Blog : शिक्षकांची ससेहोलपट थांबणार ?

0

विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य, परंतु याचा शिक्षण विभागाला तसेच सरकारला विसर पडल्याचे दिसते. त्यामुळे शिक्षकांवर सतत अशैक्षणिक कामांचा बोजा टाकला जात आहे.

शिक्षकांनी नुकत्याच काढलेल्या मोर्चात या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले. आता तरी सरकार शिक्षकांवरील इतर कामांचा बोजा कमी करून ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे स्वातंत्र्य देणार का, हा खरा प्रश्न आहे.

ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान समजले जाते. शिक्षित समाजाच्या निर्मितीत आणि एकूणच सामाजिक परिवर्तनात शिक्षकांचे योगदान नेहमीच महत्त्वाचे ठरत आले आहे.

फार पूर्वी आपल्या देशात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जायचे. तेव्हापासून आजतागायत शिक्षणाचे स्वरूप बदलत गेले असले तरी त्याचश्रे महत्त्व कायम आहे.

पूर्वी शिक्षणाची दारे सर्व वर्गांसाठी खुली नव्हती. समाजसुधारकांनी वेळोवेळी केलेले प्रयत्न, संघर्ष यामुळे समाजातील सर्व वर्गांना शिक्षणाचा लाभ घेणे शक्य झाले.

पुढे बदलत्या काळात विविध क्षेत्रात बदल झाले. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद राहिले नाही. बदलत्या काळाची गरज ओळखून शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल होत राहिले.

व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. शिक्षणाची गंगा तळागाळातील समाजापयर्ंंत नेण्यावर भर दिला गेला. त्यातून वस्ती शाळा, अंगणवाड्या अशा संकल्पना समोर आल्या.

याद्वारे खेड्यापाड्यातील, दुर्गम भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. या वाटचालीत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी शिक्षकवर्गाने दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले.

अशारितीने शिक्षण क्षेत्राला मोठा इतिहास लाभला आहे. परंतु शिक्षण क्षेत्राला वेळोवेळी काही समस्यांचाही सामना करावा लागला. त्यात शिक्षकांच्या समस्यांचाही समावेश होतो.

शिक्षकांवर असणारा अशैक्षणिक कामाचा बोजा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यासंदर्भात शिक्षकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा, असा आग्रह धरला.

परंतु सरकार आणि शिक्षण खात्यावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या शिक्षकांच्या मोर्चा आंदोलनात अशैक्षणिक कामे कमी करण्याची आग्रही मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.

विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य ठरते. किंबहुना, शिक्षकांची नेमणूक याच कार्यासाठी केलेली असते. परंतु शिक्षण विभाग तसेच सरकारला याचा विसर पडल्याचे दिसत आहे किंवा शिक्षकांना शिकवण्यासाठी दिलेला वेळ अपेक्षेपेक्षा बराच अधिक आहे आणि म्हणून उरलेल्या वेळेत त्यांनी इतर कामे करावीत, अशी सरकारची अपेक्षा असावी की काय, असा प्रश्न पडतो.

अर्थात दुसरीकडे घसरत चाललेल्या शैक्षणिक दर्जाबद्दलही चिंता व्यक्त होत आहे. विशेषत: प्राथमिक शिक्षणाची होत असलेली हेळसांड, शिक्षणबाह्य मुलांची संख्या, विद्यार्थ्यांची गळती याही बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत.

परंतु शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाच्या वाढत्या बोजामुळे हे चित्र समोर येत आहे का, हाही विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. अनेक वर्षांपासून ठराविक कामे शिक्षकवर्गावरच सोपवली जात आहेत.

त्यात जनगणना, मतदार नोंदणी, निवडणुकांची कामे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय अलीकडे दारिद्य्ररेषेखाली असणार्‍यांची नोंदणी, कुटुंबनियोजनाबाबतची माहिती, पोलिओ लस ही कामेही शिक्षकांवर सोपवली जाऊ लागली आहेत.

यात अंगणवाडी शिक्षिका तसेच कर्मचार्‍यांचाही समावेश होतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत कुटुंबनियोजनाची प्रकरणे आणण्याचे कामही शिक्षकांकडे असायचे.

एवढेच नाही तर कुटुंबनियोजनाची प्रकरणे अमूक एका संख्येतच व्हायला हवीत, असा आग्रहही धरला जात असे. अलीकडे या कामाचा बोजा कमी झाला आहे.

मात्र वेळोवेळी कराव्या लागणार्‍या सर्वेक्षणासाठी शिक्षकांनाच वेठीस धरले जात आहे. यासंदर्भात विचार करताना एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो.

तो म्हणजे सरकारने शिक्षकांकडे आणि एकूणच शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. कारण शिक्षक हे राखीव कर्मचारी आहेत, असा सरकारचा समज असल्याचे पाहायला मिळते.

त्यामुळे अतिरिक्त कामे येतात तेव्हा शिक्षकांवरच सोपवण्यावर सरकारचा भर असतो. हा दृष्टिकोन सरकारने बदलायला हवा. दुसरीकडे शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याला कोणती कामे करावी लागतात किंवा आपली नेमकी कर्तव्ये कोणती याची माहिती शिक्षकांना असायला हवी.

सुनील कदम – शिक्षण तज्ञ

त्यासाठी त्यांनी अपटूडेट राहायला हवे. म्हणजे शिक्षण क्षेत्राबाबत आजूबाजूला घडणार्‍या घटना-घडामोडी, शिक्षण क्षेत्रातील नवे प्रयोग यांची जाण सर्वच शिक्षकांना असायला हवी.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय करायला हवे, याचा सतत विचार केला पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत समाधानकारक चित्र समोर येत नसेल आणि शिक्षक केवळ पाट्या टाकण्याचे काम करतात, असा सरकारचा समज झाला तर अतिरिक्त कामे लादली जाणार, हे उघड आहे. त्यासाठी सरकारला दोष देणे कितपत योग्य आहे, याचा विचार करायला हवा.

खरे तर शिक्षक हा पूर्णवेळ शिक्षक असतो. शाळेच्या व्यतिरिक्त उर्वरित वेळात विविध विषयांचे चिंतन, मनन करावे लागते. शिवाय विषयांचे टाचण काढणे, दुसर्‍या दिवशीच्या विषयाची तयारी करणे, याही बाबी गरजेच्या ठरतात. शिक्षकांनी पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता असते.

सर्व शिक्षक अशी मेहनत घेतात का, हाही प्रश्न आहे. समाज शिक्षकांकडे आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहत असतो. त्यामुळे समाजाच्या शिक्षकांकडून बर्‍याच अपेक्षा असतात. त्या सार्‍याच पूर्ण होतात असे नाही.

अलीकडे हंगामी शिक्षक, कंत्राटी शिक्षकांची संख्या वाढली आहे. अशा शिक्षकांकडूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा असते. त्याबाबतही चिंतनाची आवश्यकता आहे.

या परिस्थितीत अशैक्षणिक कामात गुंतल्यामुळे अनेक ठिकाणी महिना-दोन महिना त्या त्या विषयाचे तास होत नाहीत. उदाहरण द्यायचे तर जनगणनेचे काम दीड वर्षे चालते.

या काळात शिक्षकांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होते. निवडणूक काळातही शिक्षक वर्गावर जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सातत्य राहत नाही.

परिणामी विद्यार्थ्यांची त्या विषयातील आवड कमी होते. त्यांची त्या त्या विषयाचे आकलन होण्याची अपेक्षा पूर्ण होत नाही. विशेषत: इंग्रजी, गणित आणि शास्त्र हे विषय शिकवण्यात सातत्य लागते. अन्यथा विद्यार्थ्यांना त्या विषयात आवश्यक गती लाभत नाही.

या विषयातील अनुत्तीर्णांचे प्रमाण अधिक असण्यामागे हेही एक कारण असणार आहे. खरे तर उत्तम शिकवणे ही एक कला आहे. ती सर्वांनाच जमते असे नाही, परंतु जमते त्यांच्यावर अशैक्षणिक कामांचा बोजा असेल तर त्याचा शिकवण्यावर निश्चित परिणाम होतो.

या सार्‍या बाबींचा विचार करता अशैक्षणिक कामांसाठी सरकारने काही राखीव कर्मचारी नियुक्त करणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपल्याकडे अतिरिक्त कामांचा बोजा अधिक राहत आला आहे.

त्यात वेळोवेळी नव्या कामांची भर पडते. त्यादृष्टीने या राखीव कर्मचार्‍यांचा उपयोग होऊ शकतो. यातून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा कमी होऊन ते मोकळा श्वास घेत अधिक मोकळेपणाने ज्ञानदान करू शकतील.

 

 

 

LEAVE A REPLY

*