Saturday, April 27, 2024
Homeजळगावमविप्रमधील कारभाराच्या चौकशीकामी कोथरुड पोलिस जळगावात

मविप्रमधील कारभाराच्या चौकशीकामी कोथरुड पोलिस जळगावात

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

मविप्र संस्थेेचे संचालक अ‍ॅड.विजय पाटील यांनी तक्रारीनुसार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात मराठा विद्याप्रसारक मंडळ या संस्थेसंदर्भातील गुन्ह्यांसह इतर माहिती घेण्यासाठी कोथरुड पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी सकाळी जळगावात धडकले.

- Advertisement -

विविध कार्यालयांना भेटी देवून पथकाने माहिती मिळावी यासंदर्भात पत्रे दिली असून 25 जानेवारीपर्यंत म्हणजेच अवघ्या तीन ते चार दिवसातच पथकाने गुन्ह्यांकामी आवश्यक माहिती संबंधित विभागांकडून मागविली असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

असे आहे गुन्हा

मविप्र वाद प्रकरणी अ‍ॅड. विजय पाटील यांनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करणे, शिवीगाळ करणे,मारहाण करणे, यासह धमकी तसेच खंडणी मागणी करणे अशा विविध पध्दतीने छळ केल्याप्रकरणी माजी गिरीश महाजन, भोईटे कुटुंबांसह, आरोग्यदूत रामेश्वर नाईक, सुनील झंवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह 29 जणांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मविप्र संदर्भातील गुन्ह्यांबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरुड पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व कर्मचारी अशा चार जणांचे पथक गुरुवारी सकाळी जळगावात दाखल झाले आहेत.

पथकाने कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्ह्याकामी आवश्यक माहिती मिळावी यासंदर्भात विविध विभागांना दिली. यात मविप्र संदर्भात जिल्हाभरात एकत्रित दाखल गुन्हे, त्याचा तपास याबाबत पोलीस अधीक्षकांना पत्र दिले.

मविप्र प्रकरणी संस्थेच्या वादात जिल्हापेठ पोलीसांची महत्वाची भुमीका राहिली. जिल्हापेठ पोलीसांनी कुणाच्या सांगितल्यावरून संस्थेवर पुर्णवेळ पोलीस बंदोबस्त ठेवला होता. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व त्याची माहिती मिळावी, याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र देण्यात आले.

सहाय्यक शिक्षणसंचालकांसह कुलगुरुंनाही पत्र

मविप्र या संस्थेअंतर्गत नूतन मराठा महाविद्यालासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, मविप्र संस्थेतील प्रशासक नियुक्ती, यासह संस्थेची निवडणूक, कार्यकारिणी, शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त्या, संस्थेतील कर्मचार्‍यांच्या पदोन्नती, पगारासह विविध तांत्रीक सोपस्कार कुणाच्या पत्रांद्वारे बदलण्यात आले याची याबाबत माहितीसाठी पथकाने सहाय्यक शिक्षणसंचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु यांनाही पत्र व्यवहार केला आहे.

मविप्र संदर्भातील बॅक खात्याचीही मागविली माहिती

कोथरुड पोलिसांचे पथकाने मविप्र संदर्भातील बँक खात्यांमध्ये झालेल्या व्यवहारांबाबतचीही माहिती मागविली आहे. संस्थेचे आर्थिक व्यवहार संचालक मंडळाशिवाय दुसर्‍या गटाच्या नावे करावे म्हणून कोणाचे पत्र होते, याची माहिती घेण्यासाठी मविप्रचे खाते असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेलाही आज पत्र देण्यात आले आहे.

मराठा विद्या प्रसारक संस्थेवर प्रशासक बसविण्यात आला होता. सहकार विभागाने निवडणुक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. संस्थेची सहकार कायद्यानुसार निवडणुक केव्हा, कोणत्या कालावधीसाठी घेण्यात आली होती, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनाही पत्र देण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने भरविलेली ‘शाळा’ही येणार समोर

मराठा विद्या प्रसारक संस्थेवर प्रशासक बसविण्यात आला होता. सहकार विभागाने निवडणुक कार्यक्रम जाहीर करून तेथे निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुक आलेल्या संचालकांना प्रशासकाने पदभार दिला होता.

यात शिक्षण विभागाने दिलेल्या पत्राची भुमीका महत्वाची होती. संस्थेतील अचानक सत्तांतर झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी अहवाल बदल केला, विविध पत्रे देखील दिलेली आहेत. या सर्वांची माहीती घेण्यासाठी हे पथक जिल्हा परिषदेत गेले.

यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी जे पाटील यांच्याकडे त्यांनी संपुर्ण रेकार्डची माहिती मागितली. माहितीबाबतचा आशय पत्रात नमूद असून शुक्रवारपर्यंत माहिती द्यावी, असेही पथकाने सांगितले आहे. पथकाने माहिती मागविल्याने पुन्हा संस्थेचा परिशिष्ट 1 विषय चर्चेत आला असून यात माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पथक काही ठिकाणी पंचनामेही करणार

या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी कोथरूड पोलीसांचे पथकाने गुरूवारी विविध कार्यालयांना भेटून लेखी पत्रे दिली आहेत. शुक्रवारी ही संपुर्ण माहिती त्यांना मिळण्याची शक्यता असून हे पथक काही ठिकाणी पंचनामे देखील करण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जळगाव तहसील कार्यालयाकडून देखील काही माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या