Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगावात श्वानांनी केले पोलिसांचे काम सुकर

Share
जयेश शिरसाळे
जळगाव । सदैव दक्ष असणार्‍या व इमाने इतबारे मालकाचे रक्षण करणार्‍या कुत्र्याचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. त्याच्या याच प्रामाणिकपणाचा फायदा पोलिस खात्यालाही होत असून, पोलिस खात्यातील श्वानांमुळे अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे. जळगाव पोलिसांकडे असलेल्या हॅप्पी, जंजीर, जॅक व चाम्प या श्वानांनी पोलिसांचे काम बरेच सुकर केले आहे.यातील जॅक हा श्वान अंमली पदार्थाची तस्करी रोखण्याचे काम बजावतो. जॅक हा श्वान जर्मन शेफर्ड, तर हॅप्पी, जंजीर व चाम्प हे डाबरमॅन जातीचे आहेत.

पोलिस दलातील हे श्वान म्हणजे जणू काही पर्मनंट कर्मचारीच. त्यांनाही सर्व शासकीय सेवा लागू आहेत. एवढेच नाही तर या श्वानांच्या देखभालीसाठी खास लोकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. पोलिस दलातील प्रत्येक कर्मचार्‍याप्रमाणे 24 तास ऑन ड्युटी राहणार्‍या या श्वानांमुळे जिल्ह्यातील अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरमहा तपासणी
पोलिस दलाच्या सेवेत कार्यरत असलेल्या श्वानांची दर महिन्याला वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याच बरोबर पशुवैद्यकाने सुचविल्याप्रमाणे त्यावर औषधोपचार देखील केले जातात. त्यांना खाण्यासाठी कंपनीकडून पुरविण्यात येणार्‍या गोळ्या दिल्या जातात. त्याच बरोबर या श्वानांचा आहार देखील ठरलेला असतो. या श्वानांच्या निगराणीसाठी असलेल्या डॉगमनला देखील पुण्याला 9 महिन्यांचे ट्रेनींग दिले जाते. संपूर्ण महाराष्ट्राचे ट्रेनिंगंसेंटर फक्त पुण्यात शिवाजीनगर भागात आहे. तर संपूर्ण देशभरातील पोलिस, मिलीटरी व इतर सुरक्षा यंत्रणांच्या श्वानांसाठीचे ट्रेनिंग सेंटर ग्वाल्हेर येथील डेक्कनपूर येथे आहे. या ट्रेनिंगमध्ये त्यांना डॉगची हाताळणी कशी करायची, त्याच्याबरोबर कसे रहायचे, त्याची काळजी आणि निगराणी कशी घ्याची याचे प्रशिक्षण देण्यात येते.

बॉम्बशोध, गंभीर गुन्ह्यांत वापर
पोलिस दलात बॉम्ब शोध व गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी श्वानांचा वापर करण्यात येतो. पोलिस दलात दोन प्रकारचे श्वान असतात. त्यात एक आयपीसी व दुसरा बॉम्ब शोधक पथकातील श्वान. या श्वानांची खरेदी पुण्यातील कॅनॉल क्लब येथून केली जाते. त्यानंतर त्यांना 9 महिने पुणे पोलिसांच्या श्वान अकादमीत ट्रेनिंग दिले जाते. त्यानंतर त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी आणले जाते. जिल्ह्याच्या ठिकाणी आणल्यानंतर या श्वानांचा गुन्ह्यांच्या तपासात प्रत्यक्ष वापर करून घेतला जातो.

देखभालीसाठी सात पोलिस
पोलिस दलाच्या श्वान पथक विभागात पोलिस उपनिरीक्षक शामराव सोनुले यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचार्‍यांनी वर्षभराचे प्रशिक्षण झाले असून त्यानुषंगाने ते श्वानांची देखरेख ठेवून घटनेच्या वेळी त्यांच्या हालचाली टिपत असतात. व त्यानुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्यास मदत होते.

‘हॅप्पी’वर बनणार स्वतंत्र स्टोरी
ा जळगाव शहरामधील समतानगर परिसरातील नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा हत्या करण्यात आल्याची घटना मागील आठ महिन्यांपूर्वी घडली होती. या गंभीर गुन्ह्यात पोलिस दलाच्या हॅप्पी श्वानाने चपळाई दाखवित घटनास्थळापासून शिरसोली रस्त्यापर्यंतचा मार्ग पोलिसांना दाखविला. त्यामुळे संशयिताचा शोध घेण्यास मदत होवून पोलिसांना संशयितापर्यंत पोहचणे शक्य झाले. हॅप्पी या श्वानाच्या या कामगिरीमुळे मुंबई पोलिस महासंचालनालय कार्यालयाने या श्वानाची दखल घेतली असून त्यावर स्वतंत्र स्टोरी तयार करण्यात येणार असल्याचे श्वान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शामराव सोनुले यांनी सांगितले.

‘चाम्प’मुळे उघडकीस आली घरफोडी
चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेतील चोरट्यांपर्यंत पोहचण्यास चाम्प या श्वानाची पोलिसांना चांगलीच मदत झाली. चाम्पने दाखविलेल्या मार्गाने पोलिसांनी तपासाला सुरुवात करून संशयित चोरट्यांना गजाआड केले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!