जळगाव : जिल्ह्यात परदेशातून आलेल्या 306 नागरीकांचा क्वारंटाईन कालावधी संपला

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव –

परदेशातून जळगाव जिल्ह्यात 1 मार्च, 2020 पासून आतापर्यंत 306 नागरीक आले आहे. या नागरीकांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नसल्याची माहिती नोडल अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली आहे.

मार्च महिन्यापासून जे नागरिक परदेशातून जिल्ह्यात आले होते. त्यांचा संपूर्ण तपशील जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. हे नागरिक कोरोना विषाणू संसर्गाच्या हायरिस्क मधील होते, त्यामुळे त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. त्यांचा 14 दिवसांचा संकटग्रस्त कालावधी संपला आहे. यामुळे परदेशातून आलेल्यांमुळे तुर्ततरी भिती नसल्याने जळगाव जिल्हावासीयांसाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात परदेशातून किती लोक आले, त्यांना कोरोना झाला असेल का ? ते कोठे असतील आपल्याला त्यांच्यापासून धोका आहे ? अशी भिती जिल्ह्यातील नागरिकांना होती. मात्र आता या भितीची गरज नाही. जे परेदशातून आले त्यांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेवून त्यांना क्वारंरटाईन केले आहे. त्यांचा 14 दिवसांचा संकटग्रस्त (कोरोनोचे) कालावधीही संपला आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी कमलाकर दंडवते यांनी दिली आहे.

23 मार्चला जनता लॉकडाऊन नंतर भारतभर लॉकडाऊन झाला. जे नागरिक परदेशातून जळगाव जिल्हयात आले होते. त्यांचा शोध घेण्यास जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने सांगितले होते.

परदेशातून आलेल्यांचा शोध घेवून त्यांची स्क्रीनींग करून, ते कोठेकोठे गेले याबाबतची माहिती घेण्यास सांगितली होती. त्यासाठी अंगणवाडी सेविका, अशा वर्कर, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर विभागाचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांना दक्षतेचे आदेश देत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनास देण्यास सांगितली होती. समन्वयक अधिकारी म्हणून महापालिका क्षेत्रासाठी लेखाधिकारी कपिल पवार तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अशी आहे वस्तूस्थिती
जिल्ह्यात एक मार्चपासून ग्रामीण भागात 220 तर महापालिका हद्दीत 86 असे परदेशातून एकूण 306 नागरिक आले. जे परदेशातून आले होते अशा नागरिकांच्या संपर्कात 259 नागरिक आले होते. त्यातील ग्रामीण भागात 92 तर महापालिका हद्दीत 167 नागरिकांचा समावेश आहे.

या 259 नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने योग्य ठिकाणी क्वारंटाईन केले होते. या नागरिकांचा आता क्वारंटाईनचा कालावधीही (14 दिवसांचा) संपला आहे. हे नागरिक आता सर्वसामान्यासारखे व्यवहार करू शकतात. यामुळे जिल्ह्यात आता परदेशातून आलेल्या नागरिक, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांपासून कोरोना संसर्गाचा फारसा धोका नाही.

“निजामोद्दीन’येथून आलेल्या 49 जणांचा प्रशासनाने घेतला शोध

दिल्ली (निजोमोद्दीन) येथे 13 ते 17 मार्च 2020 दरम्यान असलेले व त्यानंतर जळगाव जिल्ह्यात आलेल्या 50 नागरीकांची यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या 50 नागरीकांपैकी 1 एप्रिलला 13, तीन एप्रिलला 31 व पाच एप्रिलला 6 नागरीकांची यादी प्राप्त झाली आहे. त्यातील 49 जणांचा शोध जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापैकी 24 जण हे जिलह्यातील असून 6 जण हे राज्याच्या इतर जिल्ह्यातील आहे तर 19 जण हे महाराष्ट्राबाहेरील आहे.

यामध्ये रेल्वे, सैन्य दलातील व इतर व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचाही क्वारंटाईन कालावधी संपला आहे. यामुळे भितीचे कारण नाही. तर एका व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या 50 व्यक्तीपैकी कोणाचाही मरकज येथील कार्यक्रमात सहभाग नव्हता. असे श्री. दंडवते यांनी कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *