य राहत नव्हते आणि ब्लॅक आऊटमधील प्रॉपर्टीचे आवाज यामुळे सरावाचा अभाव जाणवत होता.

आजचे नाटक नवकलाकारांनी सादर केलेला एक हौशी प्रयोग होता, असेच म्हणावे लागेल. हौशी रंगभूमीला प्रोत्साहन  देणे हा स्पर्धेचा उद्देश असला, तरी स्पर्धा ही स्पर्धा असते तिथे तयारी ही असावीच लागते.

नाटक एक प्रेमकथा कथन करीत होते. संहितेत असलेला विरह  सदरीकरणातून हरवला होता. पात्रांच्या संवाद विस्मरणाने कलाकारांचा कमी झालेला आत्मविश्वास जाणवला आणि उत्तरार्ध पूर्णपणे ढासळला.

एकूणच स्त्री पात्रांनी तारले आणि पुरुष पात्रांनी मारले, असे सादरीकरण आजच्या नाटकाचे होते. आज मध्यंतरात नाटकाच्या दिग्दर्शिका अश्विनी भालकर यांचा सत्कार  जनशक्तीचे संपादक युवराज परदेशी यांनी केला.

काही आठवणी विसरता येत नाही, काही नाती तोडता येत नाही, माणसे दुरावली तरी मने दुरावत नाही, अशी प्रेमातील समर्पण आणि त्याग शिकवणारी  तसेच विरहातून हृदयाला होणार्‍या वेदनेची तीव्रता स्पष्ट करणारे आजच्या नाटकाची कथा होती, इतकंच मी सांगू शकते. नाटकाला भावी निकालासाठी  हार्दिक शुभेच्छा.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!