Blog : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक… टी.डी.एफ.ची प्रतिष्ठापणाला !

0

तुमची तुम्हीच करा आरास..
अन् तुमचे तुम्हीच लावा दिवे !
तुमच्यात मी येऊ कसा…
बदनाम झंझावात मी !

…स्वर्गीय कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या ‘एल्गार’ या काव्यसंग्रहातील प्रस्तुत शेर! ‘एल्गार’ म्हणजे आक्रमकता… यात काव्यपंक्तीतील ऊर्जा लेवून टी.डी.एफ. म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने जून 2018 मध्ये होऊ घातलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरूध्द टी.डी.एफ.चे अनेक शिक्षक ‘एल्गार’ पुकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षकांचा प्रतिनिधी हा हाडाचा शिक्षक असावा, नाशिक विभागातील हजारो शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करणारा शिक्षक हा सामान्य शिक्षकांमध्ये समरस होणारा आणि त्यांच्या समस्या जाणून घेणारा हवा.

अशाच उमेदवाराला उमेदवारी बहाल करण्याची जबाबदारी टी.डी.एफ.च्या म्होरक्यांवर असते. मात्र, यावेळी ही जबाबदारी नीटपणे सांभाळली गेली नसल्याचा आरोप टी.डी.एफ.वर शिक्षक उघडपणे करू लागले आहेत.

खरं तर शिक्षकांच्या निवडणुकीत राजकारण नसावं… पण राजकीय पक्षांनीही या निवडणुकीत घुसखोरी केल्याने, शिक्षक आमदारकीची ही निवडणूक मास्तरांची आहे की राजकीय सोय लावण्याची जाग ? हा प्रश्न सामान्य गुरुजनांना पडणे स्वाभाविक आहे. 6 नोव्हें.पर्यंत या निवडणूकीसाठी मतदार नोंदणी झाली.

यामध्ये नाशिक जिल्हा 5,354, नंदुरबार 3,880, धुळे 4,468 आणि जळगाव 6,646 आणि नगर जिल्ह्यातून 9,047 अशी नोंदणी झाली. म्हणजे एकुण 29 हजार 395 शिक्षक मतदार नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान करणार आहे.

परंतु यावेळी टी.डी.एफ. ने धुळ्यातील संदिप बेडसे यांना उमेदवारी बहाल केली आहे. श्री.बेडसे हे शिरपुरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

मात्र, त्यांचा पिंड मास्तरकीशी निगडीत नाही. ते मुळचे अभियंता क्षेत्रातील, मंत्रालयातही त्यांनी सेवा केली आहे. माजी मंत्री भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी शिंदखेडा मतदार संघातूनही निवडणूक लढविली व पराभूत झाले. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाने आमदाराकीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी टी.डी.एफ.च्या श्रेष्ठींनाच गळाला लावल्याची भावना शिक्षक उघडपणे बोलू लागले आहेत.

राज्य टी.डी.एफ.कडे इच्छूक उमेदवारांमध्ये जी मंडळी होती, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून एस.डी.भिरूड,
मनोज पाटील, धुळ्यातून संदिप बेडसे, निशांत रंधे, नाशिक मधून राजेंद्र लांडे, भाऊसाहेब कचरे-पाटील, अण्णासाहेब शिंदे, विठ्ठलराव पानसरे, एम.एम.लगड अशा एकूण 11 इच्छुकांचा समावेश होता.

लेखक – पुरुषोत्तम गड्डम भ्रमणध्वनी – 9545465455

यात उमेदवारीसाठी संदिप बेडसे यांच्या बाजूने 19 तर इतर इच्छुकांना 4-5 अशी मते पडली आणि श्री.बेडसेंची उमेदवारी निश्चित झाली. हाडाच्या शिक्षकांना मात्र, टी.डी.एफ.च्या काही मंडळीचे हे राजकारण पचले नाही.

श्री.बेडसेंच्या उमेदवारीवरून शिक्षकांमध्येही मोठी नाराजी व्यक्त झाली. मात्र, टी.डी.एफ.सारख्या वैचारीक अधिष्ठान असणार्‍या संघटनेला आपलेसे करून घेणार्‍या श्री.बेडसेंना शिक्षक मतदारांना आपलेसे करायला फारसा वेळ लागणार नाही. असेही बोलले जात आहे.

वरील इच्छुकांमध्ये जळगावचे एस.डी.भिरूड बर्‍यापैकी अभ्यासू आणि शिक्षक स्नेही मानले जातात. यावेळी जळगाव जिल्ह्याला संधी मिळावी अशीही खान्देशी बांधवांची भावना होती. मात्र, कुठे माशी शिंकली? हा प्रश्न साध्या भोळ्या शिक्षकांना भेडसावत आहे.

टी.डी.एफ.फार्मात का ?

टी.डी.एफ.ही शिक्षकांची संघटना पुरोगामी विचारांचे प्रतिनिधीत्व करणारी संघटना आहे. आजपर्यंत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची ओळख टी.डी.एफ.चा बालेकिल्ला अशीच आहे.

माजी शिक्षक आमदार एम.आर.चौधरी, टी.एफ.पवार, जे.यु.ठाकरे, नानासाहेब बोरस्ते, दिलीपराव पाटील हे टी.डी.एफ.चे उमेदवार होते.

विद्यमान आमदार डॉ.अपूर्व हिरे सुध्दा टी.डी.एफ.च्या एका गटाकडून लढलेले उमेदवार आहेत. याच संघटनेचा उमेदवार निवडून येत असल्याने टी.डी.एफ.ची उमेदवारी शिक्षक आमदारकीची गुरुकिल्ली मानली जाते. आणि संदिप बेडसेंनी हे अचूक हेरले.

मात्र, खान्देशातील शिक्षकांमध्ये सध्या तरी त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण दिसत नाही हे सत्य आहे.
जून, 2018 मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत टी.डी.एफ.उमेदवारांची वर्णी लागेल की नाही? हे संघटनेतील ऐक्यावर अवलंबून आहे. मात्र, श्री.बेडसेंच्या उमेदवारीने टी.डी.एफ.च्या भुमिकेवर ‘अर्थ’पुर्ण संशय निर्णायक ठरला तर हा बालेकिल्ला ढासाळणाला तर आश्चर्य वाटायला नको.

सामान्य शिक्षकांची अपेक्षा

टीडीएफने उमेदवार देतांना हा उमेदवार संघटनेशी कधीपासून जुळला आहे? संघटनेत योगदान काय? लोकशाही मूल्य जपणारा आहे का ? शिक्षक म्हणून किती काळापासून कार्यरत आहे ? शिक्षक समस्यांची जाण व उकल करण्याची क्षमता आहे का ?

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टी.डी.एफ. या पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या मुशीतून त्याचे व्यक्तीमत्त्व घडले आहे का? या अनुषंगाने संघटनेच्या श्रेष्ठींनी विचार करायला हवा होता मात्र तसे झाले नसल्याची भावना सोशल मिडीयावर शिक्षक बांधव उघडपणे व्यक्त करीत असल्याने शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक खरच मास्तरांची आहे का ? हा प्रश्न हाडाचे शिक्षक असलेल्या मतदारांमध्ये निर्माण होणे टि.डी.एफ. आणि संदिप बेडसे या दोघांसाठी डोकेदुखीच ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*