रोजगाराभिमुख स्वावलंब, सक्षमीकरणासाठी ‘मूजे’ ची ‘स्वायत्ता’

0
सुषलर भालेराव
जळगाव । मू.जे.महाविद्यालयास स्वायत्तता प्रदान करण्याच्या दृष्टीने पाहणीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) समिती नुकतीच महाविद्यालयास भेट देवून गेली. समितीने महाविद्यालयातील एकूण परिस्थिती जाणून घेवून स्वायत्ततेसंदर्भातील सूचना देवून संस्थेच्या अडीअडची जाणून घेतल्या. दोन दिवसांच्या पाहणीवर आधारित गोपनीय अहवाल समितीने ‘यूजीसी’कडे पाठविल्याचे समजते. मू.जे.महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान होईलच, असा व्यवस्थापनाला विश्वास आहे. बंगलोरच्या नॅक मूल्यांकन समितीचेे ‘अ दर्जा’ मानांकन महाविद्यालयास पूर्वीच तीनवेळा प्राप्त झालेले असल्याची माहिती मू.जे.चे प्रशासन अधिकारी डॉ.डी.जी.हुंडीवाले यांनी दिली.

महाविद्यालये ही विद्यापीठाशी संलग्न असल्याने, महाविद्यालयांवर विद्यापीठाचे नियंत्रण असते. परंतु महाविद्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यापीठांसाठी ही परिस्थिती जिकीरीची होवून बसलेली आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून, काळाची पावले ओळखून शासनाने ‘स्किल डेव्हलपमेंट’साठी महाविद्यालयांची स्वायत्तता ही संकल्पना मनुष्यबळ विकास मंत्रालय (एचआरडी) व ‘यूजीसी’च्या माध्यमातून मांडली गेलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने लक्षात घेता एचआरडी व ‘यूजीसी’ने नॅक मूल्यांकन झालेल्या महाविद्यालयांना स्वायत्ता होण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे कोणत्याही चौकटीत न राहता शिक्षणाचा दर्जा उंचावून कुशल विद्यार्थी निर्माण होण्यासाठी मदतच होईल. हे धोरण डोळ्यासमोर ठेवून ‘यूजीसी’नेे निकषांची पूर्तता करत असलेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता प्रदान करण्याचे मुख्य उद्दीष्ट ठेवले आहे. या सर्व निकषात ‘मूजे’ उत्तीर्ण होत असल्याचे प्राथमिक चित्र आहे.

स्वायत्तताधारक महाविद्यालयांना ‘चॉईस बेस एज्युकेशन’वर जास्तीत-जास्त भर देत प्रत्येक‘फॅकल्टी’चा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्वक तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यासोबतच अभ्यासक्रमाचा दर्जा, तज्ज्ञ शिक्षकांच्या नियुक्त्या व त्यांचे पगार, शैक्षणिक फी चा समतोल साधावा लागेल. चांगले ‘इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘कॅम्पस इंटरव्ह्य’ूमधून विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त ‘प्लेसमेंट’ मिळवून द्यावे लागेल. स्वायत्ततेनंतर महाविद्यालयांना विद्यार्थी हितही लक्षात घ्यावे लागणार आहे.

गुणवत्तानिहाय प्रवेश
मू.जे.महाविद्यालयाचा शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक असून यशस्वी विद्यार्थी घडविण्याची परंपरा आहे. महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान झाल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्तानिहायच प्रवेश मिळेल. त्यासाठी भविष्यात मू.जे. महाविद्यालयातून शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

प्रॉडक्टीव्ह स्किल डेव्हलपमेंट
स्वायत्त महाविद्यालयातून शिकविल्या जाणार्‍या अभ्यासक्रमातून औद्योगिक गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविले जाणार असल्याने रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेलच; पण त्यासाठी जळगाव औद्योगिक वसाहतीतही त्याप्रकारच्या संधी निर्माण व्हायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

*