Thursday, April 25, 2024
Homeजळगावबोलीभाषेवरच प्रमाण भाषेचे अस्तित्व अवलंबून

बोलीभाषेवरच प्रमाण भाषेचे अस्तित्व अवलंबून

‘देशदूत फेसबुक लाईव्ह संवाद’ कट्ट्यावर उमटला सूर

जळगाव

प्रमाण भाषेबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. मात्र, जोपर्यंत बोलीभाषा टिकून आहे; तोपर्यंत प्रमाण भाषेला तडा जाणार नाही. त्यामुळे बोलीभाषेच्या संवर्धनासोबतच बोलीभाषांमध्ये संशोधन होणे गरजेचे असल्याचा सूर ‘देशदूत फेसबुक लाईव्ह संवाद कट्ट्या’वर उमटला.

- Advertisement -

गुरुवारी ‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त आयोजित संवाद कट्ट्यावर शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, लेवा गणबोलीचे अभ्यासक अरविंद नारखेडे, आदिवासी भाषांचे संशोधक प्रा. योगेश महाले, गुर्जर गणबोलीचे अभ्यासक मंगल पाटील सहभागी झाले होते. सहभागी मान्यवरांचे कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी स्वागत केले. यावेळी चंद्रकांत भंडारी म्हणाले की, राज्य शासनाने दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली, हा चांगला निर्णय आहे. मात्र, ‘सेमी’ने मराठीवर आक्रमण केले आहे.

या आक्रमणात मराठीची गळचेपी होत आहे. ही गळचेपी रोखण्यासाठी मराठीचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. सध्या शाळांमध्ये मराठी शिकविण्याचा दर्जा घसरत चालला आहे आणि अहिराणी भाषेचेही तसेच आहे. अहिराणी भाषा बोलणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने अहिराणीचे सौंदर्य कमी होत आहे. मराठी भाषा टिकविण्यासाठी कोणी काय केले; हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. अरविंद नारखेडे म्हणाले की, लेवा गणबोली ही लेवा समाजाची भाषा आहे. हा गैरसमज दूर होणे महत्त्वाचे आहे. लेवा भाषा ही आपल्या भागातील व्यवहार भाषा म्हणून स्वीकारली गेली आहे.

सध्या गणबोलींवर आक्रमण करणे सुरू आहे. बोलीभाषांचा द्वेष होऊ लागला आहे. त्यामुळे बोलीभाषा लुप्त होत आहेत. मात्र, बोलीभाषेत खरेपणा असतो; हे सर्व जण विसरत आहेत. मराठी भाषेसाठी लढा देऊन संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. भाषेशी कोणत्याही राजकारण्यांना काहीही देणेघेणे उरलेले नसल्याने, मराठी भाषा संकटात सापडली आहे. मंगल पाटील म्हणाले की, चोपडा हे गुर्जर समाजाची राजधानी आहे. समाजातील उच्च विद्याविभूषित मुलांचे आई-वडील गुर्जर भाषा बोलतात; हा स्वाभिमान आजही टिकून आहे. गुर्जरी भाषेतून होणारा संवाद आजही खेड्यापाड्यांत चांगला आहे. मात्र, ही भाषा टिकवून ठेवण्यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळींनी या भाषेत लिखाण केले पाहिजे.

अहिराणी भाषा एक समृध्द भाषा आहे. अहिराणी लिहायला आणि ऐकायला कठीण आहे. मात्र, समजायला तेवढीच सोपी आहे. हे सांगताना त्यांनी गुर्जर भाषा ‘माधलू जवयीक आणि भाषा टिकानसाठी चाली राह्यनूत प्रयत्न’ त्यांच्याच भाषेत सांगितले. प्रा. योगेश महाले म्हणाले की, बोलीभाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

खान्देशात 15 बोलीभाषा बोलल्या जातात. बोलीभाषा ह्या प्रमाण भाषेला प्रबळ करतात. बोली बोलणारा व्यक्ती हा गावंढळ असतो; हे गैरसमज पसरविले जात आहेत. त्यामुळे बोलीभाषा बोलण्याबाबतचा न्यूनगंड काढणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. बोलीभाषेवरच प्रमाण भाषेचे अस्तित्व अवलंबून आहे.

राज्यात आदिवासींच्या 41 जमाती आहेत. त्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ भागात बोलली जाणारी कोकणी बोली त्यासोबतच डांगी, भिलोरी, मावची, पावरा या बोलींवर माझा अभ्यास सुरू आहे. जोपर्यंत बोलीभाषांचे व्याकरण तयार होत नाही; तोपर्यंत बोलीभाषा पुढे जाणार नाही, असेही ते म्हणाले.

गुजराती, मराठी, हिंदी, बंगाली या भाषांची आई एकच आहे; ती म्हणजे संस्कृत. या चारही भाषांमधील अनेक शब्दांमध्ये साम्य आहे. बोलीभाषांवर होणार्‍या संशोधनाच्या अभावामुळेच त्या भाषा विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे बोलीभाषांवर संशोधन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या