Type to search

maharashtra जळगाव मुख्य बातम्या राजकीय

जळगाव जिल्ह्यात सुमारे 60 टक्के मतदान

Share
जळगाव । लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी जिल्हयातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यत जळगाव लोकसभा मतदार संघात 58 टक्के तर रावेर मतदारसंघात 62 टक्के मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत किती मतदान झाले याचे आकडे गोळा करण्याचे काम सुरु असल्यामुळे ठोस टक्केवारी मिळू शकली नव्हती.

शहरी मतदारांमधे मतदानासंदर्भात किंचीतशी उदासीनता दिसून आली तर ग्रामीण भागात मात्र नवयुवकांपासून ते थेट वयोवृद्ध मतदारांमधे कमालिचा उत्साह दिसून आला. किरकोळ कुरबूरी वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

मंगळवारी सकाळी 8 वाजूमपासून जिल्हयाभरात मतदान प्रक्रियेला सुरवात झाली. जिल्हयात दोन्ही मतदार संघात मतदानासाठी एकुध 3617 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. जिल्हयातील मतदान प्रकियेस सुरूवात करण्यापूर्वी मॉक पोल घेण्यात आले होते. सकाळी आठ वाजेच्या सुमारास महापौर सीमा भोळे यांच्यासह पती आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील प्रतापनगरातील महाराणा प्रताप शाळेतील मतदान केंद्रावर जाउन मतदान केले. उद्योगपती अशोक जैन, विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्ल निकम यांनी देखिल सहकुटुंब शहरातील भोईटे शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर मतदान केले. माजी मंत्री सुरेश जैन यांनी गेंदालाल मिल परीसरातील उर्दू शाळेत मतदान केंद्रावर जाउन मतदान केले. तर सहकार राज्य मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी चक्क मतदान केंद्रावर रिक्षात येवून केले.

उमेदवारांचे मतदान
जळगांव लोकसभा मतदार संघातील उमेदवार हे चाळीसगांव तालुक्यातीलच असून महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी चाळीसगांव तालुक्यातील कळमडू येथील मतदान केंद्रात मतदान केले तर महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी दरेगांव येथील केंद्रात जाउन मतदान केले. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी येथे मतदान केले तर महाआघाडीच उमेदवार डॉ.उल्हास पाटील याचेसह त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील, मुलगी डॉ.केतकी पाटील यांनी विवरे येथे मतदान केले.

जळगांव तालुक्यातील वावडदा येथे सकाळी मतदान केंद्रावर काही वेळ मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. तात्काळ मतदान यंत्र दुरूस्त करण्यात आल्याने त्याचा मतदानावर कोणताही परीणाम झाला नाही. अनेक ठिकाणी मतदार यांदयांमधील नावे शोधण्यासाठी मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अनेक गावांना वर्षानुवर्षे मतदारांची नावे बुथवर येत होती. ती मात्र यावेळी त्या बुथवर न येता दुसरीकडेच असल्याने मतदारांना शोधाशोध करावी लागली होती.

जिल्हा प्रशासनाकडून दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी टक्केवारी उपलब्ध करून दिली जात असल्याने अनेकांनी मतदानाच्या सुटीचा आनंद घेत घरी बसूनच जिल्हयातील मतदानाची परीस्थिती जाणून घेतली.

जिल्हयात मतदानाची टक्केवारी पहाता सर्वात जास्त मतदान रावेर येथे 62.01 तर सर्वात कमी भुसावळ येथे 48.87 असे नोंदविण्यात आले आहे.

दोन्ही जागा प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार!
रावेर आणि जळगाव या दोन्ही जागा प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील, रावेरची जागा तर 3 लाखाच्या लीडने येईल, जळगावची जागादेखील अडीच लाखांच्या फरकाने निवडून येईल. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर भाजपाच निवडून येणार.
– ना.गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

युतीचे उमेदवार विजयी होणार!
प्रथमच निर्भयपणे नागरिक मतदानासाठी बाहेर निघाले. मतदान करणे आपले कर्तव्यच आहे. मध्यमवयीन, तरुण, म्हातारे सर्वच रांगेत होते. मतदार राजाचे आभार. शिवसैनिकांनी भाजपा उमेदवारांसाठी मनापासून काम केले. जिल्ह्यात युतीचेच उमेदवार विजयी होणार.
– गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री

माझा विजय निश्चित!
मतदानाची टक्केवारी थोडी घसरली असली तरी भाजपाला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत
माझा विजय निश्चित असून याचा पूर्ण विश्वास आहे.

निवडून मीच येणार!
लोक मोदींसह त्यांच्या जुमल्यांना कंटाळले आहेत. मोदींच्या ध्येय धोरणावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मीच निवडून येणार.

निवडून येण्याचा विश्वास!
मतदारांमध्ये दिवसभर उत्साह होता. मी केलेल्या कामाचे हे फलित असून मला निवडून येण्याचा विश्वास आहे. मतदारसंघातील जनता भाजपाला कंटाळली आहे.

माझा विजय पक्का!
मतदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली असून पंतप्रधान मोदींच्या विकासात्मक दृष्टीला जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळे माझा विजय पक्का आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!