Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव विभागात 358 सहाय्यक प्राध्यापकांची होणार भरती

Share
जळगाव । जळगाव राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांच्या 31 हजार, 185 मंजूर पदांपैकी फक्त 22 हजार, 236 पदे भरण्यात आलेली आहेत. अद्याप रिक्त असलेल्या 8 हजार, 949 पदांमधील 40 टक्के म्हणजे 3 हजार, 580 पदे भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, पुणे, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पनवेल, सोलापूर अशा दहा विभागात समान वाटपाने ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जळगाव विभागात 358 सहाय्यक प्राध्यापकांची भरती होण्याची शक्यता आहे. शासनाच्या अटी व शर्तीची अंमलबजावणी करणार्‍या महाविद्यालयांनाच ही रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी मिळणार आहे.

याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान या सर्वच शाखांमध्ये नेट, सेट, पीएच. डी. पात्र उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील 1,171 अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील बहुसंख्य महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्तच आहेत. तुटपुंज्या मानधनावर तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांच्या नेमणुका करून त्यांना राबवून घेतले जात आहे. कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेतील अशा उमेदवारांना आता शासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

1 ऑक्टोबर, 2017 च्या विद्यार्थी संख्येवर अनुज्ञेय होणारी रिक्तपदे ही आधारभूत मानून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालकांकडून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पदभरती करताना प्रत्येक महाविद्यालयास संबंधित विद्यापीठ किंवा नियामक प्राधिकरणाने दिलेली संलग्नता कायम राहावी व महाविद्यालयांचे मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक असलेली मर्यादा विचारात घेऊन दहा विभागातील महाविद्यालयांना पदांचे समान वाटप करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आकृतीबंधास अंतिम मान्यता दिलेली नसली तरी सहायक प्राध्यापकांची 40 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी देशदूतफशी बोलताना व्यक्त केला. एनओसी मिळाल्यानंतर महाविद्यालयांनी भरतीची जाहिरात तपासून घेऊन ती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. विद्यापीठ निवड समितीमार्फत उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही महाविद्यालयांना राबवावी लागणार आहे, असेही माने यांनी स्पष्ट केले आहे.

रिक्त पदांसाठी ऑनलाइन ना-हरकत
ा राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षांकडून बिंदूनामावलीची (रोस्टर) अंतिम तपासणी पूर्ण करून घेतलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांना सहायक प्राध्यापक पदांची रिक्त पदे भरण्यासाठी आता शासनाकडून ऑनलाइन ना-हरकत (एनओसी) मिळणार आहे. भरती प्रक्रियेची कामे जलद गतीने व्हावीत व पारदर्शकता यावी यासाठी पहिल्यांदाच अशी पद्धत अवलंबली जात आहे. मात्र, महाविद्यालयांनी आधी उच्च शिक्षण सहसंचालकांकडून विषयांचा कार्यभार तपासूण त्यानुसार बिंदूनामावली तयार करून त्याची विद्यापीठाकडून प्राथमिक तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाच्या सहायक आयुक्तांकडून बिंदूनामावलीची अंतिम तपासणी करून घेण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. यानंतरच महाविद्यालयांना पदभरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!