Type to search

Breaking News जळगाव

हॉटेलमधील भांडणानंतर मध्यरात्री श्यामला दगडाने ठेचून मारले

Share

जळगाव | दहीहंडीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हॉटेलमध्ये मद्यपान करण्यासाठी बसलेल्या घनश्याम शांताराम दिक्षीत वय ३४ रा. देविदास कॉलनी या युवकाचा मोन्या उर्फ मोहीनीराज अशोक कोळी या तरुणांशी वाद झाला. या वादानंतर घनशाम घरी आला. त्याने मोटारसायकल घराबाहेर लावल्यानंतर तो घरापासून काही अंतरावर असलेल्या कृपाळू साईमंदीराच्याजवळ फोनवर बोलत होता. याचवेळी मुन्ना उर्फ मोहीनीराज अशोक कोळी, सन्नी उर्फ चालीस वसंत पाटील या दोघांनी याठिकाणी येवून त्याला मारहाण केली. मारहाणीनंतर तो खाली पडताच यातील एकाने जवळच पडलेला दगड शामच्या डोक्यात मारून त्याचा हत्या केल्याची घटना मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती रविवारी सकाळी रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना ही घटना दिसून आली. त्यानंतर काही नागरिकांनी याठिकाणी जावून पाहिल्यानंतर मतय युवक शाम दिक्षीत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण परिसरात चर्चा खळबळ उडाली. शामच्या कुटुंबियांनी याठिकाणी धाव घेवून आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलीसांनी खूनाच्या घटनेची गंभीर दखल घेवून मारेकरी मोहनीराज उर्फ मुन्ना अशोक कोळी रा. सबजेल परिसर व सन्नी उर्फ चालीस वसंत पाटील रा. रामेश्‍वर कॉलनी या दोघांना पहूर येथून ताब्यात घेतले. दरम्यान पैश्याच्या वादातून घनःश्याम याची दोघांनी हत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत पोलीस, प्रत्यक्षदर्शी व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, घनशाम दीक्षीत हा मनसेचा माजी शहर उपाध्यक्ष होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो सामाजिक कार्य करीत होता. शनिवारी सायंकाळी रामदास कॉलनीच्या मैदानावर एल.के फाऊंडेशनची दहीहंडी होती. याठिकाणी तो सहकारी मित्रांसोबत रात्री १० वाजेपर्यंत थांबवून होता. त्यानंतर घनश्याम हा शहरातील एका हॉटेलमध्ये मद्यपान करण्यासाठी गेला. याठिकाणी घनश्याम व त्याचा मित्र सुधीर महाले हे दोघे मद्यपान करीत होता. घनश्यामचा मित्र जयंत हा देखील बाजूच्या टेबलवर त्याचा मित्र मुन्ना (मोहीनीराज) याच्यासोबत बसला होता. याठिकाणी मुन्ना याचा घनश्याम याच्याशी शाब्दीक वाद झाला असल्याचे समजते. त्यानंतर घनश्याम हा त्याच्या एमएच १९ बीके १९९० क्रमांकाच्या मोटारसायकलीने घरी आला. घरी आल्यानंतर घनश्याम याने त्याची मोटारसायकल घराबाहेर लावली. व तो घरात न जाता घराच्या बाहेर असलेल्या कृपाळू साईमंदीराकडे फोनवर बोलत होता. त्यानंतर मध्यरात्री मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी घनश्याम याला मारहाण केली. मारहाणीत तो जमीनीवर कोसळला. याचवेळी यातील एकाने मंदिराजवळ असलेल्या जवळपास २० किलो वजनाचा दगड घनःशाम याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. त्यानंतर तिघांनी याठिकाणावरून पळ काढला.

फोन न उचलल्याने वाढली चिंता
घनश्याम हा घरी न आल्याने कुटुंबियांकडून सकाळी त्याचा शोध सुुरु झाला होता. त्याचा लहान भाऊ गणेश याने त्याच्या मोबाईलवर वारंवार संपर्क केला. परंतू तो फोन उचलत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. दरम्यान मंदिराकडे गर्दी झाली असल्याचे समजताच गल्लीतील ललीत उर्फ कालू काठेवाडी याने मंदिराकडे एक युवक मयत अवस्थेत असल्याचे गणेशला सांगितले. गणेशने याठिकाणी धाव घेतल्यानंतर मयत युवक घनश्याम असल्याचे दिसून येताच कुटुंबियांनी आक्रोश केला. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.

पोलीसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी याठिकाणी धाव घेतली. मयताची ओळख पटलेली असल्याने पोलीसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय अधिकारी डॉ. निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी या ठिकाणी धाव घेतली.

मनमिळावू स्वभावाचा होता घनश्याम
घनश्याम दिक्षीत हा तहसिल कार्यालयात दाखले बनवून देण्याचे काम करायचा. सुरुवातीला काही दिवस घनश्याम याच्याकडे मनसेच्या शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. परिसरातील सामाजिक कार्यात तो नेहमी पुढे राहायचा. माजी महापौर ललीत कोल्हे यांचा तो निकटवर्तीय होता. मनमिळावू स्वभावामुळे त्याने कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली होती.

संशयितांच्या अटकेपर्यंत मृतदेह ताब्यात न देण्याचा पवित्रा
घनश्याम दिक्षीत याच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व मित्र परिवाराने घेतला होता. त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती. याठिकाणी आ. राजूमामा भोळे यांनी रुग्णालयात धाव घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

फॉरेन्सिक पथकाने केला पंचनामा
घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळावरून मयत घनश्याम याचा मोबाईल, हातातील घड्याळ, चार्जर, खिश्यातील सामान, अंगावरील कपडे, दगडाला लागलेले रक्त तसेच घटनास्थळावरील रक्ताचे नमुने फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. सरकारी साक्षीदार उपलब्ध न झाल्याने पंचनामामुळे जवळपास घटना उघडकीस आल्यानंतरही चार तास मृतदेह घटनास्थळी पडून होता. त्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.

घनश्याम घरी न आल्याने कुटुंबीयांनी पहाटे त्याचा घेतला शोध
घनश्याम हा शनिवारी रात्री घरी आला.घरात न जाता त्याने त्याची मोटारसायकल घराच्या बाहेर अंगणात लावली. त्यानंतर तो फोनवर बोलत साईमंदिराकडे गेला. त्यानंतर तिघांनी त्याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो खाली पडल्याने यातील एकाने दगड डोक्यात टाकून त्याची हत्या केली. घनश्याम घरी न आल्याने पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ गणेश याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. घनश्याम हा रात्री गल्लीत राहणार्‍या सुधीर महाले सोबत मद्यपान करण्यासाठी गेला होता. त्यामुळे गणेश याने सुधीर याच्या घरी जावून विचारपूस केली. त्यानंतर त्याने रात्री सोबत घरी आलो असल्याचे गणेशला सांगितले.

गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधीक्षकांची बदली करा
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावली आहे. पोलीस गुन्हेगारांपुढे हतबल झाले आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यास पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी करून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले.यावेळी शोभा चौधरी, सरिता माळी, मनिषा पाटील, वंदना पाटील आदी उपस्थित होते.त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता महिलांसह नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला देखील आंदोलन करून संशयित आरोपींच्या अटकेची मागणी केली. यामुळे याठिकाणी बराचवेळ गोंधळ सुरु होतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!