Friday, May 3, 2024
Homeजळगावनियोजन समितीतून कोविडचा खर्च

नियोजन समितीतून कोविडचा खर्च

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राज्यातील जिल्हा नियोजन समितीला कोविड-19 विषाणूच्या प्रतिकारासाठी उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या…

- Advertisement -

33 टक्के निधीतील 50 टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याची नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागणीला मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्यातील कोविड 19 चा प्रतिकार करण्यासाठी रुग्णांना लाभ होणार असून जळगाव जिल्ह्यातील कोविड 19 साठी तब्बल 61 कोटी खर्च करता येणार असल्याने कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांना वाढीव निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या संदर्भात मंत्रीमंडळ उपसमितीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 14 एप्रिल 2020 रोजी झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या 33 टक्के तरतुदीपैकी 25 टक्के निधी हा कोविड-19 विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी राखीव करण्यात आला होता. 29 मे 2020 रोजीच्या पत्रकान्वये याला खर्च करण्याची मंजुरी देखील देण्यात आली होती.

दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असल्यामुळे 33 टक्क्यांमधील 25 टक्के रक्कम ही अपूर्ण पडत असल्याने राज्य शासनाने ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली होती. या मागणीला राज्य मंत्रीमंडळाच्या नुकत्याच 6 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21च्या अंतर्गत उपलब्ध होणार्‍या 33 टक्के तरतुदींपैकी 50 टक्के निधी हा कोविड-19 विषाणूवरील उपाययोजना आणि सार्वजनीक आरोग्य विभाग तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या जिल्हास्तरीय आरोग्य विषयक सुविधा बळकट करण्यासाठी वापरण्याची मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जळगाव जिल्हयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपलब्ध निधीचा उपयोग गरजूंच्या उपचारासाठी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या