बाप शेतशिवारात घाम गाळण्यात दंग…अन् पोरगं मोबाईलच्या पंचरंगीत गुंग…!

0
व्हाटस अप, फेसबूक, यु-ट्यूब, ब्लॉग आणि ट्विटर… या सोशल मिडियावरील पंचरंगीमुळे आमच्या गावकुसातील तरुणाचं जीवन बेरंग झालयं. रोज दीड जी.बी. डेटाच्या भंडार्‍यात मेंदू गहाण ठेवून आत्मभान हरवलेली आजची पिढी शेतकरी बापाच्या कष्टाला विसरत चालली आहे. पहाट होताच औत घेवून शेतशिवाराकडं बाप निघाला की, पोरंग इकडे गुडमॉर्निंगचा मेसेजसवर स्वार होतात. देश-विदेशासह परिसरातील ज्वलंत प्रश्नावर टिका-टिप्पणी आणि पोस्ट टाकून मोबाईल स्क्रिनवरचा हा विद्वान खाली घातलेली मान वर करायचे कष्ट घेत नाही.

सुशिक्षित बेरोजगार बनलेला आमचा हा तरुण इतका कसा बेफिकीर झाला तेच कळायला मार्ग नाही. आज गावागावात हीच कथा अन व्यथा आहे. आमचे एक ज्येष्ठ मित्र आहेत. वय वर्षे 60. यांच्याकडे साडेचार एकर जमिन, पूर्वी बागायती होती. अलिकडे सततच्या दुष्काळाने आणि जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने कोरडवाहू झालेली. त्यांना तिन मुले… मुलीचं बारावी पास झाल्यानंतर शुभमंगल लावून दिले. पाठची दोन्ही मुले चांगली शिकावी म्हणून गड्यानं जीवाचं रान केलं. पहिला एम.बी.ए. झाला. तर दुसरा बी.कॉम होवून पारावरच्या गर्दीत सामावला. दोन्ही मुलं शिकली.

पण नोकरी मिळाली नाही. काही उद्योग करा म्हटलं तर, भांडवल नाही, पैसा नाही, म्हणून कारणं दाखवितात. घरच्या शेतावर राबायला त्यांना आता लाज वाटू लागली. बाप आता थकत चालला. शेतशिवारातील पेरणीपूर्व कामांनी वेग घेतला. पण साडेचार एकरी शेती करायलाही त्याला आता दमून येत. पोरांना म्हटलं तर ऐकून न ऐकल्यासारखी करतात. हा सारा दुखडा सांगत असताना ज्येष्ठ मित्राला गहिवरुन येत होतं. त्याचं नेमकं सांत्वन करावं तरी कसं? या प्रश्नाने मी पण निरुत्तर होतो.

मग मुलं करतात तरी काय…? मी सहज काहीतरी बोलायचे म्हणून प्रश्न केला. तेव्हा दोस्त म्हणाला, करतात म्हणजे काय?… त्या भूतासमोर मान खाली घालून तासंतास बसतात, दुसरं करणार तरी काय? भूतासमोर…? माझ्या प्रश्नार्थक चेहर्‍याकडे बघितल्यानंतर बापानं मोबाईल नावाचं भुताचं बखान माझ्यासमोर केलं!

मित्राची ही शिकली – सवरली पोरं माझ्याही संपर्कातील, माझ्या व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुकवरील मित्र… फादर्स डे रोजी त्यांनी बापाच सोशल मिडीयावर केलेलं कौतुक मला आठवलं, त्यावेळी मला गलबलून आलेलं, पण आता मात्र या त्यांच्या बेेगळीपणाची किळस वाटायला लागली. दोन-चार डिग्री घेऊन भलेही तुम्ही शिक्षित झाला असाल, नोकरी मिळत नसेल, उद्योग जमत नसेल… पण मोकळे आहात तोवर बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबायला हरकत काय? सकाळी मोबाईलमधील व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, यु ट्यूब, ब्लॉग आणि ट्विटर या पंच महाभूतांसमोर नतमस्तक होण्यापेक्षा बापाच्या सोबत काळ्यामातीशी एकरूप होत, घाम गाळायला लाज कसली बाळगताय? हे तर केवळ एक प्रातिनिधीक सत्य उदाहरण आहेे. पण आजही खेडोपाडी – गावोगावी जाऊन बघीतलं, तर गावाबाहेरील कट्टे, आणि पारावरच्या ओट्यांवर म्हातार्‍यांपेक्षा तरूण मंडळीची भरती अधिक दिसून येत आहे. आणि सगळ्यांच्याच हातात दिड जीबीची खैरात असलेला स्मार्ट फोन दिसून येत आहे.

फ्री डेटा अन् फ्री तरूणाई सध्या मोबाईल क्षेत्रातील सार्‍याच कंपन्यांनी अगदी स्वस्तामध्ये रोज दिड जीबी डेटा देऊन बेरोजगार तरूणाईला आपल्या दिमतीला बांधून ठेवले आहे. सोशल नेटवर्किंगच्या आहारी गेलेला आजचा तरूण अनेक संकटांच्या खाईत न कळतपणे ओढला जात आहे. युरोपमधील काही देशांमध्ये अठरा वर्षाखालील तरूणाईला सोशल नेटवर्किंगमध्ये बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. युरोपासारख्या मुक्त विचारांच्या व व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिपुरस्कार करणार्‍या देशात सोशल मिडीया 18 वर्षाखालील मुलांना नको असे वाटत असेल तर त्याचा विचार जगाने करणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या मायाजालाचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुध्दा आहेत. परंतु आपली वापर करण्याची पध्दतच अघोरी असल्याने या सोशल मिडीयाच्या तोट्यांनाच आपण बळी पडत चाललो आहोत. सोशल मिडीयातील आजच्या तरूणांचे दृष्य असे आहे. स्वत:ला हाय प्रोफाईल दाखविण्यासाठी तरूणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. आणि स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी ओढ लागलेली आहे. व्हॉटस् अ‍ॅप आणि फेसबुकसारख्या सोशल साईटवर असंख्य मित्रांची यादी असली तरी खर्‍या जीवनात तरूण एकाकी पडत चालला आहे.

फेसबुकवर हजार मित्र संकटकाळी विचारेना कुत्र स्मार्ट फोन, अ‍ॅन्ड्राईड फोन आल्यापासून सोशल मिडीयाचा अतिरेकी वापर सुरू झाला आहे. अलीकडे सायन्टीफीक वर्ल्ड नावाच्या सोशल नेटवर्कींग अभ्यासकांनी केलेल्या अध्ययनात आढळून आले आहे की, सोशल मिडीयामुळे सर्वात जास्त लोक नैराश्याच्या गर्तेत लोटले जात आहेत. धोक्याची बाब म्हणजे तरूणांपेक्षा ही संख्या तरूणींमध्ये अधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे. ऑनलाईन भेटलेल्या अनोळखी व्यक्तीला भेटणे, त्यांच्याशी ओळख करून घेण्याची वृत्ती कुमारवयीन मुला-मुलींमध्ये वाढत आहे. नवथर वय असल्याने नवनवीन लोकांना भेटण्याची उत्सुकता मनात असते. ताज्या सर्व्हेक्षणानुसार 8 ते 16 वर्षे वयोगटातील 81 टक्के मुले सोशल मिडीया नेटवर्कवर अ‍ॅक्टीव्ह आहेत. 77 टक्के मुलांनी वयाची 13 वर्षे पूर्ण होण्याआधीच आपले फेसबुक अकाऊंट तयार करून घेतले आहेत. सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍या मुलांपैकी 69 टक्के मुलांनी आपआपले आकर्षक फोटो लावले आहेत. काहींनी आपले फेक अकाऊंट तयार केले आहेत. नव्या युगामध्ये या गोष्टी काही प्रमाणामध्ये आवश्यक वाटत असल्या, प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी नवतंत्रज्ञान अत्यावश्यक असले, तरी त्याचा विनीयोग विधायक नव्हे तर विघातक कामासाठी सुरू असल्याने ही धोक्याची घंटा भयावह आहे. फेसबुकवर चार ते पाच हजार मित्र असणार्‍यांना संकटसमयी दोन-चार मित्रही उपयोगी पडतील की नाही? या प्रश्नाचे उत्तरही बर्‍याचअंशी नकारार्थी आहे.

… तरूणांनो, ध्यानात घ्या!
तरूणांनो, आता पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी शेतमजूरांची कमतरता भासत आहे. मात्र अश्या स्थितीत माय-बापाला शेतात मदत करण्याऐवजी तरणीबांड पोरं एकतर गावभर हुंदळत फिरत आहेत, कुण्यातरी राजकीय किंवा बड्या आसामीसमोर हुजरेगिरी करीत आहे. नाही तर स्मार्टफोनवर ऑनलाईन राहून ब्रह्मज्ञान सांगण्यात धन्यता मानत आहेत. काही अपवादात्मक तरूण मित्र बापाला शेतात मदत करीत असतील, त्यांचे कौतुकच आहे. पण अशा सरळमार्गी तरूणांची संख्या रोडावल्यामुळे हा लेखन प्रपंच करण्याचा उठाठेव करावा लागत आहे. आपल्या मुलाने वेळ असतांना आपल्या शेतीचा सांभाळ करावा, अशी माफक भावना आई-वडीलांची आहे, किमान त्यांच्या या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तरूणांनी शेतात राबले पाहिजे. उन्हात राबणार्‍या आई-बापाला विश्रांती देण्यासाठी तरूणांनी पुढे आले पाहिजे. सोशल मिडीयावर सोशल होण्यापेक्षा आपल्या काळ्या मातीशी एकरूप होऊन माय-बापाला आधार द्यायला शिकलं पाहिजे. गावकुसातील तरूणांनो, हे कुठंतरी पटत असेल तर बघा… नाही तरी आज या सोशल मिडीयामुळे माणसाची अवस्था काहीशी अशीच झाली आहे….!
चेहरे पर फेसबुक सी रौनक है,
दिल व्हॉटसप्प हुआ जा रहा है ।
समाज से कटकर भी,
इन्सान सोशल हुआ जा रहा है ।
पुरुषोत्तम गड्डम – भ्रमणध्वनी – 9545465455

LEAVE A REPLY

*