निधीअभावी जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प रखडले

0
जळगाव । दि.6 । प्रतिनिधी-जिल्ह्यात मंजुर करण्यात आलेल्या टिश्युकल्चर प्रकल्प, पशुवैद्यकीय महाविद्यालय, निंबूवर्गीय संशोधन प्रकल्प निधी अभावी रखडले आहे.
या प्रकल्पांच्या निधींसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी माजी मंत्री आ.खडसे व आ.हरिभाऊ जावळे यांनी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रखडलेल्या प्रकल्पांबाबत कृषीमंत्र्यांसोबत मुंबईत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.

यावेळी जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, सहकारमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वला पाटील, खा. ए.टी. पाटील, खा. रक्षा खडसे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आ. हरिभाऊ जावळे, आ. शिरीष चौधरी, आ. संजय सावकारे, आ. उन्मेष पाटील, आ. किशोर पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. स्मिता वाघ, आ. चंदुलाल पटेल यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीला नियोजन समितीत कामकाजाचा आढावा घेवून खर्च, मंजुरीबाबत माहिती देण्यात येवून अवघ्या 20 मिनीटात बैठकीचे कामकाज पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर आमदारांनी विविध प्रश्न मांडल्याने अवघ्या पावणे दोन तासात बैठक आटोपण्यात आली. यावेळी आ. खडसे यांनी यावल तालुक्यातील हिंगोणा येथे केळी टिश्युकल्चर प्रकल्पासाठी धरणाखाली 60 एकर जागा देण्यात आली होती.

तरी देखील या प्रकल्पाच्या सुरु होण्याच्या हालचाली नाही. चाळीसगाव येथील लिंबूवर्गीय संशोधन केंद्रासाठी जागा प्रस्तावित करण्यात आलेली असतांना तसेच पशु वैद्यकीय महाविद्यालयासाठी 100 एकर जागा देण्यात आलेली असतांना या प्रकल्पांसाठी कुठलीही तरतुद करण्यात आलेली नसून याबाबत राज्यकृषीमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात यावी असे आ. खडसे म्हणाले.

नियोजन समितीच्या बैठकीत वेळ कमी असल्याने प्रश्न मांडण्यासाठी आमदारांनी चांगलाच गोंधळ केला. यावेळी सर्वाधिक प्रश्न आ.किशोर पाटील यांनी मांडले.

कृषीपंपाचे 9 हजार कनेक्शन प्रलंबित
महावितरण आपल्या दारी अंतर्गत जिल्हयातील 9 हजार शेतकर्‍यांनी कृषीपंपाच्या सन 2011 पासून कनेक्शनसाठी पैसे भरले आहे.

निधी अभावी या शेतकर्‍यांना कनेक्शन मिळाले नाही. तसेच 2 हजारपेक्षा अधिक नियमित कनेक्शन प्रलंबित आहे. यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जिल्हाला निधी नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

डिपीडीसीच्या बैठकीचा वेळ वाढविण्यात यावा
जिल्हा नियोजन समितीची अर्थात डिपीडीसीची बैठक तीन महिन्यातून एकदा होत असल्याने या बैठकीत विषय मांडण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी बैठकीचा वेळ वाढविण्यात यावा, एक-दिड तासात कसे प्रश्न मांडणार?त्याचप्रमाणे बैठकीचा अजेंडा बैठकीच्या अगोदर देण्यात यावा अशी मागणीही यावेळी आ. किशोर पाटील यांनी केली.

यावर पालकमंत्री यांनी आमदारांनी तीन – चार दिवस अगोदर आपल्या मतदार संघातील प्रश्न पाठवावेत त्यानुसार बैठकीत चर्चा करण्यात येईल. यापुढे नियोजन समितीच्या बैठकीबाबत 15 दिवस अगोदर कळविण्यात येईल असे सांगितले.

उपनगरातील शेतकरी लाभापासून वंचित- आ. राजुमामा भोळे
जळगाव शहरात पिंप्राळा, शिवाजीनगर, सावखेडा यासारखे उपनगर जोडलेले आहे. या उपनगरातील शेतकर्‍यांना शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा आ. राजुमामा भोळे यांनी उपस्थित केला.

यावेळी आ. किशोर पाटील यांनी देखील क- वर्ग नगरपालिका हद्दीतील शेतकर्‍यांना लाभ मिळावा अशी मागणी केली. तसेच राज्याच्या सिमा हद्दीवरील रहिवाशी शेतकर्‍यांना देखील योजनांचा लाभ होत नसल्याचे आ. खडसे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील शेतकर्‍यांना लाभ देता येत नाही असे सांगितले.

यावर पालकमंत्री ना. पाटील महापालिकेच्या उपनगर व नगरपालिकांच्या हद्दीत शेतकर्‍यांना लाभ देण्याबाबतचा ठराव करून कृषीमंत्र्यांना देण्याचे आश्वासन दिले.

सावकारे यांनी पाणी पुरवठा योजनेंच्या बिलांबाबत मांडली समस्या
भुसावळ तालुक्यातील चार पाणी पुरवठा योजनांची वीज बिले अधिक येत असल्याने अनेकदा विज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी नागरिकांना पाणी मिळत नाही.

वसुली होत नसल्याने ही समस्या निर्णय होत असल्याचे आ. संजय सावकारेंनी सांगितले. यावर पालकमंत्री यांनी सीईओंना सर्वात प्रथम बिले कसे भरता येतील याबाबत निर्णय घेवून टेक्नीकल कमेटी तयार करून ही समस्या सोडवावी असे सांगितले.

वैद्यकीय अधिकार्‍यांचा जागा रिक्त- आ. जावळे
जिल्हयातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक अडचणी येतात. जिल्हात 50 ते 60 टक्के जागा रिक्त असून या जागा वॉक न इंटरव्यू घेवून भरण्यात याव्यात अशी मागणी आ. हरिभाऊ जावळे यांनी केली.

यावेळी अमळनेर तालुक्यातील मुडी-मांडळ येथील उपकेंद्र बंद असल्याचे व पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली असल्याचे आमदारांनी सांगितले.

आरोग्य विभागासोबत बैठक घेण्यात यावी
जिल्हयात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने व जिल्हा रुग्णालयातील सीटीस्कॅन मशिन बंद असल्याने आरोग्य विभागासोबत बैठक घेण्यात यावी अशी मागणी आ. खडसे यांनी केली.

नदीजोड साठी 5 कोटींची मागणी
नदीजोड साठी पुर्वी निधी देण्यात येत होता. हा निधी बंद झाल्याने नदीजोडची बरीचशी कामे अपूर्ण आहे. त्यामुळे नदीजोडसाइी 5 कोटींचा निधी देण्यात यावी अशी मागणी बैठकीत किशोर पाटील यांनी केली.

त्याचप्रमाणे भडगाव तालुक्यात एमईसीबीचा प्रश्न बिकट असून वारा वादळाने पोल पडणे, तारा तुटण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे डिपीडीसीतून एमईसीबीला निधी देण्यात यावा असेही आ. पाटील म्हणाले.

अमळनेर तालुक्यातील कामे निकृष्ट दर्जाची
अमळनेर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतर्गत करण्यात आलेली 69 सिमेंट बंधार्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा दावा आ. शिरीष चौधरी यांनी केला असून ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

बहिणाबाई स्मारकासाठी निधीची तरतुद करा
जळगाव तालुक्यातील असोदा येथे सुरु असलेल्या बहिणाबाई स्मारकासाठी व धरणगाव येथील बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी निधीची तरतुद करण्यात यावी अशी मागणी सहकारमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

यावेळी खा. ए.टी. पाटील यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी दिड एकर जागा असून निधी देण्यात यावा अशी मागणी केली.

 

 

LEAVE A REPLY

*