तांबापुरात दोन गटात हाणामारी

0
जळगाव । दि.15। प्रतिनिधी-तांबापुरामध्ये मदीना चौकात असलेल्या शाहे औलीया मस्जीदमधील व्यवहाराच्या वादातुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाला.
संतप्त जमावाने सिव्हीलमध्ये तोडफोड केली. तसेच ईच्छादेवी चौकाजवळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलीसांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तांबापुरा परिसरात मदीना चौकात शाहे औलीया मस्जीद आहे. यामध्ये हनीफ शहा हे ट्रस्टी आहेत. काही दिवसांपुर्वी परिसरातील लुकमान आणि फिरोज अजीज खान (वय 30) यांनी मशिदीतील येणार्‍या देणगीबाबत ट्रस्टींना विचारणा केली होती. यातुन दोघांमध्ये यापुर्वी भांडण झाले होते.

दरम्यान फिरोज खान ह्यांनी 7.12 वाजेच्या रमजानचा रोजा सोडला. रोजा नंतरची नमाज पठणासाठी फिरोज खान हे मदीना चौकातील मशिदीमध्ये गेले. नमाज पठण झाल्यानंतर ते बाहेर आहे.

यावेळी हनीफ शहा यांच्यासह शरीफ शहा, असीफ शहा, आरीफ शहा यांनी खान यांच्याशी वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

यावेळी खान यांचे लहान भाऊ वसीम खान व भाचा हे भांडण सोडविण्यासाठी गेले. मात्र शहा यांनी तिघांनाही मारहाण केल्याचे जखमी फिरोज खान यांनी रुग्णालयात सांगितले. लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याने फिरोज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

रुग्णालयात तोडफोड
जखमी खान याला जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईंकासह परिसरातील नागरीकांनी आणले. यावेळी तांबापुरातील सुमारे 150 ते 200 जणांचा जमाव रुग्णालयात दाखल झाला. या जमावाने रोष व्यक्त करीत इमरजन्सी वार्ड मायनर ओटीच्या दरवाजाच्या काच्या फोडल्या. तणाव निर्माण होत असल्याने जिल्हापेठ पोलीसांसह अतिरीक्त बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाल्याने जमावाला पांगविण्यात आले.

ईच्छादेवी चौकात पोलीसांनी उगारल्या लाठ्या
ईच्छादेवी चौकात संशयीतांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी महामार्ग रोखुन धरला. दरम्यान, पोनि.सुनिल कुर्‍हाडे यांच्यासह पथकाने रास्ता रोको प्रयत्नात असलेल्या जमावास शांततेचे आवाहन केले. मात्र जमाव अधिक होत होता. परिस्थीती नियंत्रणाबाहेर जाईल तोच डीवायएसपी सचिन सांगळे यांनी त्यांच्या ताफ्यासह जमावाला तंबी दिली. तसेच काही जमावाच्या दिशेने लाठ्या उगारल्या त्यामुळे गर्दी पांगली.

मदीना चौकात बंदोबस्त
मदीना चौकातील मशिदीजवळ दंगा नियंत्रक पथकासह सपोनि सचिन बागुल यांच्यासह कर्मचारी, ईच्छादेवी चौकात एमआयडीसी, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी, जिल्हा रुग्णालयात शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीसांसह दंगा नियंत्रक पथकाचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण शांतत असुन रात्री दोघं गटांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

 

LEAVE A REPLY

*