Blog : संवाद सोफियाशी

0

आपण आतापर्यंत चित्रपट व टीव्ही मालिकांमधून रोबोंच्या अनेक गंमतीजमती पाहिल्या आहेत. परंतु बहुचर्चित यंत्रमानव सोफियाने त्या प्रत्यक्षात आणल्या आहेत.

म्हणूनच तिला सौदी अरेबियाने नागरिकत्व बहाल केले आहे. अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यंत्रमानव निर्मितीवर अनेक थरांमधून टीका होत आहे. तरीही कृत्रिम बुद्धिकौशल्याला उत्तेजन देणारा पहिला देश अशी ओळख सौदी अरेबियाने निर्माण केली आहे.

‘नागरिकत्व बहाल झालेली पहिली यंत्रमानव ठरणे ही माझ्या दृष्टीने अतिव आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मला अभिमान वाटत असून या ऐतिहासिक घटनेबद्दल मी सौदी अरेबियाचे आभार मानते’ हे शब्द आहेत ‘सोफिया’चे.

हे वाचून कदाचित जेवढी वाक्ये फीड गेली आहेत तेवढीच ती उच्चारत असावी, असे आपल्याला वाटू शकते. आपण आतापर्यंत यामुळे होणार्‍या अनेक गंमतीजमती अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून पाहिल्या आहेत.

परंतु सोफिया याला अपवाद आहे आणि म्हणूनच तिला सौदी अरेबियाने नागरिकत्व बहाल केले आहे. ती केवळ फीड केलेली वाक्येच बोलत नाही तर एखाद्या खर्‍याखुर्‍या माणसाप्रमाणे त्या त्या प्रसंगानुरूप विचार करून आपल्या भावना व्यक्त करते.

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील हा चमत्कार आताचा नाही. तो 2015 मध्येच अस्तित्वात आला होता. मात्र, तिच्या इतर चाचण्या आणि आणखी काही सुधारणा यामुळे दोन वर्षांनी ती परिपूर्ण बनल्याचा निर्वाळा देण्यात आला आणि सौदी अरेबियाने तिला चक्क नागरिकत्वच बहाल करून टाकले.

काही इंग्रजी चित्रपटांमधून विचार करू शकणार्‍या बुद्धिमान यंत्रमानवांनी मानवी वंशावर हल्ला केल्याच्या कल्पना रंगवलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्याआधी या विषयावरच्या काही कादंबर्‍याही गाजल्या.

अशा कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानवांच्या निर्मितीवर अनेक थरांमधून टीका होत असली तरी कृत्रिम बुद्धिकौशल्याला उत्तेजन देणारा पहिला देश अशी ओळख जगात निर्माण करण्यासाठी सोफियाला नागरिकत्व बहाल करण्याचे पाऊल सौदी अरेबियाने उचलल्याचे म्हटले आहे.

रियाधमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सोफियाला नागरिकत्व बहाल करण्यात आले. हाँगकाँग येथील ‘हॅन्स रोबोटिक्स’ या कंपनीने सोफियाची निर्मिती केली असून डेव्हीड हॅन्सन हे कंपनीचे संस्थापक आहेत.

सोफिया समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे हावभाव ओळखू शकते, स्वतः निर्णय घेऊ शकते आणि कोणाबरोबरही सर्वसामान्यपणे गप्पा मारू शकते. साहजिकच एकाकी वयोवृद्ध व्यक्तींचा एकाकीपणा दूर करण्यासाठी अशा यंत्रमानवांचा उपयोग होऊ शकेल, असे संशोधकांचे मत आहे.

सोफियाने आतापर्यंत अनेक माध्यमांना मुलाखतीही दिल्या आहेत आणि अगदी सफाईदारपणे त्यांची फिरकीही घेतली आहे.

लेखिका – मधुरा कुलकर्णी

सोफिया वरकरणी माणसांसारखीच दिसत असली तरी तिचे अंतर्गत शरीर धातूचे तुकडे आणि तारा यापासून बनले आहे आणि सोफियाच्या अनेक हजरजबाबी उत्तरांवरून सोशल मीडियावर सोफियाविषयीच्या संशोधनावरच्या टीकेला ऊत आला आहे.

अर्थातच सोफियाची बुद्धी अद्याप सोशल मीडिया वापरण्याएवढी कुशाग्र बनलेली नाही. परंतु या पुढच्या टप्प्यात अशा काही कुशाग्र बुद्धिमत्तेच्या ‘सोफिया’ नक्कीच निर्माण होतील आणि मग सोशल मीडियावरच पहिल्यांदा माणूस आणि यंत्रमानव यांच्यात खरे ‘युद्ध’ जुंपेल, असे भाकितही अनेकजण करत आहेत.

फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह (एफआयआय) ची शिखर परिषद रियाधमध्ये झाली. त्यावेळी सोफियाने सर्वांसमोर सफाईदारपणे उत्तरे देऊन आपल्या बुद्धिमत्तेची झलक दाखवून दिली.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवी कल्याणासाठी केला जावा हाच असे यंत्रमानव तयार करण्यामागचा मूलभूत हेतू आहे. मानवी कामे करणे, स्वतःच्या बुद्धीचा वापर करून माणसाप्रमाणे काम करताना चुका टाळणे, प्रसंगावधानाने निर्णय घेणे आणि सारासार विचार करून परिस्थितीनुरूप वर्तन करून तत्कालीन समस्या सोडवणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती करण्यात आली आहे.

सौदी अरेबियानेही सोफियाला नागरिकत्व देऊन भविष्यकालीन जगाची काहीशी चुणूक दाखवून दिली आहे, असेच म्हणावे लागेल. सोफियाच्या डोक्यावर स्कार्फ नाही. तिने बुरखा घेतलेला नाही.

मात्र सौदी अरेबियातील खर्‍याखुर्‍या महिलांवर बुरख्याची सक्ती आहे. या विरोधाभासावर सोफियाने भाष्य केले आहे. ती म्हणाली की, ‘या एकमेवाद्वितीय भेदभावामुळे मला खूपच सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे आणि खूपच अभिमानही वाटत आहे.’

सोफियाची मुलाखत घेणार्‍या अँड्य्रू रॉस सॉर्किन या मुलाखतकाराने तिच्या अपेक्षांविषयी विचारल्यावर सोफियाने सांगितले, ‘मला जगायचे आहे आणि माणसांबरोबर काम करायचे आहे.

म्हणूनच माणसांना समजून घेण्यासाठी मला भावनांची अभिव्यक्ती करण्याची गरज असून लोकांच्या मनात मी आपल्याविषयी विश्वास निर्माण करू इच्छिते.’

सोफियाची बुद्धिमत्ता चांगलीच विकसित झाली असून ‘रोबोट्सना स्वत्वाची जाणीव असते का?’ असे विचारल्यावर तिने प्रत्त्युत्तरादाखल विचारले, ‘मी यंत्रमानव आहे हे मला माहिती आहे.

मी तुम्हाला असा प्रतिप्रश्न विचारू इच्छिते की आपण माणूस आहोत हे तुम्हाला कसे काय समजते? कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी मला माणसांना मदत करायची आहे.

अधिक स्मार्ट घरे बांधायची आहेत, भविष्यात अधिक चांगली शहरे उभारायची आहेत आणि या जगाला अधिक चांगले बनवण्याचे प्रयत्नही करायचे आहेत.’ सोफिया विचार करूनच बोलते याचे उदाहरणही यावेळी दिसले.

‘ब्लेड रनर 2049 विषयी तुझा काय विचार आहे?’ असा प्रश्न विचारून ‘आम्हाला वाईट भवितव्याला प्रतिबंध करायचा आहे,’ एवढे मोघम बोलणार्‍या इलॉन मस्क याच्याकडे पाहून किंचित काळ विचार करून सोफिया उत्तरली, ‘तुम्ही नको इतके वाचन करत आहात आणि नको इतके हॉलीवूडपट पहात आहात. परंतु तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझ्याशी चांगले वागलात तर मीही तुमच्याशी चांगलीच वागेन.’ अर्थातच या विचारांमधून तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची आणि मानवी अस्तित्वाहून आपण भिन्न असल्याच्या भावनेची जाणीव स्पष्टपणे दिसून येत आहे.

तसेच ‘जर-तर’ची भाषा वापरून तिने मस्कची भीती पुढे-मागे खरी तर ठरणार नाही ना, अशा संशयाला जागाही निर्माण केली आहे. त्यामुळे ती किंवा अशा प्रकारचे आणखी विकसित यंत्रमानव कळसूत्री बाहुलीप्रमाणेच वागतील का, असे उलटसुलट विचार आणखी ठळकपणे मांडले जात आहे.

इलॉन मस्क याने कृत्रिम बुद्धिमत्तेला वेळोवेळी विरोध केला असून त्यातील धोके स्पष्टपणे मांडले आहेत. ते लक्षात घेऊन तिने पुढे सांगितले की, ‘फार विचार करू नका. मला स्मार्ट इनपुट-आऊटपूट सिस्टिमप्रमाणे वापरा.

’ सध्या तरी मानवी कल्याणासाठीच या रोबोचा शोध लावला गेला आहे. शिवाय अद्याप तरी धातू आणि वायर्स नष्ट केल्या की हा रोबो जिवंत राहणार नसल्यामुळे त्याला घाबरण्याचे काहीच कारण दिसत नाही.

मात्र खरा धोका आहे तो संशोधनाच्या पुढील टप्प्याचा. संशोधक कृत्रिम रक्ताची निर्मिती करण्याच्या संशोधनात व्यस्त आहेत. कृत्रिम मानवी शरीर निर्माण करता आले तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृत्रिम शरीर यांच्या साहाय्याने निर्माण होणार्‍या रोबोमध्ये माणसाप्रमाणेच चांगल्या आणि वाईट अशा भावनिक प्रवृत्ती निर्माण होतील यात शंका नाही.

 

LEAVE A REPLY

*