Type to search

Breaking News जळगाव

समीक्षण – मार्गदर्शनाची नितांत गरज असलेले-पंचम

Share

संभाजीराजे नाट्यगृहात साकार होत असलेली 59व्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेत सहावे पुष्प आज भारतीय साहित्य सांस्कृतिक कला विकास मंच आयोजित, वैभव भंडारी लिखित, संजय तारांबळे दिग्दर्शित पंचम या नाटकाने गुंफले.

लोकशाही हा आपल्या देशाचा भक्कम आधार आहे. भारतीय जीवनाच्या आवश्यकतेनुसार जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचार प्रणाली आणि आचार धर्म येतात, ते आपल्या लोकशाहीच्या जीवन पद्धतीत येतात.

न्यायव्यस्था, कार्यपणाली, संसद, प्रसार माध्यमे ही केंद्रस्थाने प्रबळ असली की लोकशाही रुजते आणि टिकतेही. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षपद्धती हे महत्त्वाचे अंग आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षास धोरणे, तत्त्वे यांचे पाळत  करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र काही  संघटना, व्यक्ती देशाविरुद्ध कट कारस्थाने करून  देशात अराजकता निर्माण करतात. अशाच आशयाची आजची संहिता  लिहिलेली होती.

विश्वास या आयटी ऑफिसरला देशात घडणार्‍या वाईट घडामोडींची चीड आहे. त्याला इथल्या व्यवस्थेचा उबग आलाय आणि म्हणून तो नोकरी चा राजीनामा देतो आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, आपली स्वतःची एनजीओ काढतो. यात त्याला त्याची डॉक्टर पत्नी आस्था, मित्र मनीष, देवेंद्र  मदत करतो. मात्र, तशातच त्याची ओळख पंचम या समाजकंटकी, गैरकारवाया करणार्‍या व्यक्तीशी होते. हा पंचम  विश्वासच्या मनात जागा करून विश्वासला

पुरस्कार, पक्ष, सत्ता, मुख्यमंत्री, प्रसार माध्यमे असे अनेक प्रलोभने दाखवून  विश्वासचा मार्ग बदलवत असतो आणि एकावेळी विश्वासची एनजीओ आपल्या ताब्यात घेतो. त्यांचे संपूर्ण संगणकीय यंत्रणा हॅक करतो. मात्र, जे पंचमने अडकवलेले जाळे हे पंचमने नव्हे तर विश्वासचाच प्लॅन होता आणि पंचमचा डाव उलटा कसा हुशारीने परत फिरवला हे विश्वास अंती सांगतो. आणि जोपर्यंत या देशात विश्वास, आस्था, संयम, साधना जिवंत आहे, तोपर्यंत हा देश कोणी पोखरू शकत नाही, कोणी देशविरोधी कार्य करू शकत नाही, असा संदेश देऊन नाटक संपते.

नाटकाचा विषय  सद्यःस्थितीतील  असला तरी  संहिता अजिबात  दमदार नव्हती..एखादी साध सरळ कथासुद्धा उत्तम भाषा सौंदर्याने अलंकारीत होऊ  शकते. आभिनयिन अंगाने संपूर्ण नाटक कोलमडले…नाटकाला पहिल्या 5 मिनिटांतच प्रोमटिंगची गरज पडली आणि नाटकाने बेअरिंग सोडले. शशिकांत गोरवाडकरनी साकार केलेला विश्वास कोणत्याच अंगाने आयटी अधिकारी   वाटला नाही. ते जितके संवाद विसरत होते, त्यातील ही उरलेली वाक्ये वेगात आणि अशुद्ध उच्चारित होते. नाटकात वारंवार आणि जास्त वेळ थांबणारा ब्लॅक आऊट आणि त्यानंतरच्या प्रकाशातील उशिराचा प्रवेश खूपच अडथळा निर्माण करीत होता. श्रीकांत सूर्यवंशी यांची प्रकाशयोजना अतिशय निराशाजनक.प्रशांत साबळे यांचे नैपथ्य अपूर्ण वाटले. त्यातही एका प्रवेशात वापरलेले प्रॉप्स उचलले जात नव्हते. योगेश आलेकर यांचे  संगीत डोअर बेल व्यतिरिक्त आणि शेवटच्या देशभक्ती गीताशिवाय कुठेच ऐकू आले नाही. रंगमंचावरावरील   वावरताना होणार्‍या चपला बुटांचा आवाज हाच काय तेवढा साउंड इफेक्ट म्हणावा लागेल. ब्लॅक आऊटमध्ये बॅक स्टेजवरील धांदल, धडपडणे लक्षात येत होते. सुवर्णा गोरवाडकर यांची वेशभूषा फक्त स्त्री पात्रांपुरती दिसली.

एकूण सर्व अंगाने विस्कळीत झालेली अशी आजची नाट्यकृती होती.खरंतर हौशी नाट्य स्पर्धा म्हटली तर यातील सगळेच कलाकार व्यावसायिक नसतात. हौस म्हणून आपली सुप्तकला सादर करून दाद मिळवणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. जेणेकरून स्पर्धेला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळत असते. मात्र, स्पर्धेत उतरण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी आणि योग्य मार्गदर्शन घेणेही गरजेचे असते. आणि नेमकी हीच तयारी खूप कमी पडली. कलाकार सर्व नोकरदार कर्मचारी असल्याने सराव करण्यास पुरेसावेळ नसतो, मात्र नाटक हे फावल्या वेळात बसवण्याचे काम नव्हे. त्यासाठी सराव तो हवाच. भुसावळ टीमच्या हौशी सादरीकरणाचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक आहेच. मात्र,  त्यांनी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन नक्की घ्यावेच. भावी निकालासाठी नाटकाला आणि टीमला हार्दिक शुभेच्छा.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!