इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा सामना करण्यास नवे बळ मिळावे या हेतूने जनशक्ती संघटित करण्यासाठी लोकमान्यांनी घराघरांत विराजमान होणार्‍या गणपतीला सामाजिक व्यासपीठ दिले आणि प्रबोधनासाठी या व्यासपीठाचा यथोचित वापर करून घेतला.
आमच्या काळापर्यंत प्रबोधनाचे हे पर्व टिकले होते. पण आता वाढत्या गोंगाटात प्रबोधनाचा मूळ हेतू बाजूला पडला आहे, हे मान्य करायलाच हवे.
उत्सव हा मानसशास्त्राशी जोडलेला विषय आहे. मनुष्य उत्सवप्रिय आहे. घरात मुलाचा जन्म झाला की उत्सव साजरा होतो. त्याने पहिले पाऊल टाकले की उत्सव साजरा होतो.

त्याने सर्वप्रथम शाळेत जाणे, प्रत्येक इयत्तेत उत्तीर्ण होणे, कारकीर्दीची सुरुवात, चतुर्भूज होणे अशा प्रत्येक शुभघटनेचा उत्सव साजरा करणे ही मानसिकता जगभर आढळते.

किंबहुना आपले आयुष्य हेच उत्सवासमान असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात उत्सवाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

याच धर्तीवर दरवर्षी धूमधडाक्यात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाची वेगळी महती सांगायला नको. आधी घराघरांमध्ये गणेशपूजन होत होते.

पण लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा पाडला तो समाज जागृतीसाठी उपकारक ठरला. लोकांना एकत्र आणण्यासाठी या उत्सवाचा महत्त्वाचा हातभार लागला आहे.

सगळी माणसे आपली असली तरी आपली माणसे एकत्र आणणे, एकत्र पाहणे आणि एकत्र असल्याचा अनुभव घेणे हे सगळे उत्सवाच्या निमित्ताने साधते.

आपली माणसे एका मताने, एका विचाराने, एका श्रद्धेने एकत्र येतात तेव्हा सगळे संस्कार उजळून निघतात. संस्कारांचा पुनरुच्चार होतो.

श्रद्धा, संस्कृती यांचादेखील पुनरुच्चार होतो. म्हणूनच संस्कार, श्रद्धा, संस्कृती यांना नवा उजाळा देण्याचा सुमुहूर्त म्हणूनही सणांकडे पाहता येते. सणांमुळेच आपण कोण आणि काय आहोत याची उत्तरे मिळतात.

आपण असे का, आपली मुळे कोणती हे जाणून घेण्यासाठीदेखील सणवारांचे सहाय्य मिळते. म्हणूनच सणवार, उत्सव यांना माणूसपणाच्या खुणा म्हणता येईल.

 

लेखिका -श्रुती सडोलीकर, प्रसिद्ध गायिका

या समाजाच्या अस्तित्वाच्या खुणा असतात. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे उत्सवी साजरीकरण औचित्यपूर्णच म्हणायला हवे.

गणेशोत्सवाची सुरुवात ही पारतंत्र्यातून मुक्तीच्या दिशेने होणार्‍या प्रवासात टाकलेले एक पुढचे पाऊल होते. म्हणूनच त्याकाळी गणेशोत्सवाचे धार्मिक प्रयोजन असले तरी प्रबोधनाचा सामाजिक पैलू जोडलेला होता.

आमच्या लहानपणीसुद्धा गणेशोत्सवाचे वेगळे रूप अनुभवायला मिळाले. गणेशोत्सवामध्ये नाटके, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम व्हायचे. एका अर्थी कानसेन घडवण्याचे काम या उत्सवाने इमानेइतबारे पार पाडले आहे.

मला आठवतेय, त्याकाळी प्रत्येक वाडीमध्ये शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित होत असत. विविध विषयांवर परिसंवाद व्हायचे.

सामाजिक प्रश्नांचा उहापोह व्हायचा. तज्ज्ञ वक्त्याचे ओघवी वक्तृत्व बुद्धीची मशागत करायचे. या उत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे मुलांमधील कलागुणांना उत्थापन देणे.

मीदेखील गणेशोत्सवाच्या काळात कामे करतच पुढे आले आहे. ‘संगीत शारदा’सारखी नाटके आम्ही करायचो. यानिमित्ताने घडणार्‍या सांस्कृतिक घडामोडींमधून त्या-त्या परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळायचा.

आता आपण रिअ‍ॅलिटी शो बघतो. आमच्या वेळी गणपती उत्सव हाच एक रिअ‍ॅलिटी शो होता. प्रौढांना परिचित मुलांमधील सुप्त गुण यानिमित्तानेच समजायचे.

‘तुमची श्रुती चांगली गाते हो, वामनराव’ असे बोल कानावर पडले की वडिलांची छाती फुगायची. माझ्यासारखेच अनेकांना या गणेशोत्सवाने घडवले आहे. एकमेकांची अशी ओळख अशा उत्सवांमधूनच घडते. उत्सवांमध्ये मने जुळतात. ॠणानुबंध जुळतात.

म्हणूनच सण, उत्सव मनाच्या गाभार्‍यात झगमगत राहतो.अशा सणांमुळे माणसाचे अस्तित्व ठाशीव होते. जडणघडण होते. या धर्तीवर बघायचे झाल्यास गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप थोडे बदललेय.

सध्याच्या उत्सवामध्ये शास्त्रीय संगीत, संगीत नाटके, चर्चा-परिसंवाद मागे पडलेत. एका अर्थी यानिमित्ताने होणारी वैचारिक घुसळण थांबली. आता चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसारखे कार्यक्रम आयोजित होतात.

जवळपास प्रत्येक मुलाला बक्षीस देऊन उत्सव पार पडतो. काही मोठ्या गणेश मंडळांचा अपवाद वगळता दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन अभावानेच पाहायला मिळते.

सध्या सगळीकडेच गोंगाट पसरला आहे. या गोंगाटाचे प्रतिबिंब गणेशोत्सवामध्ये अधिक ठळकपणे दिसून येते. स्पीकरच्या भिंती उभ्या करून, अचकट विचकट चेहरे करून नाचणे ही उत्सवाच्या साजरीकरणाची, आनंद व्यक्त करण्याची लोकप्रिय परिभाषा ठरते आहे. पण या सगळ्यात संस्कृतीचा स्वर हरवतोय हे कोणीही लक्षात घेत नाही.

कदाचित यामुळेच असेल, समाजातील ठराविक वर्ग या उत्सवापासून दूर जात आहे. गणपतीला काय ऐकवायचे याचे भान हरवले तर उपयोग काय? शेवटी ही एक आराधना, साधना आहे.

हे एक व्रत आहे. संपूर्ण समाजाने याचा पुनर्विचार करायलाच हवा. शेवटी या उत्सवामधून समाजाला, मुलांना काय मिळणार याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे.

मुलांना कोणाची कॉपी करतो म्हणून कौतुक मिळू नये तर त्यांच्यातील कल्पनाविश्वाला या उत्सवाच्या निमित्ताने नवे अवकाश मिळावे.

मुलांना गणपतीच्या प्रतिमेत लपलेली प्रतीके समजावीत. हत्ती बलशाली आहे पण तरीही तो शांत आहे. वाघ, सिंहादी हिंस्त्र प्राण्यांच्या डोळ्यात दिसणारी हिंसकता त्याच्या डोळ्यात नाही. त्याच्या रूपात उग्रता नाही.

गणपतीच्या प्रतिमेतही हत्तीच्या डोळ्यात दिसणारी मृदुता जाणवते. ही देवता प्रगाढ बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे, हे मुलांना समजवायला हवे. विद्येच्या बळावर शक्तीलाही जग पादाक्रांत करता येते हे समजायला हवे.

कारण विद्या कालजयी आहे. काळावर विजय मिळवणारी आहे. विद्यावान असाल तर त्रिखंडात तुमची कीर्ती दुदुंभत राहते. म्हणूनच विद्येच्या या देवतेचे स्मरण करताना, तिची प्रतिष्ठापना करताना हा विचार मनात असावा.

शेवटी तो विघ्नहर्ता आहे, बुद्धीचा दाता आहे, त्याच्याकडून काय घ्यायचे हे आपणच ठरवायला हवे.

 

LEAVE A REPLY

*