Type to search

जळगाव

भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

Share

जळगाव । पोलीसांना आमच्या टिप दिल्या, तसेच आमचे सीसीटीव्ही फुटेज दिल्याचा राग आल्याने दोघांनी पिंप्राळ्यातील भाजपचे नगरसेवक कुलभूषण पाटील हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना दोघांनी कुर्‍हाडीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास पिंप्राळ्यातील सोमाणी मार्केटजवळील संपर्क कार्यालयात घडली.

कार्यालयात बसलेल्या हल्ला करणार्‍या तरुणाच्या हातातून कुर्‍हाड हिसकविल्याने दोघांनी याठिकाणावरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होते. दरम्यान हल्ल्याच्या प्रयत्नात असलेली दोन्ही तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शी नगरसेवक कुलभुषण पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळ्यातील मयुर कॉलनीतील रहिवाशी असलेले कुलभूषण पाटील हे प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्यांनी स्वखर्चातून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे.

दरम्यान पिंप्राळयातील कुंभारवाड्यात राहणार्‍या महिलेच्या घरात घूसून तिच्या मुलासह युवकाला विशाल भिकन कोळी, बाबु बन्सीलाल धोबी याच्यासह एकाने मारहाण करून त्यांच्याजवळील 75 हजार रुपये लुटून नेले होते.दरम्यान हा प्रकार चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. याप्रकरणी दि.15 रोजी महिलेच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात रामानंद नगर पोलीसानी विशाल कोळी व बाबु धोबी या दोघांना अटक केली होती. दरम्यान पोलीसांना आमच्या टिप देतो, तसेच आमचे सीसीटीव्ही फुटेज का दिले याचा राग विशाल कोळी, बाबु धोबी यांच्यासह 4 ते 5 जणांनी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.

विशाल व बाबु दोघे दारुच्या नशेत
जामीनावर सुटताच विशाल कोळी व बाबु धोबी या दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर विशाल याने त्याच्या घरातून कुर्‍हाड काढली. त्यानंतर विशाल, बाबु धोबी व 4 ते 5 जण कुलभूषण पाटील यांच्या सोमाणी मार्केटमधील कार्यालयावर चाल करून आले. विशाल हा हातात कुर्‍हाड घेवून कार्यालयात शिरला. याचवेळी कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यालयात बसलेल्या काही युवकांनी कुर्‍हाड मारण्यापूर्वीच त्याच्या हातून हिस्कावली. त्यानंतर त्याने पुन्हा बाहेर जावून लोखंडी भांड मारण्यासाठी आणले. नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यालयात बसलेल्यांनी दोघांना हटकल्याने त्यांनी याठिकाणावरून पळ काढला.

जामीनावर सुटताच दोघांचा पराक्रम
पैसे व मोबाईल लुटीप्रकरणी रामानंद नगर पोलीसांनी विशाल कोळी व बाबु धोबी या दोघांना अटक केली होती. दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा लगेच जामीन झाला. जामीनावर सुटताच दोघांसह इतरांनी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!