जातीयवाद हा सर्वात मोठा आजार – प्रा.सोहेल

0
जळगाव । दि.24 । प्रतिनिधी-देशातील वर्तमान स्थिती लक्षात घेतली असता, एड्स आणि कॅन्सर हे मोठे आजार नसून जातीयवाद हा सर्वात मोठा आजार असल्याचे मत ईस्लाम धर्माचे अभ्यासक प्रा.सोहेल आमीर शेख यांनी आज येथे व्यक्त केले.
दरम्यान भारत हा विविधता असलेला देश असून रोजासारख्या या कार्यक्रमांमधून एकमेकांप्रती प्रेमभावना निर्मितीचे कार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दै.‘देशदूत’ आणि जळगाव जिल्हा मणियार बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आज ‘रोजा ईफ्तार’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अमर जैन, माजी उपमहापौर डॉ.सुनील महाजन, संजय वाणी, नगरसेवक बंटी जोशी, डॉ.राधेशाम चौधरी, सलीम ईनामदार, जाफर सर, जहांगिर खान, मीर कासीम अली, दै.‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने, महाव्यवस्थापक विलास जैन, जाहिरात व्यवस्थापक मनीष पात्रीकर, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, अमजद पठाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा पवित्र कुराण देवून सत्कार करण्यात आला.

प्रा.सोहेल आमीर शेख यांनी रोजाचे महत्व पटवून देतांना सांगितले की, रोजाचा उद्देश प्रेम भावना आहे. कुराण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, माता-पित्याने आपल्याला जन्म दिला आहे.

असे असतांना एका धर्मावाले लोक दुसर्‍या धर्माच्या लोकांना शत्रु समजत आहेत. परमेश्वराने सगळ्यांना एकाच माता-पित्याचे पुत्र असूनही मग शत्रु का समजले जाते? असे सांगितले.

वर्तमानस्थिती बघितली असता जातीयवाद हा सर्वात मोठा आजार असून तो सर्व समाजाला मारक ठरतो. रोजा ठेवल्यानंतरही जो वाईट काम करतो त्याचा रोजा कबुल होत नसल्याचे प्रेषीत यांनी सांगितले आहे.

आपण पोटभरुन खायचे आणि शेजारच्या माणसाला उपाशी ठेवायचे हा मुस्लीम धर्म नाही. दुसर्‍यांची भुक मिटवण्याची शिकवण रोजाच्या माध्यमातून दिली जाते.

जकात ही रमजानची सर्वात मोठी इबादत आहे. आपण जे कमवतो त्याच्या अडीचटक्के हिस्सा हा गरीबांसाठी दान केला पाहिजे. देशभरातून 40 हजार कोटीची जकात दिली जाते.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर जकात देवून देखील देशात गरीबीची परिस्थिती आहे. मुलभूत समस्यांचे समाधान अद्यापही झालेले नाही.

जकातच्या माध्यमातून गोरगरीबांचे प्रश्न मिटणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, रोजा म्हणजे थांबणे. तिन गोष्टी रोजामध्ये निशिध्द मानल्या आहेत.

खाणे, पिणे आणि शारिरिक संबंध ठेवणे. महिनाभर उपवास करुन रोजा दरम्यान मक्का येथील आबे जमजम हे पवित्र जल व गंगाजल हे देखील पिता येत नाही.

एवढे पवित्र पाणी जर रोजामध्ये पिले जात नाही तर मग वर्षभर इतर गोष्टी पिणे निशिध्द मानले जाते. याप्रमाणेच खाणे आणि शारीरिक संबंधांच्या निशिध्द बाबी त्यांनी स्पष्ट केल्या.

रोजाच्या माध्यमातून एक दुसर्‍याप्रती प्रेम भावना ठेवण्याचे आवाहन प्रा.सोहेल आमीर शेख यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केले. तर आभार दै.‘देशदूत’चे संपादक हेमंत अलोने यांनी मानले.

सण-उत्सवातून एकता कायम ठेवा !- जिल्हाधिकारी निंबाळकर
दै.‘देशदूत’ आणि जिल्हा मणियार बिरादरीतर्फे आयोजित रोजा इफ्तारच्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी हिंदू-मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत सण-उत्सवातून सामाजिक एकता कायम ठेवा, असे आवाहन केले. यावेळी पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, आयुक्त जीवन सोनवणे हे उपस्थित होते.

आमदारांसह राजकीय पदाधिकार्‍यांचीही उपस्थिती
आमदार राजूमामा भोळे यांच्यासह विष्णु भंगाळे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी देखील रोजा ईफ्तारच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रत्येकाने माणुसकी जपून जातीय सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन आ.राजूमामा भोळे यांनी केले.

महिलांचीही उपस्थिती
दै.‘देशदूत’ आणि जिल्हा मणियार बिरादरीतर्फे आयोजित रोजा इफ्तारच्या कार्यक्रमात महिलांनी देखील आवर्जुन उपस्थिती दिली. दै.‘देशदूत’तर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. ‘देशदूत’च्या उपक्रमांमधून सामाजिक संदेश देखील दिले जातात. रोजा ईफ्तारचे आयोजन करुन दै.‘देशदूत’ने हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी एक नवा पायंडा पाडल्याच्या भावना महिला भगिनींनी व्यक्त केल्या. यावेळी अंकुर प्रतिष्ठानच्या मनीषा बागुल, संगीता पाटील, आशा चौधरी, निवेदिता ताठे, कांचन चौधरी, जिजा राठोड या उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

*