युतीत मिठाचा खडा; भाजपाचा प्रचार करण्यास शिवसैनिकांचा नकार

0
धरणगाव । शहरात भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांत गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्अपवर आणि प्रत्यक्ष गावातही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपालिका आणि मुख्याधिकारी यांच्या भोवती फिरणारी ही चर्चा सहकार राज्यमंत्री व नगराध्यक्ष यांच्यावर लाचखोरीचे आरोप करत आहे. यासंदर्भात भाजपाने उपोषणाचाही आधार घेतला. या सर्वांचा परीणाम म्हणून शिवसेनेने येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार न करण्याचे ठरवून आपला रोष व्यक्त केला आहे. ही बाब युतीला अडचणीची ठरु शकते. याबाबत नेते, कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवसेना कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांचावर भाजपाचे कार्यकर्ते खोटे आरोप करत आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यात आली. असे करुन ते युती धर्म पाळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

जळगाव लोकसभेतील खासदार निष्क्रिय असून ते कधीच मतदारसंघात फिरकले नाही. यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. अशा विविध कारणांमुळे शिवसेना बैठकीत कार्यकर्त्यांनी कडाडून रोष व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे उपस्थित होते. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे काम करणार नाही. असा ठराव मांडला या ठरावाला सूचक म्हणून शहर प्रमुख राजेंद्र महाजन तर अनुमोदन गटनेते पप्पू भावे यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ उपस्थित होते. त्यांची उपस्थिती म्हणजेच ठरावाला मुक संमती असे गृहीत धरले जात आहे. याप्रसंगी शहरातील शिवसेनेचे नगरसेवक, युवा सेना, विद्यार्थी सेना, अल्पसंख्याक सेनेचे पदाधिकारी यांनीही ठरावाला पाठिंबा दिला.

स्थानिक भाजप सेना नेते पदाधिकारी यांच्यात सौहार्दाचे वातावरण असतांना या आरोप-प्रत्यारोपाने त्यात कटुता वाढत आहे. भविष्यात ती दूर न झाल्यास युतीच संकटात येते की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*