Blog : उत्तर कोरिया आत्मघाताकडे

0

उत्तर कोरियात अणुचाचणीच्या ठिकाणी बोगदा कोसळून झालेल्या अपघातात दोनशेहून अधिक लोक मरण पावले. रात्र आता संबंधित मॅनटॅप या पर्वतालाही मोठे खिंडार पडले असून परिसरात किरणोत्सर्गी द्रव्य पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

अमेरिका आणि रशिया यांनी आपली बॉम्बर विमाने उत्तर कोरियाकडे पाठवल्याचे वृत्तही आहे. ही तिसर्‍या महायुद्धाला कारणीभूत ठरणारी घडामोड असल्याचा अंदाज अनेक विश्लेषक व्यक्त करत आहेत.

अण्वस्रबंदीच्या करारावर भारतासह अमेरिका, रशिया आदी देशांनी स्वाक्षर्‍या केलेल्या नाहीत, हे सत्य आहे. शेजारी शत्रूराष्ट्रांकडे अण्वस्त्रे असताना आपण या संदर्भात अत्यंत मवाळ धोरण स्वीकारणे हा वेडेपणा ठरला असता हे त्यामागील तर्कशास्त्रच होते.

मात्र, अण्वस्त्र सज्जतेबरोबरच मोठी जबाबदारी येते याचे भान प्रत्येक देशाने ठेवण्याची गरज असते. काही देश असे भान बिलकूलच न ठेवता एकमेकांना अण्वस्त्रसज्जतेच्या नावाखाली धमकी देण्याचे सत्र आरंभतात.

भारताला पाकिस्तानने अशा धमक्या दिल्या आहेतच. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून उत्तर कोरियानेही कोणालाही न जुमानता आपण अतिशक्तिशाली अणुचाचण्या घेणारच असे बिनदिक्कत सांगितले होते.

जपानच्या हद्दीचे उल्लंघन करण्याच्या घटनाही त्यांनी दोन-तीनदा केल्या होत्या. मात्र सप्टेंबरमध्ये घेतलेल्या शक्तिशाली अणुचाचणीचे भयावह फळ त्यांना 10 ऑक्टोबरला चाखावे लागले.

अणुचाचण्यांसाठी दहा ऑक्टोबरला बांधण्यात आलेला बोगदा कोसळून उत्तर कोरियातील दोनशेहून अधिकजणांचा मृत्यू झाल्याचा दावा जपानच्या एका वृत्तवाहिनीने अलीकडेच केला.

उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला पुंगेयी-री या परिसरात घेतलेल्या अणुचाचणीनंतर जगभर मोठा कल्लोळ निर्माण झाला होता. त्यांनी घेतलेली ही सलग सहावी आणि सर्वात मोठी अणुचाचणी होती. मात्र बोगदा कोसळल्यामुळे 100 कामगारांचा मृत्यू झाला, अशी बातमी आता समोर आली आहे.

शिवाय या अपघातानंतर बचावकार्य सुरू असताना बोगद्याचा आणखी काही भाग कोसळून आणखी 100 जणांचा मृत्यू झाला. अणुचाचणीमुळे निर्माण झालेल्या कंपनांमुळेच हा बोगदा कोसळल्याचा दावा जपानच्या या वृत्तवाहिनीने केला आहे.

लेखक -अजय तिवारी

उत्तर कोरियाने घेतलेली चाचणी भूमिगत होती. त्यामुळे या चाचणीमुळे पर्वतांवरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन होण्याची किंवा जवळ असणार्‍या चीनच्या सीमेपर्यंत किरणोत्सर्ग पसरण्याची भीती तज्ज्ञांनी आधीच व्यक्त व्यक्त केली आहे.

परंतु उत्तर कोरियाने हे अंदाज वल्गना ठरवून आपण आपलं उद्दिष्ट साध्य करणारच, अशी अरेरावीची भाषा केली होती. या सहाव्या चाचणीच्या वेळी 120 किलोटन ऊर्जा उत्सर्जित झाली होती.

हे प्रमाण हिरोशिमा शहरावर 1945 मध्ये टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या आठपट अधिक असल्याकडे त्यावेळी जपानने लक्ष वेधले होते. परंतु त्यांच्या हद्दीचा दोनदा भंग करून उत्तर कोरियाने या भीतीला प्रतिसाद दिला होता. याखेरीज आणखीही भयानक सत्य समोर आले आहे.

उत्तर कोरियातील ज्या डोंगरावरून या चाचण्या घेण्यात आल्या, त्याला भले मोठे खिंडार पडले. ते अवकाशातून स्पष्ट दिसत असल्याचे अनेक उपग्रहांनी पाठवलेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे.

या अणुचाचण्यांसाठी वापरण्यात आलेल्या पर्वताचे नाव ‘माऊंट मॅनटॅप’ असे असून त्यावरून पुन्हा पुन्हा करण्यात आलेल्या अणुचाचण्यांमुळे आता या चाचण्या झेलण्याची या पर्वताची क्षमता नष्ट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे त्याची भौगोलिक स्थिती सुस्थित राखण्यासाठी या पर्वतावरून यापुढे कोणतीही अणुचाचणी न घेणे शहाणपणाचे ठरणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

बोगदा कोसळण्याच्या थोडेच दिवस आधी उत्तर कोरियाच्या सिस्मॉलॉजिकल इन्स्टिट्युटचे प्रमुख संशोधक किम सो-गु यांनी चीनच्या सीमेजवळ असलेला 2200 मीटरचा पर्वतीय प्रदेश चांगलाच विदीर्ण झाल्याचे जाहीर केले होते.

आणखी चाचणी घेतली गेली तर या परिसरात किरणोत्सर्गाच्या प्रदूषणाचा मोठा धोका उद्भवण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.

ही अणुचाचणी घेण्यात आलेल्या बोगद्यावर असलेल्या या पर्वताचा 85 एकराचा भाग त्यामुळे नष्ट झाल्याचेही दिसून आले होते.

याविषयी जाहीर वक्तव्य केले नसले तरी उत्तर कोरियाने दहा ऑक्टोबरला झालेला हा अपघात भूमिगत बोगद्याच्या बांधकामाच्या वेळी घडल्याची चर्चा त्यांच्या संसदेत झाली आहे.

उत्तर कोरियाने ही बातमी दडपून ठेवली असली तरी उत्तर कोरियाच्या संसदेसमोर 30 ऑक्टोबरला कोरिया मेटेरॉलॉजिकल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने ठेवलेल्या अहवालानुसार, अणुचाचणी घेतल्या गेलेल्या ठिकाणी या पर्वताखाली 60 ते 100 मीटर लांबीची पोकळी तयार झाली आहे.

शिवाय आणखी एखादी अणुचाचणी घेतली गेली तरी या पोकळीतून किरणोत्सर्ग वातावरणात पसरण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जवळपासच्या परिसरात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. भूमिगत स्फोटांमुळे पर्वत कोसळू शकतात. शिवाय चीनच्या सीमेवरील भागात किरणोत्सर्गही पसरू शकतो ही बाब खरे तर नवीन नाही.

जपानचे उदाहरण जगासमोर आहेच, मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून 2006 पासून उत्तर कोरियाने अणुचाचण्या घेण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 2017 च्या चाचणीनंतर काही मिनिटांनीच तिथे 6.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.

त्यानंतर काही क्षणांमध्येच 4.1 रिश्टर स्केलचा दुसरा धक्काही तिथे बसल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली आहे. या संदर्भात चीनने 20 सप्टेंबरला उत्तर कोरियाल पर्वत कोसळण्याचा आणि भूस्खलनाचा इशारा दिला होता.

या स्फोटामुळे निर्माण झालेला किरणोत्सर्गी कचरा संबंधित बोगद्याला आणि पर्वताला पडणार्‍या तड्यांमधून बाहेर पडून वार्‍याबरोबर चीनच्या परिसरात शिरण्याचा धोकाही आपण व्यक्त केला होता, असे चीननेही आता जाहीर केले आहे.

अमेरिका, रशिया, जपान यांच्यासह भारतानेही या अणुस्फोटांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र उत्तर कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत उद्दाम भूमिका घेतली होती आणि प्रशांत महासागरात याहूनही अधिक शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याचा मनोदय जाहीर केला होता.

या संदर्भात त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची संभावना ‘भुंकणारं कुत्रं’ अशी केली होती आणि आपण त्यांना किमत देत नसल्याची दर्पोक्तीही केली होती, परंतु आता या अपघाताने उत्तर कोरियाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण आता खरोखरच पर्वताला खिंडार पडले असून बोगदा कोसळला आहे.

त्यामुळे आणखी स्फोट केल्यावर किरणोत्सर्ग वातावरणात पसरून इतरांना बेचिराख करण्याची स्वप्ने बघणार्‍या उत्तर कोरियाला आधी आपल्याच जनतेला या स्फोटाच्या तोंडी दिल्याचे दारूण वास्तव पहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशांत महासागरात अणुस्फोट घडवून आणण्याची धमकी उत्तर कोरिया प्रत्यक्षात उतरवू शकेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

अमेरिका आणि रशियाने ही धमकी गांभीर्याने घेतली असून अमेरिकेने बी-2 स्टेल्थ बाँबर मिसोरीहून पाठवले आहे. त्यानंतर रशियानेही आपली उच्च तंत्रज्ञानाने युक्त असलेली जेट्स या भागात पाठवली आहेत.

उत्तर कोरियामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता सध्या व्यक्त होत असताना सध्याच मॅनटॅप पर्वतावर किरणोत्सर्गी द्रव्यांचा ढग निर्माण झाल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत.

त्यामुळेच जगाला विनाशाच्या खाईत लोटण्यास उत्तर कोरिया सज्ज झाला असून त्यांना धडा शिकवल्याखेरीज जगाला शांततेने जगणे शक्य होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आपली क्षेपणास्त्रे घेऊन गेेलेल्या ट्युपोलेव-95 एमएस या बॉम्बर्सना जपानी समुद्रावरून आणि प्रशांत महासागरावरून जात असताना अमेरिकन आणि जपानी जेट्सनी आपल्याबरोबर घेतल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयानंही जाहीर केले.

या सर्व घडामोडींमुळे उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नेमका किती किरणोत्सर्ग वातावरणात पसरू शकतो आणि त्याचे चीनसह इतर देशांना किती प्रमाणात धोके सहन करावे लागू शकतात हे अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही.

परंतु चीनच नव्हे; तर शेजारच्या अनेक देशांना याचा धोका सहन करावा लागेल, असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील अपघात ही जगातील आत्यंतिक महत्त्वाची घडामोड ठरली आहे.

 

LEAVE A REPLY

*