भाव-भावनांचा खजिना

0

मन अस्थिर, दु:खी, निराश वा हताश करणारी कारणे ज्याची त्यानेच शोधावीत. ती नष्ट करण्याचा प्रयत्न ज्या-त्या व्यक्तीनेच करावयास हवा. आपलेच मन स्वप्रयत्नाने आपले मित्र बनवावे. त्यासाठी स्वत:च स्वत:चे अवलोकन, मनन, चिंतन याचा ध्यास घ्यावा. ‘मला सुखा-समाधानाने जगायचे आहे. त्यासाठी सारे काही उपलब्ध आहे. मी आता फक्त त्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे मनोमन मानावे. ‘मन ही एक सुपीक जमीन आहे. त्यात तुम्ही जे बी पेराल तेच उगवेल’ हे मानसशास्त्रीय सूत्र लक्षात असू द्या. इतरांना दोष देण्यापेक्षा, कोणी येऊन आपल्याला मनःशांती बहाल करील, ही अपेक्षा बाळगण्यापेक्षा स्वत:च आता या क्षणापासून मन:शांतीच्या प्राप्तीसाठी तयार व्हा. सकारात्मक बी स्वत:च्या मनोभूमीत पेरा. खोलवर रुजवा, वाढवा. हाच मनोरुग्णतेवरचा चांगला उपाय आहे.

मन आणि क्रोधाचे आकलन : क्रोध व क्रोधाचे स्वरूप हे मनाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप आहे. त्याचा मनाच्या आकलनाशीही संबंध आहे. कुणाचे मन एखादी घटना, प्रसंग, व्यक्ती आदीबाबत कसे आकलन करेल यावर सारे अवलंबून असते. तसेच ते बुद्धी आणि मनावरही अवलंबून असते. यासाठीच अंतर्मनातून विविध प्रसंग, घटना, व्यक्ती आदीबाबत क्रोधावर नियंत्रण व त्या-त्या प्रसंगातील सर्वतोपरी आकलन महत्त्वाचे ठरते. म्हणून त्याचा अभ्यास-चिंतन आणि आत्मनिरीक्षण योग्यप्रकारे करणे हे व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून आहे.

क्रोधीत मन बेफाम होते. सारासार विवेक गमावून बसते. त्यास परिणामाचा विसर पाडतो. क्रोध शांत झाल्यावर व्हायचा तो परिणाम होऊन गेलेला असतो. नंतर विचार करण्यात फारसा अर्थ नसतो. तेव्हा मनात रागाचा उद्भवच होणार नाही अथवा झालाच तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची काळजी घेणे, केव्हाही हितकारक असते. अपेक्षा, आनंद, आश्चर्य, स्वीकार, भीती, घृणा, राग आणि दु:ख या आठ मुख्य भावना आहेत. याचाही उद्गम प्रथमत: मनातूनच होतो. म्हणून तर मनाला ‘भाव-भावनांचा खजिना’ म्हटले आहे. या खजिन्याची सात्विकता, शूचिर्भूतता, निरलसता, निर्मोहीपणा जितका अधिक तेवढे या भाव- भावनांचे फलित आनंददायी आणि सुखकारक असते. मुख्य भावना व त्याच्या संयोगातून निर्माण होणार्‍या शेकडो छटा आपले भावनिक आयुष्य समृद्ध करीत असतात. क्रोधावर, त्याच्या अभिव्यक्तीवर मानसिक नियंत्रण मिळवले की पुढचे सारेकाही सुरळीत होते, पण यावर नियंत्रण मिळवण्यात आपण असफल ठरलो की, शरीरावर आणि आपल्या आचार-विचार-व्यवहारांवर अनुचित परिणाम होतात. त्यातूनच हृदयविकार, अर्धांगवायू, मधुमेह, अल्सर, अर्धशिशी, अ‍ॅसिडिटी आदी रोग उद्भवतात. मन:स्वास्थ्य हरपते. तेव्हा मनात उद्भवणार्‍या क्रोधाचे आकलन होणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे आकलनच सुख समाधान-शांतीस निमंत्रण देते.

मनोदुर्बलता-समज-गैरसमज: भूत बाधा, मूठ मारली, करणी केली, खायला घातले, दृष्ट लागली, भूताने पछडले, कुणाची तरी छाया पडली, भूत, मुंजा, खविस आदींनी झपाटले, असे किती तरी प्रकारचे समज-गैरसमज सर्वत्र पसरले आहेत. आजच्या 21 व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या काळातही अनेकांचा असल्या गोष्टींवर विश्वास आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे स्वत:ला सुशिक्षित व प्रगत समजणारेही यात आढळतात. त्यांच्या या मनोधारणेस कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ज्या लोकांच्या मनात अशा स्वरुपाची विचारसरणी निर्माण होते, यालाच त्यांची मनोदुर्बलता म्हणतात. (क्रमश:)
– डॉ. यशवंत पाटील

LEAVE A REPLY

*