Type to search

maharashtra जळगाव

धरणगाव तालुक्यातील तलाव, विहिरी, कुपनलिका कोरड्या ठाक!

Share
प्रा.बी.एन.चौधरी
धरणगाव । अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीन नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात व शहरात पाणी टंचाई आहे. विहिरी, तलाव कोरडे पडले असून शहरातून कुपनलिका बंद पडल्या आहेत. जनावरांना चारा नाही. प्यायला पाण्याचे दुर्भिक्ष आहे. शेतकरी शेतीची मशिगत करुन पाऊसाची वाट पहात आहे. शेतमजूर चिंताक्रांत आहे. तालुक्यात सर्वत्र भिषण दुष्काळ जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही भटकंती करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेली उपाययोजना तुटपुंजी असून अधिकची मदत होणे गरजेचे आहे. यामुळे तालुक्यातील पथराळ बु, पथराळ खू व पिंपळे या तीन गावातच पाणी टंकरद्वारे पुरवण्यात येत आहे.

35 विहिरींचे केले अधिग्रहण :
पाणी संकटावर मात करण्यासाठी तालुक्यात 35 गावांना विहरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आनोरे, वंजारी खपाट, सोनवद बु, सतखेडा, पथराळ बु/खू, धानोरा, बांभोरी बु, बोरखेडा, हिंगोणा खू, कल्याणे खू, झुरखेडा, फुलपाट, भामर्डी, गारखेडा, साकरे, मुसळी, भोद खू, वंजारी बु, खर्दे बु, खामखेडा, वराड बु/खू, पिंपळेसीम, पष्टाने, उखळवाडी, चावलखेडा, वाघळूद बु/खू, बाभुळगाव, गंगापुरी या गावांना 35 विहिरी अधिग्रहित करुन पिण्याच्या पाण्याची तात्पुर्ती व्यवस्था शासनाने केली आहे.

गिरणेचे पाणी अंजनीत सोडा :
अंजनी नदिकाठच्या गावांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. अंजनी धरणाखाली जवखेडे, हिंगोणे, कल्याणेहोळ, भोद, पिंप्री, चावलखेडा, वाघळूद, हणमंतखेडा, सतखेडा, सोनवद, अहीरे, उखळवाडी, चमगांव, बाभुळगावसह इतर गावं भीषण पाणी टंचाईग्रस्त आहेत. येथील अधिग्रहित विहिरी व बोअरवेल आटून चालले आहेत. तसेच 1जून पासून कापूस लागवड सुरू होत आहे, सध्या गिरणा धरणातून आवर्तन सोडलेले आहे. त्यातील काही पाणी अंजनी नदित सोडले तर सगळ्यांची तहान भागेल. त्या अनुषंगाने येणारे दिवस माणसांना आणि जनावरांना जगायला सोपे जातील. राजकारण आणि वैयक्तिक लाभाच्या गोष्टी दूर ठेवल्यास माणुसकी व जीवन दोघं ही जीवंत राहतील. ग्रामपंचायतीचा ठराव, अर्ज, मोर्चा, निवेदनं यांसाठी आता वेळ राहिलेला नाही. प्रशासनाने त्याची वाट पाहण्यापेक्षा स्वनिर्णय घेऊन अंजनी नदित पाणी सोडण्याची उदारता दाखवून जनतेचे आशीर्वाद घ्यावेत अशी मागणी होत आहे. शासनाने कठीण प्रसंगात पाणीपट्टी साठी वाट पाहत बसण्यापेक्षा टंचाई निवारण करण्यासाठी श्रेय घेतले तर फारच फायदेशीर ठरेल.

शहरातही पाण्याचा ठणाणा :
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पिंप्री येथून अंजनी नदीवरून तर धावडा येथून तापी नदीवरून पाणी आणले जाते. सध्या अंजनी कोरडी ठाक पडल्याने तेथील पाण्याचा उपसा थांबला आहे. धावडा डोह देखील आटण्याच्या बेतात आहे. सध्या शहराला 12 ते 15 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. पाणी साठवणं जिकरीचं आहे. पाणी येतं तेव्हा विनातोट्यांच्या नळांवाटे हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून जाते. न. पा. वारंवार सूचनादेवूनही नागरीक नळांना तोट्या बसवत नाहीत ही शोकांतिका आहे.

फिल्टरप्लँट शोभेचा पांढरा हत्ती :
मोठ्या प्रतिक्षेनंतर वाजत गाजत सुरु झालेला नव्या पाणीपुरवठा योजनेचा फिल्टर प्लँट हा सध्यातरी शोभेचा व दिखाऊच ठरला आहे. प्राथमिक चाचणी यशस्वी होवून पुर्णत्वास गेलेला हा प्लँट तुटपुंज्या पाणीसाठ्यात वापरणे अशक्य आहे. कारण त्याचा वापर करुन मोठ्याप्रमाणावर पाण्याची नासाडीच होणार आहे. जे सद्य परिस्थितीत परवडण्यासारखे नाही. म्हणून तो बंदच ठेवला आहे. हा प्लँट म्हणजे नपा. समोर बांधलेला पांढरा हत्ती असेच त्याचे वर्णन करता येईल.

वसाहती कोरड्या, टँकरची मागणी :
शहरातील हद्दीबाहेर असलेल्या अदमासे पंधरा नविन वसाहतींमध्ये सहा महिन्यापासून बहुतांशी बोरवेल बंद आहेत. या बोरवेल मधील पाणी नोव्हेंबर महिन्यातच आटल्याने वसाहतीमध्ये टँकरने पाणी आणून नगरवासी आपली तहान भागवत आहे.शहराच्या हद्दी बाहेर असल्याने नगरपालीका या वसाहतींना पाण्यासह नागरी सुविधा द्यायला तयार नाही. ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत ह्या वसाहती आहेत त्या ग्रामपंचायतींनीही हात वर करुन जबाबदारी झटकल्याने नगरवासीयांना हाल अपेष्टा सहन करव्या लागत आहे.

तालुका निर्मितीनंतर वाढल्या वसाहती :
पूर्वी शहरालगत अत्यल्प वसाहती होत्या.तसेच प्लाटींगचे भावही अत्यल्प होते.मात्र यूती शासनाच्या काळात 26 जून 1999 मध्ये धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली.अन् झपाट्याने शहरालगत वसाहती वाढल्या.व प्लाटींगचे भावही वाढले. चिंतामण मोरया नगर, गणाबाप्पा नगर, एरंडोल रोड लगत असलेल्या परिसरात हेडगेवार नगर, रामकृष्ण नगर, साठे नगर, पद्मालय नगर, लक्ष्मी नगर, गणेश नगर, हेमइंदू नगर, साहील नगर, अश्या अदमासे पंधरा वसाहती निर्माण झाल्या.या वसाहती मध्ये पाचशेवर कूटूंबांचा रहिवास आहे.या सर्व कुटूबांनी आपआपली बोरवेल करुन पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, मार्च पासूनच बोरवेल बंद पडतात.

पूर्वी दरवर्षी पावसाचे चांगला पाणी पडत असल्याने या वसाहतीमध्ये असलेली बोरवेल काही वर्षे चांगल्या चालल्या. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षापासून पावसाळ्यात पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाल्याने या वसाहतीमधील बहुतांशी बोरवेल मार्च महिन्यापासून आटतात. या वर्षी तर बहुतांशी बोरवेल नोव्हेंबर महिन्यातच आटल्याने वसाहतीमधील नागरीकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

दर वर्षी जून, जुलै महिन्यात पाऊस पडताच बोरवेलला पाणी येत असे. मात्र गेल्या वर्षी आगस्ट महिन्यातला श्रावण महिना लागूनही बोरवेल कोरडे पडलेले होते. त्या मुळे या वर्षी बोरवेल्स मध्ये पावसाळ्यात केव्हा पाणी येईल अशी चिंता वसाहती मधील रहिवाश्यांमध्ये दिसत आहे.

टँकर झाले महाग :
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून वसाहतीमधले बोरवेल आटल्याने या रहिवाश्यांना खाजगी मालकीचे पाणी टँकर मागवावे लागते.पाच हजार लिटर पाण्याच्या टँकरचे दाम त्यांना सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतअसल्याने त्यांची आर्थिक कुचंबना होत आहे. तर नगरपालीका हद्दीबाहेरील नगरमध्ये 1800 लिटरचे टँकर 200 ते 250 रुपयात देते.

सुविधासाठी ग्रामपंचायतचा प्रस्ताव :
शहरातील बहुतांशी वसाहती नगरपालीका हद्दी बाहेर असल्याने नगरपालीका या वसाहतींना नळ कनेक्शन,रस्ते,स्ट्रीट लाईट, वा इतर कोणत्याही सुविधा देत नाही.तसेच ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत या वसाहती येतात त्यांच्या कडूनही त्यांना सुविधा मीळत नसल्याने हैराण झालेल्या या नगरवासीयांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे संदर्भात शासनाकडे तीन वर्षापासून प्रस्ताव पाठविला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप धूळ खात पडला आहे.

राजकीय पदाधिकारी हैराण :
या वसाहती मध्ये साहित्यिक, राजकीय पदाधिकारी राहतात. मात्र, पाण्यामुळे ते सुध्दा हैराण झाले असून ते नवीन ग्रामपंचायतीच्या प्रयत्नात असल्याचे समजते. त्यात साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, माजी नगराध्यक्ष डा.व्ही.आर.तिवारी, रा.स्व.संघाचे क्षेत्र प्रमूख बाळासाहेब चौधरी, समरसता मंचचे राष्ट्रीय सदस्य प्रा.रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेना गटनेते विनय भावे, टीडीएफचे तालुकाध्यक्ष एस. आर. बन्सी, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष डी. एस. पाटील, माजी नगरसेवक सी.के.पाटील, काँग्रेस च्या महिला तालुका अध्यक्षा चारुशिला पाटील आदींचा समावेश आहे.

पावसासाठी देवाला साकडे :
गेल्या तीन/चार वर्षापासून तालुक्यात दमदार पाऊस पडत नसल्याने पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे.त्यामुळे कुपनलीकेचे पाणी पावसाळ्यात व त्यानंतर दोन-तीन महिने टिकते व ते आटते. धो-धो वाहून निघणारा पाऊस न झाल्याने तालुक्यातील नदी नाले कोरडेच होते. त्यामुळे आता यावर्षी तरी देव तारेल का…? बोरवेलला पाणी येईल का…? अशी प्रतिक्षा बंद पडलेल्या बोरवेलधारकांना आहे.तालुक्यातील अंजनी,गिरणा या नद्यांना चांगला पूर यावा, तसेच तलाव, नदी,नाल्यात पुरेसे पाणी साचावे अशी आशा वसाहतीमधील रहिवाश्यांसह तालुक्याला लागली असून दमदार पावसासाठी नागरीक देवाला साकडं घालत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!