Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedउच्च शिक्षणात घडताहेत नवे बदल !

उच्च शिक्षणात घडताहेत नवे बदल !

करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्यावर नियंत्रणासाठी आणि विशेषतः गर्दी टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता सद्यास्थितीला अनलॉक असलेतरी प्रत्यक्षात महाविद्यालये बंद आहेत. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापनाचे कार्य सुरु आहे. महाविद्यालयीन प्राध्यापकांनी अध्यापनात कुठेही कमी पडू दिले नाही. ऑनलाईन शिक्षण प्रणालीतर्फे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात नुकसान होईल असे मत प्रवाह काहींचे असले तरी उच्च शिक्षणात मात्र नवे बदल घडले हे निश्चित… कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या महाविद्यालयांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण क्षेत्रात आवश्यक तो बदल घडविला आहे. शैक्षणिक क्षेत्राबाबतच्या आव्हानाबाबत घेण्यात आलेल्या मुलाखतीत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी साधलेला दिलखुलास संवाद…

प्रश्न : कोरोनाच्या संकटाकडे आपण कसे बघत आहात?

- Advertisement -

कुलगुरु : कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग यामध्ये आता फार मोठी तफावत असणार आहे. या जागतिक महामारीने जगापुढे असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत. अजूनही कोरोनाचा अटकाव पूर्णपणे झालेला नाही. सरकारच्या पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. मार्च महिन्यात पुकारलेला लॉकडाऊन हा त्याचाच एक भाग होता. गेल्या नऊ महिन्यांपासून अकस्मात आलेल्या या संकटातून आपण जात आहोत. संकटाच्या काळात किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपसातील मतभेद विसरुन, आपल्या भूमिका बाजूला ठेवून एकत्र येण्याची आपली संस्कृती याही काळात दिसून आली. त्यामुळेच या आपत्तीत सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचे हातही दिले. गेल्या नऊ महिन्यांपासून डॉक्टरांपासून अनेक घटक समर्पणाच्या भावनेने झेाकून देत काम करीत आहेत. कोरोनामुळे आपली सगळी जीवनशौली अमुलाग्र बदलली आहे. कोरोनावर उपचाराची लस सापडत नाही तोपर्यंत हे संकट आपल्यासोबत कायम असणार आहे हे गृहीत धरुन पुढच्या काळात आपल्याला जगावे लागणार आहे.

प्रश्न : उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात याचे पडसाद कसे उमटले आहेत?

कुलगुरु : सर्वच क्षेत्रात त्याचे पडसाद पडू लागले असून उच्च शिक्षण तरी त्याला अपवाद कसे असणार? शालेय शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल या दोन्ही ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अनेक बदल आपल्याला पहायला मिळत आहेत. ऑनलाईन शिक्षणाची चर्चा मोठया प्रमाणात सुरु झाली आहे. ही स्वाभाविक देखील आहे. कारण मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाला आणि प्रत्येक जण आपल्या घरात अडकून बसले. सर्व जग ठप्प झाले. शिक्षण देखील ठप्प झाले. परीक्षांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. मात्र त्याच काळात तंत्रज्ञानाच्या जोरावर ऑनलाईन शिक्षणाची चर्चा मोठया प्रमाणात सुरु झाली. खरेतर उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर बर्‍याचदा होतो. काही विषयांमध्ये तो आवश्यक असतो. तर काही विषय पारंपरिक पध्दतीने शिकविले जातात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे शिक्षणाची परिभाषा बदलली आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जाऊ लागला.

प्रश्न : आपले विद्यापीठ ऑनलाईनच्या बाबतीत या काळात कसे सामोरे गेले?

कुलगुरु : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापुरते सांगायचे तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद कायम ठेवला. मार्च महिन्यात अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. ऑनलाईन शिक्षण व्यवस्थापन प्रणालीच्या आधारे विविध अभ्यासक्रमांचे, प्राध्यापकांचे व्याख्यांनांचे व्हिडीओ, प्रश्नसंच विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शंकांचे निरसन केले. या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी रहावे यासाठी काही व्याख्याने घेण्यात आली. कोरोना नंतरच्या काळात येऊ घातलेल्या बदलांची ही नांदी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा ऑक्टोबर मध्ये झाल्या. ऑनलाईन परीक्षा यशस्वी होतील की नाही या विषयीची शंका उपस्थित केली जात होती. मात्र आपल्या विद्यापीठाच्या ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही परीक्षा सुरळीत पार पडल्या. अगदी दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी देखील यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा दिली. 80% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली. आता शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या डिसेंबर/जानेवारी महिन्यात होत असलेल्या परीक्षा देखील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. मध्यंतरीच्या काळात या नव्या तंत्रज्ञानाची प्राध्यापकांना सवय व्हावी यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन लर्निंग लाईव्ह क्लासरुम टिचिंग प्लॅटफॉर्म (ई उत्तमविद्या) स्थापन करुन त्या माध्यमातून प्रत्येक विद्याशाखानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. सर्व प्राध्यापक तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपडेट रहावेत व ऑनलाईन शिक्षणासाठी तयार व्हावेत हा त्या मागचा हेतू होता. त्याचा फायदा असा झाला की, नव्या शैक्षणिक वर्षात सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन वर्ग सुरु केले. विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी गुगल क्लासरूम प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रश्न : महाविद्यालयांची स्थिती कशी आहे?

कुलगुरु : बदलत्या काळात शिक्षणाचा विस्तार वाढणार आहे. ऑनलाईनमुळे टिचींग सोबतच लर्निंग या शब्दाला देखील महत्त्व आले आहे. विद्यार्थी इंटरनेटवर सतत माहिती घेत असतात. अजूनही महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु झालेली नाहीत. कदाचित जानेवारीत सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अभ्यासात खंड पडू नये म्हणून सर्व महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग देखील घेतले जात आहेत ती काळाची गरज आहे. विद्यापीठाने ऑनलाईन एम.एस्सी. प्रथम वर्षाची प्रक्रीया सुरु केली आहे.

प्रश्न : ऑनलाईनवर विद्यार्थी समाधानी आहेत का?

कुलगुरु : ऑनलाईन वर्ग सुरु झाले असले तरी ऑनलाईन शिक्षणावर साधक बाधक चर्चा सुरु आहे. दुर्गम भागात नेटवर्कचे प्रश्न आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना मुकत आहेत. असे असले तरी ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वेळा प्राध्यापकांची नवे बदल स्वीकारण्याची तयारी नसते. ती वृत्ती आता हळूहळू बदलत असून प्राध्यापक ऑनलाईन वर्ग घेत आहेत. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद त्यांना मिळतो आहे.

प्रश्र : भविष्यातील चित्र काय राहील?

कुलगुरु : काळाच्या बरोबरीत जायचे असेल तर हे बदल अपरिहार्य आहेत. कोरोनोत्तर काळात अभ्यासक्रमात देखील काही बदल अपेक्षित आहेत. कोरोनाचा अभ्यास हा विज्ञान शाखेत करावा लागेल. विद्यापीठ अनुदान आयोगाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यामध्ये नव्या शैक्षणिक वर्षात 25% अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागेल असे म्हटले आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅप्स तयार करावे लागतील. व्हर्च्युअल क्लासरुमची कल्पना आता आली आहे. डिजीटल माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ऑनलाईन कोर्सेस तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाचा अधिक वापर हा पुढच्या काळात अपरिहार्य आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाशी शिक्षक आणि विद्यार्थी यांना जोडून घ्यावे लागेल. वर्गखोलीतील प्रत्यक्ष शिक्षण हे आनंददायी असले तरी कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीत सध्यातरी वर्गखोलीतील शिक्षणाला मर्यादा पडतील असे वाटते. त्यामुळे हे ऑनलाईन शिक्षण देतांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा देखील विचार करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांशी सतत संवाद ठेवावा लागेल. हे शिक्षण अधिक आनंददायी रहावे यासाठी संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना विद्यापीठाशी समन्वय साधत मार्ग काढावा लागणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या बदलांना सक्षमपणे सामोरे जाण्याच्या तयारीला लागले आहे.

शब्दांकन- अमोल कासार

- Advertisment -

ताज्या बातम्या