शहराच्या प्रत्येक वॉर्डात आता काँग्रेसचाही स्वतंत्र नगरसेवक

नागरिकांना 20 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

0
जळगाव । महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतरही शहरातील नागरिक अजूनही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळेच आता निवडणुकीत पराभूत झालेली काँग्रेस जनतेच्या सेवेसाठी पक्षातर्फे स्वतंत्र नगरसेवक नेमणार आहे. काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी रविवारी काँगे्रस भवनातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महानगरपालिकेत सत्तांतर होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी परिस्थिती जैसे थे आहे. नागरिकांना कराच्या बदल्यात रस्ते, पाणी, साफसफाई, दिवाबत्ती, ह्या मुलभूत सुविधाही मिळणे दुरापास्त झाल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितले.

या योजनेसाठी काँग्रेसतर्फे शहराच्या प्रत्येक वॉर्डातील इच्छुक नागरिकांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येणार आहेत. नमुना अर्ज काँग्रेसच्या कार्यालयात रविवार, 17 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध होतील. इच्छुकांना नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, मोबाईल नंबर नोंदवून अर्ज उपलब्ध होतील. ‘जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी’ या फेसबुक पेजवरुनही हा अर्ज डाउनलोड करून घेता येईल. विहीत नमुन्यातील अर्ज 20 फेब्रुवारीपर्यंत काँग्रेस कार्यालयात जमा करता येतील. त्यावर शहर जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेऊन त्या-त्या प्रभागात प्रती नगरसेवक नेमणार आहे. समितीत माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकार्‍यांचा समावेश असेल.

नियुक्तीच्या अटी-शर्ती
1) अर्जदार ‘त्या’ प्रभागातील रहिवाशी असावा अथवा प्रभागातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली असल्यास प्राधान्य 2) नियुक्तीआधी काँग्रेसचे सक्रीय सदस्यत्व घेणे अनिवार्य राहील. 3) त्या प्रभागातील 10 मतदार, रहिवाशी यांची नाव, मोबाईल, वोटर कार्ड क्रमांकासहित शिफारस असावी. 4) सदर उमेदवार मारामार्‍या, विनयभंग, खून, भ्रष्टाचार अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोपी नसावा. किंवा तत्सम गुण्यात शिक्षा झालेली नसावी. 5)सदर उमेदवार अवैध वाळू व्यवसायाशी सबंधित नसावा. 6) सदर उमेदवार मनपातील ठेके घेणारा नसावा. (तसे शपथपत्रद्यावे लागेल). 7) जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा, निरसन हे सर्व जनतेसाठी नि:शुल्क करावे लागेल. सदर प्रती नगरसेवकांची नियुक्ती केल्यावर त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. ही नियुक्ती 3 महिन्यासाठी असेल. या तीन महिन्याच्या कामकाजाच्या अहवालानुसार पुढील नियुक्ती नियमित करण्यात येईल. त्यांचा एक संपर्क क्रमांक प्रभागात जाहीर करण्यात येईल.

जळगाव शहरातील नागरिकांनी काँग्रेसला जरी नाकारले असले तरी काँग्रेसला शहराप्रती आपल्या उत्तरदायित्वाचे भान आहे. शहर जनताभिमुख करण्यासाठी, नागरिकांचे महानगरपालिकेतील प्रश्न, समस्या सुटाव्यात यासाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेऊन उपाय योजना आखली आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष सर्व प्रभागात प्रती नगरसेवक नेमणार आहे. ह्या प्रती नगरसेवकांच्या मदतीने शहर काँग्रेस संबंधित प्रभागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करेल.
– डॉ.राधेश्याम चौधरी

LEAVE A REPLY

*