Thursday, April 25, 2024
Homeजळगावसिव्हिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची अचानक झाडाझडती

सिव्हिलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची अचानक झाडाझडती

जळगाव 
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बुधवारी शिवजयंतीची सुटी असतानाही सायंकाळी 7.45 वाजेच्या सुमारास अचानक जिल्हा रुग्णालयास भेट दिली. याप्रसंगी त्यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डातील सेवासुविधा, कर्मचार्‍यांचे कामकाज बघितले. अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्याने संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांनी धारेवर धरले.

जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहचताच सीएमओ रुममध्ये ड्युटी कोण आहे? हे त्यांनी बघितले, असता त्या ठिकाणी कोणीच हजर नव्हते. नंतर त्यांना ड्युटीवर महिला वैद्यकीय अधिकारी ड्युटीवर असल्याचे कळाले. त्यांनी कामकाजाची माहिती घेण्यासाठी त्या महिला वैद्यकीय अधिकार्‍यांना बोलवण्याचा निरोप दिला असता, त्या अधिकारी जिल्हाधिकार्‍यांच्या निरोपाकडे दुर्लक्ष करीत निघून गेल्या. याबाबत त्यांनी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांना दिले. तसेच रुग्णालयात काही ठिकाणी चांगली सुविधा व स्वच्छता असल्याबाबत कौतुकही केले. परंतुु, जे कर्मचारी कामाबाबत हलगर्जीपणा करत असतील, त्यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांनी आपतकालीन विभाग, कैदी वॉर्ड, महिला, पुरुष, बाळ रुग्ण, एनआयसीयू, प्रसुती विभाग, प्रसुती पश्चातचा विभाग, टीबी वॉर्ड, रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच्या प्रतीक्षागृहाची पाहणी केली. योग्य सोयीसुविधा मिळतात? पुरेशा प्रमाणात औषध व इतर साधनसामुग्री मिळते का? याबाबत रुग्णांशी बोलून व प्रत्यक्ष पाहणीतून खात्री केली. महिला कक्षात उपचारासाठी दाखल रुग्णांच्या बेडवर व्यवस्थित बेडशीट आढळले नाही. याबाबत त्यांनी पुरेशा प्रमाणात बेडशीट उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. काही ठिकाणी टीव्ही बंद होते.

पैसे मागत असल्याची तक्रार
रुग्णालयातील कर्मचारी, अधिकारी अनेक कामांसाठी पैशांची मागणी करतात. अनेक तपासण्या बाहेरुन ठराविक ठिकाणाहून करायला सांगतात. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार करीत नाहीत. त्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे, भगवान सोनवणे, शुभम तायडे यांनी केली. याबाबत चौकशी करुन दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

काही वॉर्डात पुरेशा प्रमाणात जागा, बेड नसल्यामुळे त्यांना वॉर्डाबाहेर बेडवर अथवा खाली झोपवून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आढळले. रुग्णांसोबत मोजकेच नातेवाईक रहावे, असेही त्यांनी उपस्थित नातेवाईकांना सांगितले. तसेच तक्रारपेटी लावण्याच्या सूचना देखील दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या