भोंदूबाबाने वकिलाला लुटले

0
जळगाव । दि.23 । प्रतिनिधी-भिक्षा मागणार्‍या दोन्ही भोंदूबाबानी वकीलाला बरकत म्हणून पाकीटात मणी ठेवण्याचे सांगून त्यांच्या पाकीटांतील दोन हजार रुपये लुटून नेल्याची घटना न्यायालयाच्या मागील गेटजवळ दुपारी 4.45 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान वकीलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने दोघांना पकडले. यावेळी नागरिकांनी दोन्ही भोंदुबाबांना चोप देवून शहर पोलिसात नेले. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसात गुन्हा दाखल नव्हता.

याबाबत पोलिसांकडून व प्रत्यक्षदर्शी वकील यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, वकील दिलीप गायकवाड हे त्यांच्या सहकार्यासोबत न्यायालयाच्या मागच्या गेटजवळ उभे होते.

यावेळी भिक्षा मागणार्‍या दोन भोंदूबाबांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी आपले पाकीट काढून पाच रुपये त्या भोंदूबाबाला दिले.

यावेळी त्यांच्या पाकीटातील दोन हजाराची नोट पाहून भोंदूबाबाने वकील गायकवाड यांना बरकत म्हणून पाकीटात ठेवण्यासाठी मणी दिला.

यावेळी त्यांनी तो मणी पाकीट ठेवला आणि अचानक त्यांच्या पाकीटातील दोन हजाराची नोट गायब झाली. यावेळी गायकवाड यांच्या हा प्रकार लक्षात आला.

त्यांनी दोन्ही भोंदूबाबा पकडून आरडाओरड केली. यावेळी नागरिकांनी दोन्ही भोंदूंना चोप दिला. न्यायालयीन कामाला असलेल्या जिल्हापेठचे पोलिस कर्मचारी मिलिंद इंगळे यांच्या मदतीने दोघांना शहर पोलिसात नेण्यात आले. वकील गायकवाड यांच्याकडे असलेले पैसे हे पक्षकाराने त्यांना नुकतेच दिले होते.

भोंदुबाबांकडे उत्तरप्रदेशमधील आधारकार्ड
शहर पोलिस स्टेशनला दोन्ही भोंदूबाबांना आणल्यानंतर त्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्याकडे पैसे व आधारकार्ड मिळून आले असून त्यावर उत्तरप्रदेशातील अमेठी येथील पत्ता आहे.

तक्रार देण्यास नकार
वकील दिलीप गायकवाड यांनी दोन्ही भोंदूबाबांना शहर पोलिसात आणले. दोघांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. होती. यावेळी वकील गायकवाड यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने दोन्ही भोंदुबाबांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही तक्रार दाखल नव्हती.

 

 

LEAVE A REPLY

*