एक व्हावेत सकल जन

0

गणेशोत्सव हा संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा सोहळा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याजोगा हा आनंद मेळावा आहे. म्हणूनच मधल्या काळात आलेले नकारात्मक रूप बदलून आता तरी त्याचे साजिरे रूप समोर यायला हवे. जातीयवाद, धर्मवाद, आरक्षण आदी मुद्यांवरून विभाजित झालेला समाज यानिमित्ताने एकत्र यायला हवा. तरच उत्सवाचे प्रयोजन सार्थ होईल.

आनंदी राहणे ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. आपल्याला आनंदी राहायला आवडते. आनंद निर्माण करण्याची, उपभोगण्याची कारणे आपण शोधत असतो. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणार्‍या, मनातला संतोष वाढवणार्‍या, स्नेह आणि बंधुभाव जागृत करणार्‍या बाबींकडे आपण आकर्षिले जातो. याच धर्तीवर अनेकांना सहभागी करून घेणारा, चैतन्याचे मळे फुलवणारा सण म्हणजे गणेशोत्सव! यंदाही या सणानिमित्त आपण उत्साही आणि आनंदी वातावरण अनुभवत आहोत. देशातल्या लोकांनी एकत्र यावे हाच सणांच्या साजरीकरणामागील मुख्य हेतू असतो. गणेशोत्सवही याला अपवाद नाही. पण यंदाच्या उत्सवाला समाजातल्या वाढत्या दरीची पार्श्वभूमी आहे, जी दूर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. मधल्या काळात जाती-धर्मांमध्ये वाढलेला अथवा जाणीवपूर्वक वाढलेला विद्वेष आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. दिवसेंदिवस जातीयवाद, प्रांतवाद, धर्मवाद वाढत आहे. कुठल्याही सजग नागरिकाला त्रास देणार्‍याच या बाबी आहेत. अगदी अलीकडच्या काळात वेगाने पसरलेला हा विकार आहे. 15-20 वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. पण गेल्या दहा वर्षांमध्ये दरी कमी होण्याऐवजी वाढताना दिसणे ही चिंतेची बाब आहे, असे मला वाटते. म्हणूनच या उत्सवाच्या निमित्ताने समाजातील वाढती तेढ कमी व्हावी आणि गणेशाने सर्वांना गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याची सद्बुद्धी द्यावी हीच प्रार्थना.

दोन समाजांमधील, गटांमधील तेढ वाढते तेव्हा परस्परांमधील सख्य हरपते, साहजिकच सौहार्द आणि शांतताही हरपते. राजकीय स्वार्थ्यासाठी ही तेढ वाढती राहील, असा प्रयत्न होताना दिसतो. त्याचे लाभ उठवणारी मंडळी संख्येने प्रचंड आहेत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक भाबड्या वृत्तीनेच आजूबाजूला बघतात. ही स्वार्थी, आगलावी प्रवृत्ती सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. ते अगदी सहजतेने या दुष्ट प्रवृत्तींच्या भक्ष्यस्थानी पडतात. वाढती असमानता ही बाबही समाजातली तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. एकीकडे आपण सर्वांना शिक्षणाचा अधिकार मान्य करतो. सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळावे असा आपला आग्रह असतो. पण स्थिती अगदी याविरुद्ध दिसते. आजही देशातल्या अनेक दुर्गम भागांमध्ये शिक्षणगंगा पोहोचलेली नाही.

अजूनही अनेक भागांमध्ये शाळा नाही. शाळा असली तरी तिथपर्यंत शिक्षक पोहोचतातच असे नाही. शिक्षक नीट शिकवत असतील याचीही खात्री नाही. ‘सर्वशिक्षा अभियानां’तर्गत संपूर्ण भारत शिक्षित व्हावा, हे आपले स्वप्नच नव्हे तर उद्दिष्ट आहे. पण त्याला प्रयत्नांची साथ मिळताना दिसत नाही. आदर्श परिस्थितीनुसार मुंबईतल्या एखाद्या इंटरनॅशनल, कॉन्व्हेंटमध्ये शिकणार्‍या मुलाला मिळते तसेच शिक्षण भामरागडमधल्या मुलाला मिळायला हवे. पण तशी स्थिती बघायला मिळत नाही. शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत अनेक भागांमधल्या मुलांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचत नाही. त्यांना मिळणारे शिक्षणही निकृष्ट दर्जाचे असते. हा विरोधाभास, गलथानपणा आणि अनास्थादेखील सामाजिक विषमता, समाजातली दरी वाढवण्याचे काम करते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाज एकसंध बनवायचा तर या बाबींचा परामर्शही घ्यायलाच हवा. ही असामनता दूर करायला हवी.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे उलटली तरी वेगवेगळ्या समाजांच्या वेगवेगळ्या अभ्यास शाळा पाहायला मिळतात. आदिवासींसाठी, दलितांसाठी वेगळी आश्रमशाळा, मुस्लिम मुलांसाठी मदरसे, चर्चतर्फे चालवली जाणारी शाळा असे चित्र आजही पाहायला मिळते. स्पष्टपणे वर्गीकरण होत नसले तरी आर्थिक निकषांनुसार होणारे उच्चभ्रूंसाठी, मध्यमवर्गीयांसाठी, निम्नस्तरीयांसाठी वेगवेगळ्या शाळांची व्यवस्थाही स्पष्ट दिसून येते. धर्म शिक्षण देणार्‍या शाळांची वाढती संख्याही काळजी वाढवणारी बाब आहे. या सर्व संस्थांमध्ये लहानगे शिक्षण घेत असतात. साहजिकच या संस्कारक्षम वयापासूनच त्यांच्यावर असमानता लादली जात असेल, विभिन्न पातळ्यांची ओळख होत असेल, विषमतेची विषवल्ली इतक्या लहानपणीच त्यांच्या मनात रुजत असेल तर पुढे जाऊन त्या वृक्षाला रसदार आणि मधूर चवीची फळे लगडतील अशी अपेक्षा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. धैर्यवान, राष्ट्रनिष्ठ, राष्ट्रवादी, पराक्रमी आणि नैतिकवादावर श्रद्धा असणारी पिढी घडवायची तर प्राथमिक शिक्षण या समाजरचनेतील प्रथम पातळीपासून सुरुवात व्हायला हवी.

सर्वधर्मियांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळायला हवे. पण आज निम्नस्तरातील विद्यार्थ्यांना असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेश देतानाही व्यवस्थापन मंडळाकडून चालढकल होताना दिसते तेव्हा त्यांना खरोखरच विद्येचा अधिपती असणार्‍या गणपतीची आराधना करण्याचा, आपल्या शिक्षण संस्थेत गणेशोत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न पडतो. गणेशोत्सव हा सर्व जाती-धर्मांना एकत्र आणणारा उत्सव आहे. म्हणूनच यानिमित्ताने तरी समाजातील अस्थिरता दूर व्हायला हवी. आश्वासकता वाढायला हवी. मात्र सध्या या प्राथमिक संकल्पनेला गालबोट लागलेले बघायला मिळते. अगदी वर्गणी गोळा करण्यापासून मांडव घालण्यापर्यंत आणि रोजच्या आरतीपासून विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत जनतेला वेठीस धरले जाते. पैसे देण्याची इच्छा नसणार्‍यांकडूनही बळजबरीने वर्गणी गोळा करणारे महाभाग संख्येने बरेच जास्त आहेत. गुंडगिरी हाच त्यांच्या या ‘धार्मिक कार्या’चा आधार असतो. अनेक ठिकाणी लोकांकडून गोळा केलेल्या वर्गणीचा गैरवापर होत असल्याची, त्याच पैशातून व्यसने केली जात असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. गणेशोत्सवाच्या नावाखाली मोठ्या रकमेची अफरातफर होताना दिसते.

उत्सवाला गालबोट लावणारे हे सगळे मुद्दे आता तरी दूर व्हायला हवेत. अशा प्रवृत्तींवर कायद्याचा अंकुश असायला हवा. मंडळांनी वर्गणीरूपाने किती रक्कम जमा करावी यावर कायद्याने बंधन आणायला हवे. एकदा असे निर्बंध घातले गेले तर या समस्येवर प्रभावी तोडगा निघू शकेल, अशी आशा आपण व्यक्त करू शकतो. पूर्वी उत्सवाने एकत्रिकरणाचे ध्येय साध्य होत असे. लहानपणी अनुभवलेल्या उत्सवांमध्ये ही बाब स्पष्टपणे समोर यायची. त्याकाळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. माध्यमांचा प्रभावही बराच कमी होता. त्यामुळे सध्याचा या माध्यमांद्वारे पसरवला जाणारा विखार तेव्हा नव्हता. आता मात्र मीडियामार्फत जातीयवादाचे विष पसरवले जात आहे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या माध्यमांमधून लोक एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. ही चिखलफेक अत्यंत खालच्या पातळीवरून होताना दिसत आहे. सोशल मीडियावरून पसरणार्‍या अफवांमुळे दंगली उद्भवल्याचे प्रकारही अलीकडेच आपण अनुभवले आहेत. एखाद्या समाजाने ‘अरे’ म्हटले की दुसर्‍याने ‘कारे’ करायचे ही सध्याची परिस्थिती आहे. एवढ्या-तेवढ्या मुद्यावरून लोक गुद्यांची भाषा बोलतात.

मारामार्‍या होतात. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली ही विदारक परिस्थिती आता तरी बदलायला हवी. या उत्सवामुळे समाजभान नव्याने जागृत व्हायला हवे. तरच तो सत्कारणी लागण्याची आशा आपण बाळगू शकतो. आम्ही लहानपणी गणेशोत्सवाचे सकारात्मक, आनंदमयी रूप अनुभवले आहे. त्याकाळच्या देखाव्यांमधून सर्वधर्मसमभाव पसरवण्याचा विचार योग्य पद्धतीने पुढे यायचा. आता हा विचार नव्याने अंगिकारण्याची गरज आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही वृत्तपत्रे, संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवतात. त्यांचे अनुकरण करणार्‍यांची संख्याही वाढायला हवी. अशा उपक्रमांमुळे अनेक संस्थांना, गरजूंना फायदा होतो. अनेकांना मदत मिळते. त्यामुळेच हा विचारप्रवाह सर्वदूर पसरायला हवा. आमच्या घरी गणेशोत्सव साजरा होत नाही. पण आमच्या संस्थेमध्ये सर्वधर्मसमभावाचे ब्रीद पाळले जात असल्यामुळे गणेशपूजा होते. हेमलकसामध्ये सर्व जातीधर्माचे लोक उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. आनंदनिर्मिती हेच उत्सव साजरा करण्याचे प्रयोजन असते. सगळेच त्याचा आनंद लुटतात. यानिमित्ताने मुलांचे खेळ, स्पर्धा, विविध कलागुणांचे दर्शन आदी कार्यक्रम रंगतात. यानिमित्ताने सगळे कार्यकर्ते एकत्र येतात. माझा देवावर विश्वास नाही; पण यानिमित्त सगळे एकत्र येऊन काही चांगले घडत असेल तर त्याला आक्षेप घेण्याचेही काही कारण नाही.

आमच्याकडच्या आदिवासी संस्कृतीमध्ये गणपतीचे अस्तित्व आढळत नाही. त्यामुळे आजूबाजूला कुठेही गणेशोत्सवाचे फारसे प्रस्थ नसते. पण प्रकल्पात साजरा होणारा उत्सव वातावरण भारून टाकतो, हे मान्य करायलाच हवे.
– अनिकेत आमटे, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

*